मंजुला प्रदीप: बलात्कार पीडितांना सावरण्यास मदत करणारी दलित कार्यकर्ती

मंजुला प्रदीप, दलित महिला, बलात्कारपीडित, सामाजिक कार्य, कायदा

फोटो स्रोत, MANJULA PRADEEP

फोटो कॅप्शन, मंजुला प्रदीप
    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'त्यांना मी भेटले तेव्हा मला वाटलं माझ्याकडे बंदूक तर आहे, पण ती चालवण्यासाठी गोळ्या नाहीयेत'

28 वर्षीय दलित महिला चळवळवादी कार्यकर्त्या भावना नारकर अशा शब्दात त्यांच्या गुरू मंजुला प्रदीप यांचं वर्णन करतात. बलात्काराला सामोरं गेलेल्या, विशेषतः दलित वर्गातील महिलांना सावरण्यासाठी महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम मंजुला करतात. भावना त्यापैकीच एक आहेत.

हिंदू समाजरचनेनुसार दलित हे जातीच्या उतरंडीत तळाच्या स्थानी असतात. जुन्या काळी त्यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागत असे. समाजातील वंचित आणि उपेक्षित असा हा घटक होता. त्यांना कायद्याचं संरक्षण आहे पण तरीही त्यांना हिंसाचाराला तसंच पूर्वग्रहदूषित वागणुकीला सामोरं जावं लागतं.

भारतातल्या महिला लोकसंख्येपैकी 16 टक्के दलित महिला आहेत. त्यांना लैंगिक छळाचाही त्रास होतो. दलित वर्गाला कमी लेखण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी उच्च जातीकडून बलात्काराचा हत्यार म्हणून वापर केला जातो.

गेली 30 वर्ष दलित महिलांच्या हक्कांसाठी मंजुला लढत आहेत. यंदा त्यांनी या कामासाठी 'नॅशनल काऊंसिल ऑफ वुमन लीडर्स'ची स्थापना केली.

दलित समाजात महिला नेतृत्व विकसित करणं हे अनेक वर्षांचं उद्दिष्ट होतं. कोव्हिड काळात लैंगिक छळाच्या-मारहाणीच्या प्रकरणांचा मी आढावा घेत होते. त्यावेळीच या संघटनेचं बीज मनात रोवलं गेलं.

दलित महिलांना शिक्षणाची, रोजगाराची संधी नाही अशा गुजरातमधील एका शहरात मंजुला राहतात.

मंजुला प्रदीप, दलित महिला, बलात्कारपीडित, सामाजिक कार्य, कायदा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दलित महिलांवर अत्याचार होण्याचं प्रमाण अधिक आहे.

लैंगिक अत्याचार झाल्यानंतर महिलांच्या मनात चीड असते. त्यांना न्याय हवा असतो. पण अनेकदा घरच्यांसमोर तसंच समाजात त्या याबाबत बोलू शकत नाहीत. कारण त्यांना त्यांच्या अधिकारांची कल्पना नसते. कायदे त्यांच्या मदतीसाठीच असतात, असं नारकर सांगतात.

जानेवारी 2020 मध्ये दलित महिलांसाठीच्या एका कार्यक्रमात मंजुला यांना बोलताना भावना यांनी पाहिलं. आपल्यालाही न्याय मिळू शकतो हे त्यांना मंजुला यांच्या बोलण्यामुळे वाटू लागलं.

मंजुला अतिशय तडफेने बोलत होत्या. व्यवस्थेचे अडथळे पार करण्यासाठी काय करावं लागेल याचा स्पष्ट आराखडा मंजुला यांच्या डोक्यात तयार होता. तुटपुंजी कायदेशीर माहिती असणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांना प्रशिक्षण देणं हा त्यांच्या कृती आराखड्याचा भाग होता.

बलात्कार झालेल्या महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं

हे प्राथमिक पातळीवरचे वकील आहेत. बलात्कारासारख्या नृशंस प्रसंगाचा अनुभव घेतलेल्या महिलेला न्याय मिळवून देणं आणि समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलवण्यासाठी या पायाभूत पातळीवरील मंडळींचं काम महत्त्वाचं आहे.

गुन्हेगारी आणि न्यायव्यवस्था या अख्ख्या व्यवस्थेचा दलित महिलांप्रति दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित आहे. न्यायालयात त्यांना मानहानी वाटू शकतील, असे प्रश्न विचारले जातात. उच्च जातीचा पुरुष दलित महिलेवर का बलात्कार करेल? ती अस्पृश्य आहे. तिनेच लैंगिक सुखासाठी त्याला बोलावलं असेल.

व्यवस्थेतले अडथळे पार कसे करायचे, दोषींकडून मिळणाऱ्या धमक्या आणि समाजाकडून होणारी हेटाळणी यांचा सामना कसा करायचा यासंदर्भात मार्गदर्शन मिळाल्याने भावना यांना आता आश्वासक वाटतं. त्यांनी स्थानिक दलित संघटनेसाठी काम करायला सुरुवात केली आहे. परिसरात बलात्काराची घटना घडल्याचं ऐकलं तर त्या तात्काळ पीडितेसाठी धाव घेतात.

मंजुला प्रदीप, दलित महिला, बलात्कारपीडित, सामाजिक कार्य, कायदा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आंदोलन

2014 ते 2019 या कालावधीत गुन्ह्याची नोंद झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला तर लक्षात येतं दलित महिलांवर अत्याचाराची प्रकरणं 50 टक्क्यांनी वाढली आहेत. मात्र दलित महिलांवरील अत्याचार अनेकदा पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतच नाहीत. कुटुंबाकडून पीडितेला आधार मिळत नाही. उच्चजातीय पुरुष आरोपीविरोधात पोलीसही तक्रार दाखून करून घ्यायला खळखळ करतात.

पीडितेचं मनोधैर्य उंचावण्यावर प्रशिक्षणात भर दिला जातो. लैंगिक अत्याचाराची तपशीलवार तक्रार दाखल होणं कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे याचं महत्त्व ठसवलं जातं. लहानपणी सामना करावा लागलेल्या लैंगिक छळाचा त्यांनी स्वत: सामना केला आहे. चार वर्षांची असताना शेजारच्या चारजणांनी तिचा लैंगिक छळ केला होता.

'त्या' अनुभवाची धास्ती

मला आठवतंय मी त्या दिवशी पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातला होता. मला त्यांचे चेहरे आठवतात. त्यांनी माझ्यासोबत जे कृत्य केलं तेही आठवतंय. त्या बलात्काराने मी बदलून गेले. मी एकदम घाबरून गेले आणि बोलण्याचीही भीती वाटू लागली. मला अनोळखी लोकांची भीती वाटू लागली. घरी कोणी आलं तर मी लपून बसत असे.

बलात्कार

फोटो स्रोत, Getty Images

लैंगिक अत्याचाराबद्दल त्यांनी कुणाला सांगितलं नाही. आईवडिलांना सांगण्याइतकं धारिष्ट्य ती गोळा करू शकली नाही. तिच्या आईचं वयही फार नव्हतं. चौदा वर्षांची असताना आईचं लग्न झालं. आईपेक्षा वडील 17 वर्षांनी मोठे होते. वडिलांना मुलगा हवा होता त्यामुळे माझ्या जन्मानंतर वडील नाराज झाले होते.

ते आईला मारहाण करत असत. माझी खिल्ली उडवत असत. ते मला कुरुप म्हणत असत. मी नकोशी आहे याची जाणीव ते सातत्याने करून देत असत.

मंजुला प्रदीप, दलित महिला, बलात्कारपीडित, सामाजिक कार्य, कायदा

फोटो स्रोत, MANJULA PRADEEP

फोटो कॅप्शन, मंजुला यांनी असंख्य बलात्कार पीडितांना सावरलं आहे.

तिच्या वडिलांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. कामानिमित्ताने ते गुजरातला स्थायिक झाले होते. नव्या घरी त्यांनी दलित असल्याची ओळख लपवली होती. त्यांनी आडनाव वापरणं सोडून दिलं. त्यांनी बायको आणि मुलीला प्रदीप नाव लावायला सांगितलं. मात्र तरीही त्यांच्या जातीची ओळख लपली नाही.

भेदभाव विविध पातळ्यांवर पाहायला मिळाला. बडोद्यासारख्या मोठ्या शहरातही त्यांनी ही अनुभव घेतला.

नऊ वर्षांची असताना वर्गातील सगळ्यात स्वच्छ मुलं ठरवण्यात आली. मी टापटीप होते मात्र दलित अस्वच्छ असतात या धारणेतून मला शेवटचं स्थान देण्यात आलं. मला ते खूप अपमानास्पद वाटलं.

दलितांसाठी काम करण्याचा विचार

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्य आणि कायदा यांचं शिक्षण घेतलं.

ग्रामीण भागाला भेटी दिल्यानंतर दलितांसाठी काम करावं हा त्यांचा विचार पक्का झाला. 1992 मध्ये त्यांनी नवसार्जन या दलितांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनेसाठी काम करायला सुरुवात केली. पाच पुरुषांनी एकत्र येत या संघटनेची स्थापना केली होती. या पाचांपैकी एकाची उच्च जातीतील एका व्यक्तीने हत्या केली. दहा वर्षांनंतर मंजुला यांनी संघटनेच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये विजय मिळवला आणि त्या आता कार्यकारी संचालक आहेत.

दलित महिलेसाठी एखाद्या संघटनेच्या मोठ्या पदापर्यंत पोहोचणं अतिशय दुर्मीळ आहे. चार पुरुषांना नमवत मी निवडणूक जिंकले. ही संघटना दलित समाजातील पुरुष तसंच महिलांसाठी काम करते.

बलात्काराला सामोरं गेलेल्या पीडितांना सावरणं हा त्यांच्या कामाचा मुख्य भाग झाला आहे. 50हून अधिक बलात्कार पीडितांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी आरोपींना शिक्षा होईल यासाठी सनदशीर कार्यवाही केली आहे.

दलित महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं आवश्यक आहे, दलित समाजात महिला नेतृत्व विकसित होणंही गरजेचं आहे असं त्यांना वाटतं.

मला आणखी मंजुला घडवायच्या नाहीयेत. महिलांनी त्यांची ओळख स्वत: मिळवावी. माझ्या छायेत राहू नये, स्वतंत्र माणूस म्हणून वाटचाल करावी.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)