राज ठाकरेंनी जेव्हा गाडी चालवत उद्धव यांना हॉस्पिटलमधून 'मातोश्री'वर आणलं होतं...

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना आता कधीही डिस्चार्ज मिळून ते घरी जातील असं सांगितलं जातं आहे. ते जेव्हा घरी जातील तेव्हा सहाजिक आहे की मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा मोठा ताफा त्यांच्या दिमतीला असेल.

पण महाराष्ट्रातल्या अनेकांना कुतुहलानं पडलेला प्रश्न हा आहे की 2012 सालच्या दुपारी जे चित्र पहायला मिळालं, ती फ्रेम पुन्हा यावेळेस दिसण्याची काही शक्यता आहे का?

16 जुलै 2012 सकाळी काही अनपेक्षित घडलं. आपल्या पक्षाच्या मेळाव्यासाठी अलिबागला निघालेल्या राज ठाकरेंचा फोन ते रस्त्यात असतांनाच वाजला. त्यांनी तो उचलला, त्यावर ते थोडा काळ बोलले आणि राज ठाकरेंचा गाड्यांचा ताफा लगेच मागे वळला. राज मुंबईकडे तातडीनं निघाले.

तो फोन 'मातोश्री'तून होता आणि तो खुद्द बाळासाहेब ठाकरेंचा होता. बाळासाहेबांनी राज यांना सांगितलं की उद्धव यांना छातीत दुखत आहे आणि त्यांना 'लिलावती' रुग्णालयात घेऊन जात आहेत. जर ते (राज)असतील तर बरं होईल.

राज यांनी थोडाही विलंब न करता परत माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आणि ते काहीच वेळात ते हॉस्पिटलला पोहोचले. त्यांच्या मोठ्या भावाजवळ पोहोचले.

2005 मध्ये 'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे' असं म्हणत शिवसेनेतून बाहेर पडणा-या राज आणि उद्धव यांचं राजकीय युद्धच तोपर्यंत महाराष्ट्रानं पाहिलं होतं. राजकीय आकांक्षांचा मुद्दा केवळ पक्षापुरता न राहता त्यानं कुटुंबही दुभंगलं. पण सात वर्षांनी जुलैच्या त्या दुपारी महाराष्ट्रानं जे पाहिलं तेव्हा बहुतेकांनी म्हटलं की नात्यानं राजकारणावर मात केली.

त्या दिवशी जे नाट्य घडलं त्याचं मोठं वृत्तांकन त्यावेळेस वर्तमानपत्रांनी केलं होतं. 'द इंडियन एक्स्प्रेस'मध्ये प्रकाशित झालेला वृत्तांतात घरामध्ये आणि हॉस्पिटलमध्ये काय काय झालं हे विस्तारानं लिहिलं होतं.

उद्धव यांच्या गाडीचे 'सारथी' राज

अलिबागला निघालेले राज बाळासाहेबांच्या फोन येताच उद्धव यांच्यासाठी परत आले. पण त्यानंतर घेतला गेलेला एक फोटो आजही ठाकरे कुटुंबासाठी आणि महाराष्ट्रातल्या राजकारणासाठी न विसरला जाणारा आहे.

त्या दिवशी सगळ्या चाचण्यांनंतर जेव्हा उद्धव ठाकरे घरी 'मातोश्री'ला निघाले, तेव्हा राज त्यांचे 'सारथी' बनले.

राज हे उद्धव यांना सोडण्यासाठी स्वत: गाडी चालवायला स्टिअरिंग हाती घेऊन बसले. टी-शर्ट घातलेले उद्धव आणि पांढ-या कुर्त्यातले राज यांची हॉस्पिटलमधून बाहेर पडत, स्मित करत 'मर्सडिज'मध्ये बसतांनाची दृष्यं आणि फोटो माध्यमांमधून पुढच्या काही क्षणांमध्ये महाराष्ट्रभर गेली. एकदम सगळा नूर पालटला.

राज उद्धव यांना घेऊन 'मातोश्री'ला पोहोचेपर्यंत शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. राज आणि उद्धव मतभेद टाळून परत एकत्र येतील ही तेव्हा अजूनही ताजी आणि गरम चर्चा दोन्ही पक्षाच्या सैनिकांमध्ये आणि लोकांमध्येही होती.

अनेकांना हेच ते निमित्त वाटलं. राज ठाकरेही बऱ्याच काळानं 'मातोश्री'वर गेले. तिथे ते बाळासाहेब आणि उद्धव यांच्यासोबत काही काळ थांबले. त्यानंतर काही दिवसांनी जेव्हा उद्धव यांच्यावर पुढचे उपचार झाले तेव्हाही राज ठाकरे हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते.

अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे या घटनेकडे पाहिलं. सहाजिक होतं की मोठ्या भावाच्या आधारासाठी कुटुंबातला लहन भाऊ कटुता बाजूला ठेवून धावून गेला असं त्याकडे बघितलं गेलं.

काहींना उद्धव आणि राज परत एकत्र येण्याची शक्यता दिसली. काहींना त्यात राजकारणही दिसलं. स्वत: राज यांनी मात्र नंतर याबद्दल बोलतांना कुटुंब आणि राजकारण या दोन त्यांच्यासाठी वेगळ्या गोष्टी असल्याचं म्हटलं.

2014 मध्ये 'आप की अदालत' या कार्यक्रमात रजत शर्मांशी बोलतांना ते म्हणाले, "राजकारण एक असतं आणि कौटुंबिक संबंध एका बाजूला असतात. मी त्याच त्याच गोष्टी परत सांगत बसत नाही, पण उद्धवना जेव्हा हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं तेव्हा मला असं आतून वाटलं की आपण तिथं असायला हवं. माझ्या मनात क्षणभरासाठीही असं आलं नाही की याची काय चर्चा होईल, राजकीय परिणाम काय होतील वगैरे. माझ्या मनात आलं आणि मी तिथे उभा राहिलो."

त्यामुळेच आता उद्धव जेव्हा एका महत्त्वाच्या शस्त्रक्रियेला सामोरे गेले आहेत, तेव्हाही 2012 मध्ये घडलं तसं राज त्यांना परत घरी आणण्यासाठी जाणार का असं कुतुहलानं जुन्या स्मृतींमुळे विचारलं जात आहे.

मनसेतल्या राज यांच्या जवळच्या काही पदाधिकाऱ्यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी याबद्दल हा कौटुंबिक विषय असल्यानं काहीही प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली.

आता काय बदललं?

2012 मध्ये हयात असलेले आणि हक्कानं राज ठाकरे यांना फोन करणारे बाळासाहेब आता नाहीत, पण त्यानंतर 2021 पर्यंत राजकारणही खूप बदललं आहे आणि त्या राजकारणातलं दोघांचं स्थानही.

उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेसोबतच मोठी सरकारी यंत्रणाही त्यांच्या दिमतीला आहे. पण तरीही राज आणि उद्धव ठाकरे यांचे कौटुंबिक संबंध राजकारणाच्या प्रभावाच्या बाहेर आहे असं आतापर्यंत काही घटनांमध्ये दिसून आलेलं आहे.

उद्धव यांचा शिवाजी पार्कच्या मैदानावर शपथविधी झाला तेव्हा राज आणि त्यांच्या आई आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. अमित ठाकरेंचं लग्न झालं तेव्हा आमंत्रण देण्यासाठी राज 'मातोश्री'वर गेले होते आणि सगळं ठाकरे कुटुंब तेव्हा एकत्र आलं होतं.

राज मध्यंतरी आजारी असतांना उद्धव यांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. दक्षिण मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी दोघे भाऊ एकत्र आल्याचं पहायला मिळालं होतं.

याशिवाय एका पक्षाचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांसोबत राज यांचा पत्रव्यवहार आणि बोलणं होत असतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या झालेल्या बैठकीतही राज यांना बोलावलं गेलं होतं.

राजकीय पटलावर मात्र दोघेही बंधू दोन विरुद्ध ध्रुवांवर गेल्याचं पहायला मिळतं आहे. उद्धव यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन 'महाविकास' आघाडी स्थापन केली आहे.

त्याअगोदर हे दोन्ही पक्ष या दोन्ही बंधूंचे समान राजकीय विरोधक होते. राज 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळेस भाजपाच्या विरोधात गेले, पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सामील झाले नाहीत. आता चित्र पूर्णपणे विरुद्ध आहे.

राज ठाकरे आणि भाजपा हे महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर एकत्र येण्याची शक्यता आहे आणि मुंबईत त्यांचा समान विरोधक आहे शिवसेना.

अर्थात 2012 ला जेव्हा राज उद्धव यांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेल्याची आठवण आज निघते आहे, तेव्हाही राज भाजपाच्या जवळ जात आहेत अशा चर्चा होत्या. ते नुकतेच गुजरातमध्ये जाऊन नरेंद्र मोदींचं कौतुक करुन आले होते. पण आता भवतालची परिस्थिती पुरती वेगळी आहे. त्यामुळेच केवळ वैद्यकीय परिस्थिती 2012 सारखी असली तरी राजकीय स्थिती बदललेली आहे.

"ते फोनवरुन वगैरे अशा वेळेस संपर्कात असतील, पण 2012नंतर पुलाखालनं बरचसं पाणी वाहून गेलं आहे. मनसेची अवस्था बिकट झाली. शिवसेनेनं मनसेचं नगरसेवक फोडले. पुढे उद्धव मुख्यमंत्री झाले. अशा बऱ्याच गोष्टी बदलल्या. आणि राजकारणाचा परिणाम अशा संबंधांवर होतोच.

"कितीही म्हटलं तरी राजकीय कुटुंबामध्ये राजकारण आणि कुटुंब हे फार वेगळं करता येत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही कुटुंबं आता अशा सगळ्यांच बाबतींमध्ये खूप सावध झाली आहेत," असं 'द ठाकरे कजन्स' हे ठाकरे बंधूंवर पुस्तक लिहिणारे पत्रकार धवल कुलकर्णी म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)