असदुद्दीन ओवैसी- शिवसेना सेक्युलर आहे का? 1992ला काय झालं विसरलात?#5मोठ्याबातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1. शिवसेना सेक्युलर आहे का? 1992ला काय झालं विसरलात?- असदुद्दीन ओवैसींचा सवाल

ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात प्रलंबित असतानाच आता MIM ने मुस्लिम आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत सोलापुरात पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला.

11 डिसेंबरला मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी वाचवण्यासाठी 'चलो मुंबई'ची हाक देण्यात आलेली आहे.

"MIM ला मत दिल्यास त्याचा फायदा सेना - भाजपला होईल असं राष्ट्रवादी आणि काँग्रेसने म्हटलं होतं. MIM हा भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं होतं. पण सत्ता स्थापन करण्यासाठी हेच शिवसेना - राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले, त्यांनी मुसलमानांना धोका नसल्याचं म्हटलं.

शिवसेना सेक्युलर नाही. ते भाजपसारखेच जातीयवादी आहेत. पवार साहेब, सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? राहुल गांधी, सांगा शिवसेना सेक्युलर आहे का? तुम्ही विसरलात का 1992ला काय झालं?" असा सवाल या सभेत असदुद्दीन ओवैसींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला केलाय.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

2. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सी विधेयक सादर होणार

29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये क्रिप्टोकरन्सी विधेयक सादर केलं जाणार आहे. या अधिवेशनात एकूण 26 विधेयकं सादर केली जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी बोलताना जगभरातल्या देशांनी क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण आणणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.

भारतात क्रिप्टोकरन्सी लाँच करण्यासाठी आरबीआयने तयारी सुरू केली असून संसदेत मांडण्यात येणाऱ्या विधेयकाद्वारे क्रिप्टोकरन्सीतली गुंतवणूक, डेव्हलपर, मायनिंग याविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचं एबीपी माझाने दिलेल्या बातमीत म्हटलंय.

3. मोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत - जयंत पाटील

नरेंद्र मोदी सहजासहजी माघार घेणारे नाहीत, त्यांनी माफी मागितली म्हणजे त्यांचा होमवर्क झालेला होता, ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कायदे परत आणणार असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय.

मोदींनी कायदे परत आणू नयेत यासाठी 2024मध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली पाहिजे असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

2024मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष करायचा आहे, जे येतील त्यांना येऊ द्या, त्यावर आक्षेप घेऊ नका, संख्या महत्त्वाची असते असंही जयंत पाटील यांनी पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं टीव्ही9 मराठीने बातमीत म्हटलंय.

4. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये 2 लाख रोजगार मिळणार - नितीन गडकरी

जुन्या वाहनांना रिसायकल करणाऱ्या पहिल्या स्क्रॅप प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं.

या स्क्रॅप पॉलिसीमुळे आरोग्याशी निगडीत समस्या आणि प्रदूषण कमी होईल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 10 ते 12 टक्क्यांनी वाढ होईल आणि परिणामी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये 2 लाख रोजगार मिळतील, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

भारतात ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून गाड्या चालवण्याची तयारी करण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

मारुती आणि टोयोटा यांनी मिळून सुरू केलेल्या नोएडातल्या या स्क्रॅप युनिटमध्ये दरवर्षी 24 हजार जुन्या गाड्या मोडीत काढल्या जातील.

सुरुवातीला या युनिटमधून दरमहिन्याला 2,000 वाहनं स्क्रॅप करण्यात येणार असल्याचं लोकमतने वृत्तात म्हटलंय.

5. मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा, राज्य सरकारचं अॅप आणि UTS लिंक

कोव्हिड लशीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस उलटलेल्या लोकांना मुंबई लोकलने प्रवास करता येतो. या प्रवाशांना तिकीट मिळणं सोपं जावं यासाठी आता काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या युनिव्हर्सल पासशी रेल्वेने त्यांचं युटीएस मोबाईल अॅप लिंक केलंय. त्यामुळे आता लोकल प्रवाशांना या अॅपद्वारे तिकीटं आणि मासिक पास काढता येतील.

यामुळे तिकीट खिडकीवरील गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना तिकीट काढणंही सोपं होईल.

महाराष्ट्र टाईम्सने ही बातमी दिली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)