ममता बॅनर्जींचा 'तृणमूल' पक्ष काँग्रेसचं राजकीय स्थान मिळवू शकेल?

माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

फोटो स्रोत, FACEBOOK/KIRTI AZAAD

फोटो कॅप्शन, माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
    • Author, सलमान रावी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली

देशाच्या राजकारणात काँग्रेसची जागा 'तृणमूल काँग्रेस' घेईल का, याबाबत सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी रांगा लावल्या आहेत. मग ते कीर्ती आझाद असो किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले कमलापती त्रिपाठी यांचे नातू राजेश त्रिपाठी.

ज्येष्ठ काँग्रेस नेते असलेले संतोष मोहन देव यांची मुलगी सुष्मिता देव आणि अशोक तंवर यांच्या नावाचाही तृणमूलचा हात हाती घेतलेल्या नेत्यांच्या नावामध्ये समावेश आहे.

याबरोबरच तृणमूल कांग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये जनता दल (युनायटेड) चे पवन वर्मा यांचाही समावेश आहे. मात्र केवळ काँग्रेस पक्षानंच त्यांच्या नेत्यांच्या तृणमूल काँग्रेसमधील प्रवेशावर थेट टीका केली आहे.

खासदार अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर थेट 'भाजपशी हात-मिळवणी' केल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष एकजुटीनं आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी प्रयत्न करतील, यावर ममता बॅनर्जी आधी राजी होत्या असं चौधरी म्हणाले. पण, त्यांचे पुतणे आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना ईडीनं नोटिस पाठवली होती, त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या वागण्यात बदल झाल्याचा आरोपही चौधरी यांनी केला.

मात्र, राजकीय विश्लेषकांनी अधीर रंजन चौधरी यांच्या या दाव्यापेक्षा वेगळं मत व्यक्त केलं आहे. तृणमूल कांग्रेस आणि विशेषतः ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं देशातील इतर राज्यांमध्ये पाय पसरण्याची घाई करत आहेत, त्यावरून त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे जाणवत आहेत, असं अभ्यासकांचं मत आहे.

कोलकात्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक निर्माल्य मुखर्जी यांच्या मते, "ममता बॅनर्जी सध्या जे करत आहेत, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलं होतं. सलग तीन वेळा मुख्यमंत्री बनल्यानंतर मोदींची महत्त्वाकांक्षा जागृत झाली आणि त्यांनी प्रादेशिक राजकारणातून राष्ट्रीय राजकारणाकडे मोर्चा वळवला, असं ते म्हणाले."

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, AITCOFFICIAL

"ममता बॅनर्जीदेखील सध्या मोठ्या विजयाच्या यशावर स्वार आहेत. त्यामुळं त्यांना स्वतःला पश्चिम बंगालपर्यंत मर्यादित ठेवायचं नाहीये. पश्चिम बंगालमध्ये जे मिळवायचं होतं, ते त्यांनी मिळवलं आहे," असं निर्माल्य मुखर्जी म्हणाले.

विरोधकांमध्ये असलेल्या पक्षांमध्ये एकी नसल्यामुळं काँग्रेसला मुख्य विरोधी पक्षाची भूमिका बजावता येत नसल्याचं विश्लेषकांचं मत आहे. पक्षाला अंतर्गत कलहाचा सामना करावा लागत आहे, तसंच अनेक नेत्यांची बंडखोर वृत्तीही कायम आहे.

ममतांनी आधीही दिले आहेत संकेत

अशा संपूर्ण परिस्थितीत काँग्रेस द्विधा मनस्थितीत आहे. ममता बॅनर्जींनी यापूर्वीच अनेकवेळा राष्ट्रीय राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत.

त्यांनी वाराणसीमधून लोकसभा लढवण्याची इच्छाही व्यक्त केली होती, असं ज्येष्ठ पत्रकार जयशंकर गुप्त म्हणाले.

"त्यावेळी त्यांच्या पक्षानं इतर राज्यांमध्ये संघटनेचा विस्तार करण्याबाबत विचार केला नव्हता. त्यांचं संपूर्ण लक्ष पश्चिम बंगालच्या राजकारणावर केंद्रीत होतं. त्याठिकाणी त्यांनी डावे पक्ष आणि काँग्रेसला राजकीयदृष्ट्या अगदी मागे ढकललं आहे," असंही गुप्त म्हणाले.

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, @AITCOFFICIAL

त्यांच्या मते, काँग्रेसमध्ये आता भाजपला आव्हान देण्याची किंवा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विरोधकांचं नेतृत्व करण्याची क्षमता शिल्लक नसल्याचं राजकीय वर्तुळात जणू ठाम झालं आहे.

"काँग्रेसची संघटना आणि त्यांच्या धोरणात असलेल्या या कमतरतेचाच पूर्ण फायदा उचलण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी करत आहेत. त्यामुळंही नेते तृणमूल काँग्रेसकडे आकर्षित होत आहेत. कारण ममता बॅनर्जी कोणालाही राज्यसभेची खासदारकी किंवा दुसरं महत्त्वाचं पद देऊ शकतात," असंही त्यांनी सांगितलं.

ममता बॅनर्जी या सध्या काँग्रेसचा पर्याय बनण्याचा प्रयत्न करत असल्या तरी, काही काळात भाजपलाही त्यांच्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो, असं अभ्यासकांचं मत आहे.

भाजपमधीलही काही नाराज नेत्यांना तृणमूलकडे जाणारा मार्ग साद घालत असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. यामध्ये यशवंत सिन्हा आधीच सहभागी झाले आहत, तर तृणमूल काँग्रेसही अनेक 'नाराज' भाजप नेत्यांच्या संपर्कात आहे.

केवळ काँग्रेसच नव्हे तर, भाजपसमोरही ममतांचं मोठं आव्हान आहे. त्याची झलक नुकत्यात झालेल्या 13 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये पाहायला मिळू शकते, असं अभ्यासक म्हणत आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

गेल्या महिन्यात देशभरात लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 29 जागांवर पोटनिवडणुका झाल्या होत्या. विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला 7 तर काँग्रेसला 8 जागा मिळाल्या. इतर ठिकाणी प्रादेशिक पक्षांचा वरचष्मा राहिला.

लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही हिमाचल प्रदेशच्या प्रतिष्ठीत मंडी मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळं भाजपसाठी हे निकाल आव्हानात्मक असल्याचं सांगण्यात आलं.

पण तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगालबाहेर राजकीय विस्तार करण्याची ही पहिली वेळ नाही, असं निर्माल्य मुखर्जी म्हणाले.

2012 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचं उदाहरण त्यांनी दिलं. त्यावेळी मथुरा जिल्ह्यातील माँट विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उममेदवार श्याम सुंदर शर्मा विजयी झाले होते. पण नंतर त्यांनी बहुजन समाज पार्टीबरोबर हातमिळवणी केली, असं त्यांनी सांगितलं.

दहा राज्यांत तृणमूलचा विस्तार?

निर्माल्य मुखर्जी यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, 2024 मधील आगामी लोकसभा निवडणुकांपर्यंत तृणमूल काँग्रेस दहा राज्यांमध्ये प्रभाव निर्माण करेल. तृणमूलला सध्या मुख्य विरोधी पक्षाचं स्थान मिळवायचं आहे. त्यामुळं सध्या ते भाजपला आव्हान देत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

मात्र, जय शंकर गुप्त यांच्या मते, केवळ दोन वर्षात हे घडणं शक्य नाही. कारण लोकसभेच्या किमान 50 टक्के जागांवर काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे.

मात्र, असं असलं तरीही, ममता बॅनर्जी राजकीयदृष्ट्या अखिलेश यादव, तेजस्वी यादव, एमके स्टॅलिन आणि नवीन पटनायक या पक्षांच्या मदतीनं मुख्य विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवण्यात यशस्वी ठरू शकतात, असंही त्यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)