पश्चिम बंगाल : ममता बॅनर्जी यांनी 18 वर्षांपूर्वी घेतली होती 'ही' शपथ

फोटो स्रोत, ARKO DATTA
- Author, प्रभाकर मणि तिवारी
- Role, कोलकात्याहून, बीबीसी हिंदीसाठी
तारीख : 12 मे 2011
स्थळ : कोलकात्याच्या कालीघाटमधलं ममता बॅनर्जींचं दोन खोल्यांचं, कच्च्या भिंतींचं कौलारू घर
2011 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जसजसे स्पष्ट होत होते, तसतसा त्या घराबाहेर जमलेल्या तृणमूल काँग्रेसच्या हजारो समर्थकांचा उत्साह शिगेला पोहोचत होता. पण या सगळ्यात ममता बॅनर्जी मात्र शांत होत्या.
काँग्रेससोबतचं नातं तोडून त्यांनी स्वतःचा पक्ष तयार केल्याला 13 वर्षं उलटली होती. डाव्या पक्षांना सत्तेपासून दूर करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होत होतं. सोबतच त्यांनी घेतलेली एक जुनी शपथही पूर्ण होणार होती. तरीही ममता बॅनर्जी शांत होत्या.
तृणमूल काँग्रेस (TMC) मोठ्या बहुमताने सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यानंतर ममतांनी आनंदोत्सव करण्याऐवजी पुढची धोरणं ठरवायला सुरुवात केली. तेव्हा त्या केंद्रात रेल्वे मंत्री होत्या आणि त्यांनी ही विधानसभा निवडणूक लढवली नव्हती.
निकाल जाहीर झाल्यानंतर ममतांनी ती रात्र पूर्ण जागून त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांसोबतच सरकार स्थापनेचा आराखडा बनवला. ममता बॅनर्जींना जवळून ओळखणाऱ्या सोनाली गुहा यांनी ही आठवण सांगितली होती. आता मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज होत सोनाली बॅनर्जी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरची ममतांची प्रतिक्रियाही संयत होती. त्या म्हणाल्या होत्या, "हा माँ, माटी और मानुष (आई, जन्मभूमी आणि स्थानिक लोक) यांचा विजय आहे. बंगालच्या लोकांसाठी हा साजरा करण्याचा क्षण आहे. पण हा दिवस येण्यासाठी गेली तीन दशकं ज्यांनी बलिदान दिलं, त्यांचं स्मरण आपण करायला हवं."
18 वर्षांपूर्वी घेतलेली शपथ
ममतांनी केलेला कोणता पण निकालाच्या दिवशी पूर्ण होत होता?
जुलै 1993. ममता बॅनर्जी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. राज्य सचिवालय रायटर्स बिल्डिंग आंदोलनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केला. यात 13 तरूण मारले गेले.
त्यावेळी ममता बॅनर्जीही जखमी झाल्या होत्या. पण त्याआधीही काही घडलं होतं. त्याचवर्षी 7 जानेवारीला नदिया जिल्ह्यामध्ये एका मूकबधीर मुलीवर बलात्कार झाला. तेव्हाचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांची भेट घेण्यासाठी ममतांनी या पीडितेसोबत रायटर्स बिल्डिंगमध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या दरवाज्यासमोर धरणं आंदोलन केलं होतं.

फोटो स्रोत, STR
या प्रकरणातल्या दोषींचे राजकीय संबंध असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जात नसल्याचा ममतांचा आरोप होता. तेव्हा त्या केंद्रीय राज्यमंत्री होत्या, पण ज्योती बसूंनी त्यांची भेट घेतली नाही.
मुख्यमंत्र्यांची येण्याची वेळ झाली, तसं ममतांना तिथून हटण्यास सांगण्यात आलं. अनेकदा सांगूनही ममता तिथून न हटल्या नाहीत. तेव्हा त्यांना आणि त्या पीडितेला महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी पायऱ्यांवरून ओढत - फरफटत खाली आणलं आणि लालबाजारातल्या पोलिस मुख्यालयात त्यांना नेण्यात आलं. या झटापटीत त्यांचे कपडेही फाटले होते.
त्याच दिवशी ममतांनी शपथ घेतली - 'मुख्यमंत्री होऊनच या इमारतीत पुन्हा पाऊल ठेवायचं.' आणि ही शपथ पूर्ण करण्यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न केले. शेवटी तब्बल 18 वर्षांनी, 20 मे 2011 रोजी त्या मुख्यंमत्री झाल्या आणि त्यांनी या ऐतिहासिक लाल इमारतीमध्ये पुन्हा पाऊल टाकलं.
माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी ममतांच्या राजकारणाची इतकी चीड होती की त्यांनी कधीही सार्वजनिक भाषणामध्ये ममतांचं नावंही घेतलं नाही. ते ममतांचा उल्लेख 'ती महिला' म्हणून करत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
लढवय्या बाणा
अशा अनेक घटना ममता बॅनर्जींच्या आजवरच्या राजकीय कारकीर्दीमध्ये पाहायला मिळतात. मग तो 1990 मध्ये सीपीएमचा कार्यकर्ता लालू आलमने केलेला जीवघेणा हल्ला असो किंवा मग सिंगूरमध्ये येऊ घातलेल्या टाटांच्या प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणाविरोधातलं 26 दिवसांचं उपोषण असो.
या प्रत्येक घटना त्यांच्या राजकीय कारकीर्दीला वेगळं वळण देणाऱ्या ठरल्या.
16 ऑगस्ट 1990. काँग्रेसने बंगाल बंदची हाक दिली होती. या दरम्यान लालू आलम या सीपीएम कार्यकर्त्यांने ममतांच्या डोक्यावर काठीने वार केला होता. यामुळे त्यांच्या डोक्याला खोक पडली, पण डोक्याला बँडेज बांधून ममता पुन्हा रस्त्यावर उतरल्या.

फोटो स्रोत, DESHAKALYAN CHOWDHURY
ममतांच्या सोबत असणारे सौगत राय सांगतात, "आम्हाला तर वाटलं होतं की आता ममतांचं वाचणं कठीण आहे. पण बंगालच्या लोकांसाठी काहीतरी करण्याची आणि जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यानेच त्या बचावल्या."
पत्रकार सुतपा पाल यांनी 'दीदी : द अनटोल्ड ममता बॅनर्जी' या नावाचं ममता बॅनर्जींचं चरित्र लिहीलं आहे. त्या सांगतात, "ममता देशातल्या खंबीर महिला नेत्यांपैकी एक आहेत."
या पुस्तकात त्यांनी लिहिलंय, "राजकारणाचं वेगळं स्वरूप आणि लढवय्या बाण्यामुळे दीदींनी आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी त्यांच्या कारकीर्दीमध्ये साध्य केल्या. यामध्ये डाव्या पक्षांचं सरकार धुळीला मिळवण्याचाही समावेश आहे."
ममतांच्या राजकीय प्रवासावर 'डीकोडिंग दीदी' नावाचं पुस्तक लिहीणाऱ्या पत्रकार दोला मित्र सांगतात, "दीदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जींविषयी लोकांना जितकं कुतुहल आहे तितकं देशातल्या इतर कोणत्याही महिला नेत्यांविषयी नाही. हा त्यांच्या जादुई व्यक्तिमत्वाचा प्रभाव आहे."
या दोन्ही पुस्तकांमध्ये ममतांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते 2011साली त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री होईपर्यंतचा प्रवास आहे.
राजकीय विश्लेषक प्रा. समीरण पाल सांगतात, "साधेपणा ममतांच्या आयुष्याचा एक भाग आहे. पांढरी सुती साडी आणि साधी चप्पल यांच्याशी त्यांनी अगदी केंद्रात मंत्री किंवा खासदार असतानाही कधी फारकत घेतली नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांच्या कपड्यांमध्ये - जीवनशैलीमध्ये बदल झाला नाही. खासगी वा सार्वजनिक आयुष्यामध्येत त्यांची राहणी आणि वागणूक याबद्दल बोट दाखवायला वाव नाही.

फोटो स्रोत, DESHAKALYAN CHOWDHURY
ममतांचं असं जमिनीवर असणं हीच त्यांची सगळ्यात मोठी खासियत असल्याचं प्राध्यापक पाल सांगतात. मग ते सिंगूरमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ धरणं आंदोलन आणि आमरण उपोषण असो किंवा मग नंदीग्राममध्ये पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या लोकांच्या हक्कांसाठीची लढाई असो. ममतांनी कायम मैदानात उतरून लढा दिलाय.
रस्त्यापासून ते सचिवालयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास
तृणमूल काँग्रेसची निर्मिती होण्याआधीपासूनच्या काळापासून ममता बॅनर्जींचं राजकारण जवळून पाहणारे आणि त्याचं वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार तापस मुखर्जी सांगतात, "पुन्हा-पुन्हा कोसळूनही पुन्हा उभं राहणं हा ममतांचा स्वभाव आहे. सध्या राजकारणात असणाऱ्या इतर कोणत्याही नेत्यामध्ये ही वृत्ती पहायला मिळत नाही. हार झाल्यामुळे घाबरून जाण्याऐवजी त्या दुप्पट शक्ती आणि उत्साहानिशी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला लागतात."
2006च्या विधानसभा निवडणुकांचं उदाहरण मुखर्जी यासाठी देतात. त्यावेळी ममतांचा पक्ष सत्तेत येणार असं मीडियापासून ते राजकारण्यांपर्यंत सगळ्यांनाच वाटलं होतं.
खुद्द ममतांनी मेदिनीपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना आता पुढची भेट रायटर्स बिल्डिंगमध्ये होईल असं दोन बोटं उंचावत विजयाची खूण करत म्हटलं होतं. पण पक्षाच्या प्रचारसभांना मोठी गर्दी होऊनही पक्षाला ते यश मिळालं नाही.
डाव्या पक्षांनी 'सायंटिफिक रिगिंग' केल्याचा आरोप तेव्हा ममतांनी केला होता. त्याच दिवसापासून त्या 2011च्या निवडणुकांच्या तयारीला लागल्या. काही काळानेच सरकारने नंदीग्राम आणि सिंगूरमधल्या जमीन अधिग्रहणाबद्दल घेतलेल्या निर्णयांमुळे ममतांना एक मोठा मुद्दा मिळाला.

फोटो स्रोत, The India Today Group
मुखर्जी सांगतात, "2004च्या लोकसभा निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या एकमेव खासदार होत्या. पण 2009 मध्ये त्यांनी पक्षाच्या खासदारांची संख्या 19पर्यंत नेली."
काँग्रेसमधले अहंकाराचे वाद आणि वैचारिक मतभेदांनंतर ममता बॅनर्जींनी वेगळं होत नवीन पक्ष स्थापन केला आणि राज्यात वर्षानुवर्षं पाळमुळं रोवून असलेल्या डाव्या सरकारला केवळ 13 वर्षांमध्येच चितपट करत रस्त्यावरच्या आंदोलनांपासून सचिवालयामध्ये पोहोचण्याची किमया केली. ही गोष्ट फारशी पहायला मिळत नसल्याचं त्यांचे विरोधकही मान्य करतात.
ममता बॅनर्जी खंबीर असल्याचं त्यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत करणाऱ्या सोमेन मित्रांनीही मान्य केलं होतं. नंतर ते काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये दाखल झाले आणि खासदारही झाले.
तृणमूल काँग्रेसविषयी दीर्घकाळा वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार पुलकेश घोष सांगतात, "ही लढाऊ वृत्ती त्यांना त्यांचे शिक्षक-स्वातंत्र्यसैनिक वडील, प्रमिलेश्वर बॅनर्जींकडून मिळाली आहे. या गुणांच्या आधारेच त्यांनी 1998मध्ये काँग्रेससोबतचं नातं तोडत तृणमूल काँग्रेसची स्थापना केली आणि या राज्यामध्ये दशकानुदशकं रुजलेल्या डाव्या आघाडीचं सरकार फक्त 13 वर्षांमध्ये उलथवत स्वतःच्या पक्षाला सत्तेत आणलं."

फोटो स्रोत, The India Today Group
पुलकेश पुढे सांगतात, "2016च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूलच्या जागाही वाढल्या आणि मतंही. ही देखील ममतांचीच जादू होती. सिंगूर आणि नंदीग्राममध्ये जमीन अधिग्रहणाच्या विरोधात केलेल्या मोठ्या आंदोलनांमुळे ममतांची प्रतिमा एक लढवय्या नेता म्हणून निर्माण झाली. सत्ता केंद्र असणाऱ्या रायटर्स बिल्डिंगचे दरवाजे तृणमूलसाठी खुले करण्याचं कामही याने केलं."
राजकीय कारकीर्द
1976साली वयाच्या 21व्या वर्षी ममता बॅनर्जी महिला काँग्रेसच्या महासचिव झाल्या आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.
1984मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा रिंगणात उतरणाऱ्या ममतांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे ज्येष्ठ नते सोमनाथ चॅटर्जींना पराभवाचा धक्का देत आपली संसदेतली खेळी सुरू केली.
राजीव गांधी पंतप्रधान असतानाच्या काळात त्यांना युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव करण्यात आलं.
1989च्या काँग्रेसविरोधी लाटेमध्ये त्या निवडणूक हरल्या, पण हताश न होता त्यांनी सगळं लक्ष बंगालच्या राजकारणावर केंद्रित केलं.
1991साली त्या पुन्हा लोकसभेत निवडून गेल्या आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

फोटो स्रोत, DESHAKALYAN CHOWDHURY
त्यावर्षी निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांना युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. पण केंद्रामध्ये फक्त 2 वर्षं मंत्रिपदावर राहिल्यानंतर ममतांनी केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड ग्राऊंडवर एक मोठी सभा घेतली आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राज्यामधल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अत्याचारांना बळी पडलेल्या काँग्रेसवासियांच्या सोबत आपल्याला रहायचं असल्याचं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं.
बंगालच्या सत्तेपासून डाव्या पक्षांना दूर करणं हे ममतांचं सुरुवातीपासूनच एकमेव उद्दिष्टं होतं, असं घोष सांगतात. यासाठी त्यांनी अनेकदा आपले सहकारी बदलले.
कधी त्या केंद्रात एनडीएसोबत गेल्या तर कधी काँग्रेससोबत. 2012मध्ये टाईम मासिकाने त्यांचा जगातल्या सगळ्यात प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश केला.
तसं पहायला गेलं, तर ममतांच्या राजकीय प्रवासात अशा अनेक वादग्रस्त घटना घडलया ज्यामुळे त्यांची प्रतिमा एक लहरी, संतापी आणि आत्मप्रशंसेत मग्न राजकारणी म्हणून उभी राहिली.
स्वतःवरची टीका सहन न होण्याचे आणि हुकूमशाही केल्याचे आरोपही ममतांवर होत राहतात. सोबतच पक्षामध्ये आपला भाचा अभिषेक बॅनर्जीला त्या बढावा देत असल्याचे आरोपही झाले. भ्रष्ट नेत्यांना संरक्षण देण्यासोबतच ममतांवर अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत.
पण त्यांच्यावर लावण्यात आलेला सगळ्यात गंभीर आरोप म्हणजे त्या अल्पसंख्याकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात.
एक राजकारणी असण्यासोबतच ममता एक कवी, लेखिका आणि चित्रकारही आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतःची चित्रं विकून पक्षाच्या प्रचारासाठी लाखो रुपये उभे केले होते.

फोटो स्रोत, RAVEENDRAN
पण नंतर त्यांचीही चित्रं विकत घेणाऱ्यांविषयी सवाल उपस्थित करण्यात आले आणि विरोधी पक्षाने ममतांना लक्ष्य केलं. ही चित्र घेणाऱ्यांमध्ये राज्यातल्या अनेक चिटफंड कंपन्यांचे मालक होते.
मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कविता आणि कथांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. आपल्या भाषणामध्येही त्या गुरुदेव रविंद्रनाथ टागोर आणि शरदचंद्र चॅटर्जींचे दाखले देत असतात.
पश्चिम बंगालमध्ये आता निवडणुका होतायत. आणि चहुबाजूंनी आव्हानं असताना ममता या वेळी सत्तेची हॅटट्रिक साधणार का, असा सवाल विचारला जातोय. मुकुल राय आणि शुभेंदु अधिकारींसह अनेक खंदे सहकारी यावेळी त्यांच्यासोबत नाहीत.
तापस मुखर्जी म्हणतात, "ममतांची ताकद म्हणजे स्वतः ममताच आहेत. आतापर्यंतचं त्यांचं राजकीय करिअर पाहता त्यांना कमी लेखणं चुकीचं ठरू शकतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)








