देवेंद्र फडणवीस : 'पंतप्रधानपदाचं स्वप्न वाईट नाही, पण पवारांचे 10 च्या वर खासदार नाहीत' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) 'पंतप्रधानपदाचं स्वप्न वाईट नाही, पण पवारांचे 10 च्या वर खासदार नाहीत'

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पंतप्रधानपदावरून खिल्ली उडवली आहे. "पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणं वाईट नाही, पण त्यांचा पक्ष 10 खासदारांचा आकडाही पार करू शकले नाहीत," असं फडणवीस म्हणाले. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना फडणवीस असं म्हणाले.

अमोल कोल्हे पवारांच्या वाढदिवसानिमित्त म्हणाले की, "शरद पवार यांनी देशाचं नेतृत्व करावं. जर गुजरातमध्ये 26 खासदार असताना एक व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते, मग 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातून शरद पवारही पंतप्रधान होऊ शकतात."

यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "माझ्या पवारांना खूप शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहणं हे काही वाईट नाही. त्यांच्या पार्टीच्या जन्मापासून ते स्वप्न पाहत आहेत. पण त्यांचा पक्ष 10 चा आकडाही पार करू शकला नाही."

दरम्यान, पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात छगन भुजबळही म्हणाले की, "पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला, तोच चमत्कार 2024 मध्ये दिल्लीत होईल."

2) मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नव्हे - राहुल गांधी

"मी हिंदू आहे, हिंदुत्ववादी नव्हे," असं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी जयपूरमध्ये म्हणाले. काँग्रेस पक्षानं जयपूरमध्ये केंद्र सरकारविरोधात 'महागाई हटाओ रॅली' आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

"केंद्र सरकार भांडवलदार आणि उद्योजकांच्या फायद्यासाठी काम करत आहे. लोकांविरोधात काम करणारं हे हिंदुत्ववादी सरकार आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, "देशाच्या राजकारणात सध्या दोन शब्दांचा टक्कर होतेय. दोन वेगळे शब्द आहेत. एक हिंदू आणि दुसरा शब्द हिंदुत्ववादी. या दोन्ही एकच गोष्टी नाहीत. या दोन्हींचे अर्थ वेगळे आहेत. मी हिंदू आहे, मात्र हिंदुत्ववादी नाहीय."

याबाबत अधिक सांगताना ते म्हणाले, "महात्मा गांधी हिंदू होते, तर गोडसे हिंदुत्ववादी होता. हिंदू सत्याग्रह करतो, तर हिंदुत्ववादी सत्ताग्रह करतो."

3) मला अडकवण्यासाठी UPA सरकारनं 400 कोटी खर्च केले - इंद्रेश कुमार

भगव्या दहशतवादाखाली मला अडकवण्यासाठी UPA सरकारनं 400 कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केलाय. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या मुस्लीम राष्ट्रीय मंच आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

"जाती आणि धर्माला दहशतवादाशी जोडणे चुकीचे आहे. असे करता कामा नये. कारण दहशतवादाला प्रोत्साहन देणारे केवळ आपल्या फायद्यासाठी धर्माच्या नावावर शोषण करतात. यावर नियंत्रण ठेवायला हवे," असं इंद्रेश कुमार म्हणाले.

तसंच, यासंदर्भात सशक्त कायदा करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

4) आता 'म्हाडा' स्वत:च परीक्षा घेणार - जितेंद्र आव्हाड

"म्हाडा यापुढे बाहेरच्या संस्था किंवा कंत्राटदारांऐवजी स्वत:च परीक्षा घेईल," अशी माहिती महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

यावेळी जितेंद्र आव्हाडांनी म्हाडाच्या ऐनवेळी पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेवरही भाष्य केलं.

ते म्हणाले, "पेपर फुटण्याच्या आधीच परीक्षा रद्द केली. पेपर फुटल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असता तर नक्कीच ते नामुष्कीचे ठरले असते. याशिवाय अभ्यास केलेल्या परीक्षार्थींवर अन्याय झाला असता."

"पेपर फोडणारी टोळी उद्ध्वस्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणि पोलीस एकाचवेळी कामाला लागले. त्यांनी वशिल्याची माणसे म्हाडामध्ये जाण्यापासून रोखली," असा दावा आव्हाडांनी केला.

5) धार्मिक आधारावर भारताची फाळणी 'ऐतिहासिक चूक' - राजनाथ सिंह

"स्वातंत्र्यावेळी धर्माच्या आधारावर भारताची झालेली फाळणी ही 'ऐतिहासिक चूक' होती. हे 1971 च्या युद्धाने सिद्ध केले," असं मत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं.

1971 च्या युद्धात पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाला काल (12 डिसेंबर) 50 वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्तानं आयोजित 'स्वर्णिम विजय पर्व' कार्यक्रमात ते बोलत होते. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले, "भारताने 1971 मध्ये पाकिस्तानला समोरासमोरच्या युद्धात पराभूत केले, सध्याच्या पाकपुरस्कृत दहशतवाद्यांविरोधातील छुप्या युद्धातही भारताचाच विजय होईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)