You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बुस्टर डोस देण्याचा आमचा आग्रह - डॉ. संजय ओक
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनला रोखण्यासाठी बुस्टर डोसची गरज असल्याचं डॉ. संजय ओक यांनी सांगितलं आहे. डॉ. संजय ओक हे महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे प्रमुख आहेत.
'ओमिक्रॉन' नावाच्या कोव्हिड-19 च्या नवीन व्हेरियंटमुळे जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. युरोपातील अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून सीमा सील करण्याचा निर्णय घेतलाय.
तर काही देशांनी 'ओमिक्रॉन'चा संसर्ग आढळलेल्या देशातून विमानप्रवासावर बंदी घातलीये. महाराष्ट्रानेही केंद्राकडे या देशांतून विमान प्रवासावर बंदी आणा, अशी मागणी केलीये.
'ओमिक्रॉन'ची संसर्गक्षमता जास्त आहे. हा व्हेरियंट तीव्रतेने पसरणारा असल्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात बैठकांचं सत्र सुरू झालंय.
'ओमिक्रॉन' व्हेरियंटबाबत लोकांमध्ये असलेली भीती, पुन्हा डॉकडाऊनची चिंता, लस प्रभावी आहे का नाही? याबाबत बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांनी महाराष्ट्र सरकारच्या कोव्हिड टास्कफोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा केली.
प्रश्न - अनेक देशांनी 'ओमिक्रॉन' बाधित देशातून विमान प्रवास बंद केलाय. भारताने, महाराष्ट्राने असं करावं का?
डॉ. संजय ओक - व्हायरस वैद्यकीय क्षेत्राच्या नेहमीच दोन पावलं पुढे राहिलाय. व्हायरसच्या नव-नवीन आवृत्या तयार होत असतात. या नवीन व्हेरियंटने बाधित लोकांनी ज्या देशात प्रवास केला, त्या देशात केसेस आढळून येत आहेत. हा व्हायरस एअरबॉर्न म्हणजे हवेतून पसरणारा, डॉपलेट व्हायरस आहे.
याच्या प्रसारावर प्रतिबंध घालायचा असेल तर, विमान प्रवासावर पायबंद घालणं गरजेचं आहे. विमानप्रवासावर निर्बंध, प्रवाशांची RTPCR चाचणी, ज्या 12 देशांबाबत संशयाचं वातावरण आहे, या देशातून येणाऱ्या विमानांवर बंदी किंवा प्रवाशांना सक्तीचं कॉरेंन्टाईन या उपाययोजना केल्या तर महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार रोखू शकतो.
युरोपातील काही देशांनी, ओमिक्रॉन व्हेरियंटबाधित देशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळ बंद केलाय. आपण संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. पण, तात्काळ विमानं बंद करावीत असं नाही. पण टास्कफोर्सची तशी विनंती जरूर आहे.
प्रश्न - 'ओमिक्रॉन' व्हेरियंटबाबत आपल्याला काय माहिती आहे? हा व्हायरस तीव्रतेने पसरणारा आहे का?
डॉ. संजय ओक - तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त करण्यात आलाय की, यापूर्वीच्या म्युटेशनच्या तुलनेत 'ओमिक्रॉन'ची संसर्गक्षमता 500 पटींनी जास्त आहे. त्यामुळे हा व्हेरियंट पसरला तर, कमी कालावधीत मोठ्या संख्येने लोकांना संसर्ग होईल. या नवीन व्हेरियंटची तीव्रता, वेगळी लक्षणं दिसतायत का याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही. हे समजण्यासाठी साधारणत: 14 दिवसांचा कालावधी लागतो. हा काळ जगभरात पूर्ण झालेला नाही.
पण, समाधानकारक आणि सकारात्मक गोष्ट म्हणजे अफ्रिकेतील विषाणूतज्ज्ञांच्या मते या व्हेरियंटमुळे गंभीर संसर्ग झालेले रुग्ण आढळून आलेले नाहीत किंवा ICU मध्ये रुग्ण दाखल झालेले नाहीत. पण 14 दिवस आपल्याला वाट पहावी लागेल.
प्रश्न - 'ओमिक्रॉन' व्हेरियंटमुळे लोकांमध्ये प्रचंड भीती पसरलीये. लोकांनी घाबरून जाण्याचं कारण आहे का?
डॉ. संजय ओक - लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. भारत आणि महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट हाताबाहेर गेलेली नाही.
प्रश्न - ओमिक्रॉनचा झपाट्याने होणारा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय आहे? हे निर्बंध योग्य ठरतील?
डॉ. संजय ओक - लॉकडाऊन आणि नियंत्रण याला वैद्यकीय परिभाषेत थेट उत्तर नाही. डॉक्टर भलेही 100 टक्के लॉकडाऊनची अपेक्षा करत असतील. पण व्यावसायिक आणि आर्थिक गणितांचा विचार करता शक्य होणार नाही.
ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत दोन दिवस झालेल्या बैठकीत कोणीही लॉकडाऊन शब्द उच्चारला नाही. लॉकडाऊनचे चटके सर्वांनी सोसलेत, दुष्परिणाम पाहिलेत. त्यामुळे लॉकडाऊनचा आग्रह कोणीही धरलेला नाही.
स्वनिर्बंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. मास्क वापरणं आणि लसीकरण गरजेचं आहे. अनेकांनी लस घेतलेली नाही. लोक मास्कला झुगारून देताना दिसत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन नाही, स्वत:वर निर्बंध महत्त्वाचे आहेत.
प्रश्न - या नवीन व्हेरियंटवर कोरोनाविरोधी लशीचा प्रभाव होईल का?
डॉ. संजय ओक - व्हायरस आणि लस यांचं द्वंद्व वैद्यकीय क्षेत्रात कायम सुरू असतं. लशीप्रमाणे व्हायरस आपलं स्वरूप बदलतो. त्यामुळे लशीला कमी प्रमाणात दाद द्यायला लागतो.
व्हायरससोबत संशोधनातून लसनिर्मितीही बदलते. कोव्हिडची पुढची दिशा 'मल्टिव्हेलंट व्हॅक्सीन' निर्माण करण्याकडे रहाणार आहे.
लशीमुळे शरीरात असलेल्या टी सेल्स, ज्याला मेमरी टी-सेल्स म्हणतात. या पेशींच्या स्मरणशक्तीत व्हायरसचे गुणधर्म रहातात. त्यामुळे त्या त्यांचा प्रतिकार करण्यास लक्षम होतात. लस घेतल्यामुळे कोरोना होत नाही असं नाही. पण, संसर्ग झालाच तर तो अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो.
लस किती प्रभावी आहे यात आपण जायला नको. प्रत्येकाने लस घेतली पाहिजे.
प्रश्न - तुम्ही लहान मुलांवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आहात. मग, नवीन व्हेरियंटचं संकट पाहता शाळा सुरू कराव्यात का? कारण, पालकांमध्ये याची भीती मोठ्या प्रमाणावर आहे.
डॉ. संजय ओक - लहान मुलांच्या टास्कफोर्सचे तज्ज्ञ या विषयावर सरकारसोबत चर्चा होणार आहे.
माझं मत आहे की, खबरदारीची उपाययोजना केली पाहिजे. व्हायरस आणि शाळा यांची सांगड मी घालणार नाही. कारण याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पाळण्याची गरज आहे.
टास्कफोर्सचा प्रमुख म्हणून एक गोष्ट सांगतो, 12 ते 18 या वयोगटातील मुलांचं लसीकरण डिसेंबर-जानेवारी महिन्यात सुरू व्हावं. कोरोनाचे नवीन प्रकार येत असल्याने, लस न घेतलेली ही मोठी लोकसंख्या व्हायरसला एक्सपोज होईल.
मुलांच शैक्षणिक, मानसिक नुसकान खूप झालंय. त्यामुळे शाळा सुरू करव्यात याबाबत दुमत नाही. पण उत्मुक्त वातावरणात ज्या प्रकारे आपण शाळेत जात होतो, असं न करता काळजी घेऊन शाळा चालू कराव्यात.
प्रश्न - या व्हेरियंटमुळे बूस्टर डोसची गरज भासेल?
डॉ. संजय ओक - टास्कफोर्सने सातत्याने बूस्टर डोस आणि तिसऱ्या डोसची मागणी केलीये. राज्यानेही केंद्राकडे ही मागणी लावून धरलीये.
दोन डोस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आरोग्यक्षेत्रात काम करणारे आणि सहव्याधी असलेल्यांना तिसरा डोस द्यावा असा आमचा आग्रह आहे. कोविन अॅपमध्ये रजिस्टर न करता हा डोस कोणीही घेऊ नये.
प्रश्न - ओमिक्रॉनमुळे लोकांना गंभीर आजार झाल्याचं दिसून येत नसल्याचं दक्षिण अफ्रिकेचे संशोधक सांगतात. मग देशांमध्ये पॅनिक होणं का सुरू झालंय?
डॉ. संजय ओक - जर्मनी, नेदरलॅंड, ऑस्ट्रियासारख्या देशांमध्ये मोठ्या संख्येने डेल्टा व्हेरियंट परसलाय. भारतात आपण दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरियंटला सामोरे गेलोय. या देशात लसीकरण झाल्यानंतर डेल्टा व्हेरियंट पसरलाय.
ओमिक्रॉनची संसर्गक्षमता आणि मृत्यू याबाबत फारसा परिणाम दिसून आलेला नाही. त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो, पॅनिक होऊ नका. आपण खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणी करत आहोत.
प्रश्न - टास्कफोर्सने कोणत्या उपाययोजना सूचवल्या आहेत.
डॉ. संजय ओक - मास्क वापरावं, लस नक्की घ्यावी आणि सोशल डिस्टंसिंग पाळावं ही माझी लोकांना हात जोडून विनंती आहे.
त्याचसोबत सरकारने ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि टेस्टिंग जास्त प्रमाणात केलं पाहिजे. एखाद्या इमारतीत रुग्ण आढळला तर इमारत सील करावी का? याबाबत आम्ही विचार करत आहोत. पण, नवीन व्हेरियंट आढळला तर नक्की इमारत सील करावी लागेल.
नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचं निदान करण्यासाठी जिनोम टेस्टिंग करणाऱ्या लॅब वाढवण्याची गरज आहे. राज्यभरात पाच लॅब निर्माण करण्याची गरज आहे. कोणत्या रुग्णाची टेस्ट करायची याची सूची देण्यात आलीये.
प्रश्न - ओमिक्रॉनचा प्रसार पहाता पुढचे किती दिवस काळजी किंवा खबरदारी घ्यावी लागेल?
डॉ. संजय ओक - व्हायरसचे नवे-नवे व्हेरियंट येत गेले तर कदाचित अजून सहा महिन्यात संपेल असं वाटत नाही. ओमिक्रॉन व्हेरियंटने अनेक देशात डेल्टा व्हेरियंटची कमी कालावधित जागा घेतलीये. त्यामुळे आपण पुढचे दोन आठवडे पडताळून पहाणं गरजेचं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)