साहित्य संमेलन : नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या साहित्य संमेलनात आत्तापर्यंत काय काय वाद झालेत?

- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
नाशिकमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या तारखा काही दिवसांपूर्वी घोषित झाल्या. येत्या 3, 4 आणि 5 डिसेंबरला हे साहित्य संमेलन होणार आहे आणि त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे.
पण अगदी सुरुवातीपासून काही ना काही वाद, अडथळे या संमेलनाच्या आयोजनात उद्भवले आहेत.
आता फायनली हे संमेलन नाशिकच्या मेट (भुजबळ नॉलेज सिटी) कॉलेजच्या प्रांगणात पार पडणार आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ याचे स्वागताध्यक्ष आहेत. पण इथंवर येईपर्यंत काय काय घडलं?
नाशिक की दिल्ली हा वाद
94 व्या साहित्य संमेलनासाठी सुरुवातीपासूनच दिल्ली आणि नाशिक ही दोन नावं चर्चेत होती. संमेलनाच्या आयोजनासाठी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि लोकहितवादी मंडळ या दोन संस्थांनी प्रस्ताव पाठवले होते. तसंच दिल्लीच्याही सरहद संस्थेने प्रस्ताव पाठवला होता.
साहित्य महामंडळाचा कल नाशिककडे झुकायला लागल्यानंतर सरहद संस्थेने महामंडळाला पत्र पाठवून आपल्या प्रस्तावाची आठवणही करून दिली होती.
दिल्लीत मराठी साहित्य साहित्य संमेलन व्हावं असा प्रस्ताव पाठवणाऱ्या सरहद संस्थेच्या संजय नहार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं की, "हे महाराष्ट्राच्या स्थापनेचं हीरकमहोत्सवी वर्ष होतं आणि यंदा 61 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र दिनी दिल्लीत संमेलन व्हावं अशी आमची इच्छा आहे."
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एकदाही दिल्लीत संमेलन झालं नाहीये.
"मराठी भाषा आणि मराठी माणूस स्वतःपुरतं पाहात नाही, तो समाजाचा विचार करतो आणि देशावर आता अशी वेळ आलेली आहे, की महाराष्ट्राने देशाचा विचार करावा. साहित्याच्या माध्यमातून दिल्लीत जर आपण हे घडवू शकलो, तर ही एक चांगली संधी आहे. हे लोकमान्य टिळकांच्या स्मृतीशताब्दीचं वर्ष आहे, पानिपतच्या युद्धाला 260 वर्ष होत आहेत."

"हे महाराष्ट्राचं संमेलन आहे. देशात आज विचारमंथनाची परिस्थिती आहे. आत्ता महाराष्ट्राच्या भूमिका, साहित्यिकांचा आवाज हा दिल्लीत पोहोचला पाहिजे. दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा आवाज साहित्य महामंडळाच्या माध्यमातून छान जाऊ शकतो, ही आमची भावना आहे," असंही ते पुढे बोलताना म्हणाले होते.
पण नंतर आयोजकत्व नाशिकच्या वाटेला आलं. लोकहितवादी मंडळ आयोजक बनलं कारण सार्वजनिक वाचनालय, नाशिकचा एक खटला न्यायप्रविष्ठ असल्यामुळे त्यांना आयोजकत्व देता येत नसल्याचं साहित्य महामंडळाने स्पष्ट केलं होतं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे मोठे इव्हेंट रद्द झाले, गर्दीवर मर्यादा आल्या अशात यंदाचं साहित्य संमेलन होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. सुरुवातीला साहित्य संमेलन नको अशी भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने घेतली होती. पण नंतर बीबीसीशी बोलताना संमेलन नक्कीच होईल असं अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील असं म्हटलं होतं.
ते म्हणाले, "हे लक्षात घ्या, साहित्य संमेलन हे फिजिकलच व्हायला हवं. ते ऑनलाइन होऊ शकत नाही. ऑनलाइन फार फार तर भाषण होऊ शकतं."
संमेलन स्थगित
याच वर्षी मार्चमध्ये 26, 27 आणि 28 या तारखांना संमेलन होणार हे ठरलं होतं. पण त्याचवेळी भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवायला सुरुवात केली होती. नाशिकच्या माध्यमांनी फेब्रुवारी महिन्यापासूनच या संमेलनाच्या आयोजनाविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली होती.
कोरोना व्हायरसमुळे लोकांचे जीव जात असताना अशा संमेलनांची काय गरज असा सुरही आळवला जात होता. त्यावेळी बीबीसी मराठीशी बोलताना कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले होते, "आम्हाला असंख्य लोकांचे फोन आले, माध्यमांमध्ये बातम्या आल्या की संमलेन व्हावं. सर्वसामान्य लोकांकडून वारंवार विचारणा झाल्यामुळे संमेलनाचा घाट घातला. संमेलन लोकांसाठी असतं. लोकांची इच्छा नसेल तर होणार नाही."
या पार्श्वभूमीवर हे संमेलन स्थगित झालं.
पुढील तारखा कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहून, नाशिक साहित्य परिषदेकडून कळवल्या जातील. त्यावर विचार करून मग अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अंतिम निर्णय घेईल, असं त्यावेळी कौतिकराव ठाले-पाटील यांनी म्हटलं होतं.
आर्थिक व्यवहारांवर संशय
जून महिन्यात महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी साहित्य संमेलनच्या आयोजकांच्या आर्थिक व्यवहारांवर संशय व्यक्त केला. संमेलन कमी खर्चात व्हावं असं ठरलेलं असतानाही लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी अंदाजपत्रकात वारंवार बदल करत आहेत ते संशयास्पद वाटतंय असं त्यांचं म्हणणं होतं. "आम्ही याबद्दल स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण मंडळाच्या अध्यक्षांनी तो होऊ दिला नाही," असंही ठाले-पाटील म्हणाले होते.

फोटो स्रोत, DEKDOYJAIDEE/GETTY IMAGES
यावर स्थानिक माध्यमांना प्रतिक्रिया देताना लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर म्हणाले होते की, "साहित्य महामंडळाचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मुळातच संमेलनाच्या आयोजनासाठी कमी वेळ मिळाला. त्यामुळे काही खर्च मागेपुढे झाला. आधीची जागा वेगळी होती त्यामुळे खर्च वेगळा होता, आता वेगळी जागा असल्याने खर्चात वाढ झालेली आहे."
वाद-प्रतिवादाचा खेळ
कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यात होणारं संमेलन स्थगित झालं, पण ते पुढे कधी होणार याच्या तारखा नक्की झाल्या नव्हत्या. त्यामुळे जुलै महिन्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आयोजकांना पत्र पाठवून 'साहित्य संमेलनाबाबत तुमची भूमिका 31 जुलै पर्यंत स्पष्ट करा, नाहीतर तुम्हाला आयोजनात रस नाही असं समजून दुसरीकडे साहित्य संमेलन घेण्याबाबत विचार करावा लागेल,' असं म्हटलं.
या पत्रात ठाले पाटील यांनी काही मुद्दे उपस्थित केले होते. 1) कोरोना काळात नाशिकमध्ये साहित्य संमेलन होऊ शकते का? 2) याबाबत नाशिककरांची मनस्थिती अनुकूल आहे का? 3) संमेलन घ्यायची लोकहितवादी मंडळ आणि स्वागत मंडळाची तयारी आहे का?
कोव्हिडची दुसरी लाट या काळात नुकतीच ओसरली होती. त्यामुळे याला प्रत्युत्तर देताना नाशिकचे पालकमंत्री (जे संमेलनाचे स्वागताध्यक्षही आहेत) छगन भुजबळ यांनी स्पष्ट म्हटलं होतं की, 'सध्या तरी संमेलनाचं आयोजन करणं अशक्य आहे.'
त्यांनी म्हटलं की, 'दुसऱ्या लाटेतून आता कुठे नाशिककर सावरत आहेत. अशात साहित्य संमेलनासाठी हजार-दोन हजार लोक एकत्र येतील आणि सध्या तरी हे शक्य नाही. सरकारी निर्बंध उठल्यानंतर संमेलन घेण्यात येईल. संमेलन नाशिककरांमुळे नाही तर कोव्हिडमुळे थांबलं आहे."
नव्या तारखा जाहीर
ऑगस्ट महिन्यात साहित्य महामंडळाने पुन्हा आयोजकांना पत्र पाठवून साहित्य संमेलन ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घ्या किंवा दिवाळीनंतर घ्या असं म्हटलं होतं. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असंही त्यांनी म्हटलं.
यावर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना आपला राग व्यक्त केला होता. "साहित्य संमेलन आहे की पत्रकबाजीचा आखाडा? लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असताना आताच संमेलन घ्या असं म्हणणं योग्य ठरणार नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

फोटो स्रोत, Twitter
इतक्या सगळ्या चर्चेनंतर नोव्हेंबर महिन्यातल्या 19, 20 आणि 21 या तारखा साहित्य संमेलनासाठी ठरल्या. ऑगस्टमध्ये संयोजन समिती आणि साहित्य महामंडळ यांची बैठक झाली होती. त्यावेळी 19, 20,21 नोव्हेंबर या तारखांना संमेलन घेण्याबाबत संयोजन समितीने सांगितलं होतं. त्यानंतर महामंडळ आणि संयोजन समिती पुन्हा चर्चा झाली. महामंडळाने या तारखा शासनालाही कळवल्या होत्या. पण नंतर याही तारखा पुढे ढकलून 3, 4, 5 डिसेंबरला संमेलन होणार हे निश्चित झालं.
संमेलनाची जागा बदलली
साहित्य संमलेन काही महिन्यांवर आलं असताना ऐनवेळी त्याची जागा बदलावी लागली. आधी हे संमेलन नाशिक शहरातल्या गोखले एज्युकेशन संस्थेच्या कॅम्पसमध्ये होणार होतं, पण नंतर ते स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांची शिक्षण संस्था भुजबळ नॉलेज सिटीत होणार असं ठरलं.
याचं कारण म्हणजे कॉलेज सुरु झाल्यामुळे विद्यार्थी परत आले होते, अशात इथले हॉस्टेल्स निमंत्रितांच्या राहाण्यासाठी द्यायला गोखले एज्युकेशन सोसायटीने नाही म्हटलं, त्यामुळे संमेलनाचं ठिकाण बदलावं लागलं.
दुसरं म्हणजे मोकळ्या मैदानावर कार्यक्रम घेण्याबद्दल सरकारच्या नियमांबद्दल असलेला संभ्रम. जर बंदिस्त जागेत उद्घाटनाचा कार्यक्रम करायचा झाला असता तर तेवढा मोठा हॉल या कॅम्पसमध्ये नव्हता.
सावरकरांच्या नावावरून वाद
नोव्हेंबर महिन्याच्या पुर्वार्धात 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं गीत प्रसिद्ध केलं. या गाण्यात नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा घेतला होता. पण यात मुळचे नाशिकचे असणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांच्या नावाचा उल्लेख नव्हता.
सावरकरांनी नाशिकमध्ये 1938 साली झालेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भुषावलं होतं.
या गाण्यात नाशिकमधल्या इतर साहित्यिकांच्या नावांचा स्पष्ट उल्लेख होता. तसंच 'भुजाभुजातील समता करते स्वागत शब्दप्रभूंचे' या वाक्यानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या वाक्याचा रोख छगन भुजबळांकडे होता.

फोटो स्रोत, SAVARKARSMARAK.COM
नंतर स्पष्टीकरण देताना या गाण्याचे गीतकार मिलिंद गांधी म्हणाले होते की या गाण्यात 'स्वातंत्र्याचे सूर्य' असा उल्लेख आहे, तो स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी आहे.
याविरोधात मनसेने पवित्रा घेतला होता. मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की, "नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या संमेलन गीतात सावरकरांचा उल्लेख हवा होता. तसेच, संमेलनाच्या कामकाज, विषय पत्रिका व उपक्रमांत कुठेही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख नाही. त्यांच्या साहित्याची दखल घेतली गेली पाहिजे होती. सावरकर हे नाशिकचे भूमिपुत्र आहेत. त्यांचा अनुल्लेख योग्य नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. यासाठी आम्ही आयोजकांचा निषेध करतो."
या नंतर आयोजकांनी संमेलन गीतातली ही ओळ बदलली आणि 'स्वातंत्र्य सूर्य सावरकर उजळे अनंत क्षितीजावरती' अशी केली.
राजकीय नेत्यांना स्थान का?
नाशिकच्या साहित्य संमेलनात सुरुवातीपासूनच राजकीय नेत्यांना स्थान असल्याचं दिसतंय. उस्मानाबादला झालेल्या 93 व्या साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांना व्यासपीठावर बसवलं नव्हतं. पण नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी छगन भुजबळ स्वागताध्यक्ष आहेत, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार समारोपाच्या कार्यक्रमाला येणार आहेत.
उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार आहेत असं कार्यक्रमपत्रिकेत दिलं आहे पण प्रकृतीच्या कारणामुळे ते खरंच येऊ शकतील की नाही हे अजून स्पष्ट नाही.
साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलनाच्या कार्यक्रमात भूमिका असल्याशिवाय राजकीय व्यक्तींना व्यासपीठावर प्रवेश दिला जाणार नाही असं आधीच स्पष्ट केलं होतं. भुजबळ स्वागताध्यक्ष असल्याने ते व्यासपीठावर बसू शकतात असंही नंतर स्पष्ट केलं गेलं.

उस्मानाबाद संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे राज्याचे संस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी, काँग्रसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांसारखी राजकीय मंडळी व्यासपीठसमोरील पहिल्या रांगेत बसली होती.
त्यावेळी बीबीसी मराठीशी बोलताना शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या की, "साहित्य संमेलनाचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल, कुठल्याही संमेलनाध्यक्षांच्या भाषणात समाजकारण, राजकारणाचे पडसाद दिसतात. त्यामुळं साहित्य राजकारणविरहित होऊ शकत नाही. राजकीय व्यक्तीविरहित संमेलन घेऊन दाखवणं, हा फार मर्यादित स्वरूपाचा विचार वाटतो. साहित्य संमेलनात जाणारे नेते राजकारणातले जोडे बाहेर ठेवून जात असतील तर आक्षेप नसावा."
आता याच नीलम गोऱ्हे संमेलनातल्या कलाप्रदर्शनाच्या उद्घाटनाला येणार आहेत. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचे नेते साहित्य संमेलनातल्या कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमला येतील अशी चिन्ह आहेत.
महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची नावं कार्यक्रम पत्रिकेत आहेत.
अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, बच्चू कडू हे संमेलनातल्या परिसंवादात सहभागी होणार आहेत.
यावरूनही आता वाद पेटताना दिसतोय. युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर यांनी म्हटलंय की, "नाशिकच्या संमेलनात राजकीय नेते चालतात मग उस्मानाबादच्या संमेलनात का नाही याचा जाब आम्ही ठाले-पाटलांना विचारणार आहोत."
जावेद अख्तरांना आमंत्रित केल्यामुळे वाद
या साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून जावेद अख्तर आणि गुलजार यांची नावं चर्चेत होती पण काही हिंदुत्ववादी संघटनांनी या नावांना विरोध केल्यामुळे आता जावेद अख्तरांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं आहे.
आता हिंदू जनजागृती समितीने 'मराठी न येणाऱ्या' तसंच हिंदू राष्ट्राचे समर्थन करणाऱ्या 'हिंदू तालिबान म्हणणाऱ्या' जावेद अख्तरांना या साहित्य संमेलनात का बोलावलं असा प्रश्न विचारत त्यांच्या येण्यावर आक्षेप घेतला आहे.

फोटो स्रोत, Twitter
"पन्नास वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी न शिकलेल्या व्यक्तीला मराठी साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणं हा मराठीचा अपमान आहे," असं या संघटनेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
'विश्वास पाटलांवरचे आरोप माहिती नाहीत'
संमेलनाचे उद्घाटक म्हणून सरतेशेवटी विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. पण विश्वास पाटील यांच्यावर काही आरोपही झाले आहेत. अशा वादग्रस्त व्यक्तीला तुम्ही संमेलनाचा उद्घाटक म्हणून का बोलावलं? या प्रश्नाचं पत्रकार परिषदेत उत्तर देताना आयोजक मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर म्हणाले की, "त्यांना साहित्यिक म्हणून बोलावलं आहे, त्यांच्यावरच्या आरोपांची मला माहिती नाही."
निमंत्रण पत्रिकेत संमेलनाध्यक्षांचं नाव कुठे?
एकतर संमेलनाच्या निमंत्रण पत्रिका उशिरा छापल्या. त्या महाराष्ट्रातल्या निमंत्रितांपर्यंत वेळेत पोचतील का हा प्रश्न असतानाच आता संमेलनाध्यक्षांचं नाव त्या पत्रिकेवर शोधण्याची वेळ आली आहे.

फोटो स्रोत, Facebook
जयंत नारळीकर नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. निमंत्रण पत्रिका पाहिली तर त्यांचं नाव शोधावं लागतंय, इतर राजकीय नेते, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी, स्वागत समितीतले इतर सदस्य सगळ्यांची नावं ठसठशीत दिसतात पण संमेलनाध्यक्षांचं नाव दिसतच नाही.
जेष्ठ लेखिका वीणा गवाणकर यांनीही या निमंत्रण पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकून 'संमेलनाध्यक्षांचं नाव चटकन दिसत नाही, कृपया शोधून द्या,' अशी पोस्ट केली आहे.
एकंदर काय तर नकटीच्या लग्नाला येतात तशी सतराशे विघ्नं या साहित्य संमेलनाला आली आहेत. त्यातली अनेक स्वतःच्या हाताने ओढावून घेतली आहेत.
गेलं वर्षभर साहित्य संमेलनावरून कलगीतुरा रंगतोय. आता आठ दिवसांवर साहित्य संमेलन आलंय आणि 'जब वी मेट'मधल्या करीना कपूरसारखं प्रत्येक नाशिककर हात जोडून म्हणतोय, "अब कोई नई बात नही बाबाजी!"
हेही वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








