पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकः पश्चिम बंगालमध्ये भाजपाविरोधात सगळे पक्ष एकत्र येतील का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रभाकर मणि तिवारी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, कोलकात्यामधून
पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपविरोधात तृणमूल कॉंग्रेस, डावे पक्ष आणि कॉंग्रेस एकत्र येऊ शकतात? भाजपचा विजयरथ थांबवण्यासाठी या तिनही पक्षांची एकजूट शक्य आहे? भाजप उमेदवाराविरोधात बंगालमधील प्रत्येक जागेवर या आघाडीचा उमेदवार असेल?
भाकप (माले) चे महासचिव दीपंकर भट्टाचार्य यांच्या सूचनेवर गांभीर्याने लक्ष दिलं तर, पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं चित्र अशा प्रकारे असेल असं पहायला मिळू शकतं.
मात्र, पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षाच्या नेत्यांची वागणूक पाहिली तर, डाव्या नेत्यांनी बंगालमध्ये सर्वपक्षीय एकजूट विरोधी भाजप अशा चित्रावर केव्हाच पाणी सोडल्याचं पाहायला मिळत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता, दीपंकर भट्टाचार्य यांच्या विधानाने बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे.
दीपंकर यांच्या मतानुसार, डाव्या पक्षांनी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपला नंबर एकचा शत्रू मानून निवडणुकीची रणनीती आखली पाहिजे. यासाठी गरज पडल्यास तृणमूल कॉंग्रेससोबत हातमिळवणी शक्य आहे.

फोटो स्रोत, Nurphoto
मात्र, दीपंकर भट्टाचार्य यांच्या सूचनेला डाव्या पक्षांनी स्पष्ट नकार दिला आहे. तर, दुसरीकडे तृणमूल कॉंग्रेसने या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे.
दीपंकर यांची उडवली खिल्ली
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) नेते दीपंकर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली बिहामध्ये डाव्या पक्षांनी 19 पैकी 12 जागांवर विजय मिळवला.
बिहारमध्ये डाव्या पक्षांना यश मिळालं असलं तरी, पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांचे नेते निवडणुकीचं हे नवं मॉडेल मानण्यासाठी अजिबात तयार नाहीत. डाव्यापक्षांचे अध्यक्ष विमान बसू सांगतात, "बंगालचं एक वेगळं मॉडेल आहे. या राज्यात बिहार मॉडेलचा वापर करण्याची गरज नाही."

फोटो स्रोत, FACEBOOK
दीपंकर म्हणतात, बंगालमध्ये सर्व डाव्या विचारसरणीचे पक्ष भाजपपेक्षा तृणमूल कॉंग्रेसलाच विधानसभा निवडणुकीत आपला प्रमुख शत्रू मानून पुढे चालत आहेत. त्यांनी बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत हातमिळवणी करण्यासाठी काहीच हरकत नाही असे संकेत दिले आहेत.
दीपंकर यांच्या सांगण्यानुसार, आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की देशातील लोकशाही आणि नागरिकांसाठी भाजप सर्वात प्रमुख शत्रू आहे. तृणमूल कॉंग्रेस आणि कॉंग्रेस शत्रू नाहीत.
दीपंकर यांच्या या वक्तव्यानंतर बंगालमधील अलीमुद्दीन स्ट्रीटवर असलेल्या माकप मुख्यालयात चलबिचल सुरू झाली आहे.
विमान बसू यांच्यासोबत अनेक डाव्या नेत्यांनी दीपंकर यांच्या वक्तव्याबाबत त्यांची खिल्ली उडवली आहे.
बंगाल बिहारपेक्षा वेगळं राज्य
त्यांच्या म्हणण्यानुसार, दीपंकर यांना बंगालच्या राजकारणाबद्दल फारशी माहिती नाही.
माकपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, "भट्टाचार्य बंगालमधील डाव्या विचारसरणीच्या नेत्यांवर दबाव टाकण्याच्या रणनीतीने अशी वक्तव्य करत आहेत. जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जास्त जागा मिळतील. बिहारमध्ये चांगलं यश मिळालं म्हणून अशी वक्तव्य करणं योग्य नाही. पश्चिम बंगालमधील राजकारण बिहारच्या तुलनेत खूप वेगळं आहे."
विमान बसु यांनी बुधवारी मालदामध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं, "भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस दोन्ही जातीयवादी पक्ष आहेत. अशा परिस्थितीत बंगालच्या निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेससोबत निवडणुक किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत आघाडी होऊ शकत नाही. डावेपक्ष याठिकाणी तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप दोघांचा मुकाबला करतील. तृणमूल कॉंग्रेसचा कोणताही आदर्श नाही किंवा नैतिकता नाही. बंगालमध्ये भाजपला तेच घेऊन आले आहेत."
माकपच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य मोहम्मद सलीम सांगतात, "दुर्बिणीतून बंगालच राजकारण पहाणाऱ्या लोकांना जमिनीवर काय परिस्थिती आहे याची माहिती नाही. तृणमूल कॉंग्रेसची स्थापना करून ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबत हातमिळवणी केली होती. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा शिरकाव आणि डाव्या पक्षांची वाताहत होण्यामागे ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत."

फोटो स्रोत, DIBYANGSHU SARKAR
भाजप शांत आहे
एकीकडे, डावे पक्ष या आघाडीला विरोध करत असताना. तृणमूल कॉंग्रेसने या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे.
तृणमूल कॉंग्रेसचे प्रवक्ते सौगत राय यांच्या सांगण्यानुसार, "एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढाई राजकीयदृष्ट्या खूप गंभीर चूक ठरेल. नेपोलियन आणि हिटलरला खूप नुकसान झाल्यानंतर त्यांची चूक उमजून आली. मात्र बंगालमध्ये डावे पक्ष ही गोष्ट कधी समजतील? जेव्हा सर्वांसाठी खूप उशिर झालेला असेल?"
सौगत राय यांच्या माहितीनुसार, राष्ट्रहित लक्षात ठेऊन डाव्या पक्षांनी बंगालमध्ये भाजपविरोधी लढ्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या ममता यांची मदत केली पाहिजे.
दुसरीकडे भाजपने दीपंकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष सांगतात, "आगामी निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे. बिहारनंतर बंगालमध्ये दोन तृतीयांश बहुमत मिळवून सत्ता काबिज करणं आमचं लक्ष आहे. बिहार निवडणूक निकालांचा पक्षाला बंगालमध्ये नक्की फायदा मिळेल."
राजकीय विश्लेषकांच्या मते, डाव्या पक्षांचे नेते दीपंकर यांच्या सूचनेचा विरोध करत आहेत. मात्र ही सूचना अयोग्य अजिबात नाही.
34 वर्ष बंगालमध्ये एकहाती राज्य करणाऱ्या सत्ताधीश डाव्या पक्षांच्या पायाखालून हळूहळू जमीन सरकू लागली आहे. ही परिस्थिती पहाता, आपलं राजकीय अस्तित्व टिकण्यासाठी त्यांनी योग्य रस्ता निवडला पाहिजे.
दीपंकर यांची सूचना पक्ष ऐकतील?
पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीबाबत बोलताना राजकीय विश्लेषक विश्वनाथ पंडित सांगतात, "2011 नंतर राज्यातील निवडणुकीत डाव्या पक्षांची घसरण सुरू झाली. डाव्या पक्षांच्या पायाखालील जमीन सरकणं सरू झालंय. त्यांच्याकडे अजमितीस 8-10 टक्के मतं आहेत. मात्र, त्यांनी चेहरा, नेता आणि जनसमर्थन नसलेल्या कॉंग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली आहे.
भाजपने मोठ्या वेगाने राजकीय पटलावर आपली छाप प्रस्थापित केली आहे. अशा परिस्थितीत बंगालमध्ये बिहार मॉडेलचा वापर करण्यात चूक काही नाही. निवडणुकीत विजय-पराभव हाच सर्वात महत्त्वाचा आहे. निवडणूक निकालानंतर रणनीती या शब्दाला काहीच अर्थ उरत नाही."
बंगाली वृत्तपत्र आनंद बाझार पत्रिकेसाठी डावे पक्षांचं राजकारण जवळून पहाणारे वरिष्ठ पत्रकार तापस मुखर्जी सांगतात, "डाव्या पक्षांचे नेते बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाकडून झालेला पराभव अजूनही पचवू शकलेले नाहीत.
ममता बॅनर्जीदेखील डाव्या पक्षांवर टीका-टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाही. राजकारणात मित्र आणि शत्रू कायमचे नसतात. मात्र, सद्य परिस्थितीत दीपंकर यांच्या सूचनेवर अंमलबजावणी होणं शक्य दिसत नाही."
2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत हातमिळवणी करूनही बंगालमध्ये डाव्या पक्षांची निवडणुकीचा पाटी कोरी राहिली.
मुखर्जी पुढे सांगतात, "डावे पक्ष भाजप आणि तृणमूल या दोन्ही पक्षांपासून दोन हात लांब राहून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तृणमूल कॉंग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जीदेखील भाजप आणि डाव्या पक्षांपासून दोन हात लांब राहाणं अधिक पसंत करतात. असं असूनही त्यांच्या पक्षाला डाव्या पक्षांच्या समर्थनाबाबत काही आक्षेप नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)








