You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
त्रिपुरा दंगलीचं नेमकं वास्तव काय आहे? बीबीसीचा विशेष रिपोर्ट
- Author, नितीन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी, त्रिपुराहून
एका सरकारी मदरशात पाच मुलं अभ्यास करायचा प्रयत्न करतायत, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती आहे. थोड्या-थोड्या वेळाने खिडकीबाहेर डोकावून पाहणाऱ्या एका वृद्ध शिक्षकाने आम्हाला पाहिलं आणि विचारलं, "सर्वकाही ठीक आहे ना साहेब? काही गडबड तर नाही?"
मदरशालगत एक छोटी मशीद आहे पण आता ती सुमसाम दिसते. मदरशाच्या तीन फुटाच्या खिडक्या मोडल्या आहेत. पंख्याच्या पाती वाकड्या-तिकड्या झाल्या आहेत आणि किमान अर्धा डझन दिवे दगडं मारल्याने फुटले आहेत.
या मशिदीच्या मागच्या बाजूला एक मुस्लीम आणि एक हिंदू कुटुंब राहतं. बीबीसीची टीम कव्हरेजसाठी तिथे पोहचली पण मागे आलेल्या त्रिपूरा पोलिसांच्या कॉन्स्टेबलला पाहून कदाचित दोन्ही घरांनी दरवाजे बंदच ठेवणं पसंत केलं.
ही परिस्थिती आहे त्रिपुरा राज्यातील धर्मनगर जिल्ह्यातील चामतिला परिसरातील. इथे स्थानिकांनी पहिल्यांदाच सांप्रदायिक हिंसा पाहिली आणि जवळून अनुभवली सुद्धा.
नेमकं काय घडलं आणि का घडलं?
ऑक्टोबर महिन्यातील अष्टमीच्या दिवशी दुर्गा पूजा सुरू असताना भारताचा शेजारील देश बांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात हिंसा भडकल्याचं समोर आलं.
चिट्टगाव जिल्ह्यातील कमिला शहरातून याची सुरूवात झाली. यानंतर बांगलादेश सरकारने अल्पसंख्याक हिंदूंना दिलासा देत भारतालाही सतर्क राहण्याचा सल्ला दिला.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटलं, "भारताने आमच्यासाठी खूप काही केलं आहे आणि त्यासाठी आम्ही आभारी आहोत. तिथे असं काही घडायला नको ज्याचा प्रभाव आमच्या देशात दिसेल आणि त्यामुळे आमच्या देशातील हिंदूंचं नुकसान होईल."
परंतु तिन्ही बाजूंनी बांगलादेशची सीमा असलेल्या त्रिपुरा राज्यात त्याचे तात्काळ पडसाद उमटले. अवघ्या दहा दिवसांत गोमती जिल्ह्यातून बातम्या येऊ लागल्या, "काही समाजकंटकांनी मशिदीत आग लावली." यानंतर सिपाहीजाला जिल्ह्यातूनही, "मशिदीवर हल्ला केल्याचा अयशस्वी प्रयत्न" झाल्याच्या बातम्या दिसू लागल्या.
दरम्यानच्या काळात राज्यातील सर्वात मोठी मुस्लीम संघटना जमात-ए-उलेमा (हिंद) यांनी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांची भेट घेतली. राज्यात हिंदू आणि मुस्लीम समुदायातील शांतीला धोका निर्माण झाल्याचं या भेटीत त्यांनी सांगितलं. सरकारने त्यांना आश्वासनही दिलं.
पानीसागर हिंसा
26 ऑक्टोबरला उत्तर त्रिपुरातील पानीसागर येथे भव्य 'प्रतिवाद रॅली' काढण्यात आली. बांगलादेशात हिंदूंविरोधातील हिंसेचा निषेध करण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
या भागातील अल्पसंख्यांक मुस्लिमांचा आरोप आहे की, सुरुवातीला शांततेत सुरू असलेल्या रॅलीने नंतर हिंसक वळण घेतलं.
बिजित रॉय या रॅलीच्या आयोजकांपैकी एक आहेत. ते विश्व हिंदू परिषद इकाईचे अध्यक्ष आहेत. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "रॅली शांततेत काढण्याचं नियोजन होतं. चामतिलापर्यंतचं वातावरण शांत होतं, आम्ही पुढे जात असताना अचनाक हालचाली सुरू झाल्या. आम्हाला वाटलं की दगडफेक झाली. हे ऐकून जमाव नियंत्रणाबाहेर गेला. आमच्या जवळ एक मशीद होती. कशीबशी आम्ही ही मशीद वाचवली."
बांगलादेशमध्ये घडलेल्या घटनांचे पडसाद भारतीय मुस्लिमांवर कसे पडले? यावर बिजित यांनी उत्तर दिलं, "इंडियन मुस्लीमांविरोधात कोणी नाही. ती तर आमची माणसं आहेत. आम्हाला जेवढे हक्क तेवढे त्यांनाही आहेत."
चामतिल येथील ज्या मशिदीला वाचवल्याचा दावा केला जात आहे, खरं तर जमावाने त्याला लक्ष्य केल्याचं दिसून येतं.
हल्ल्यापूर्वी आणि नंतर यामधला फरक आजही स्पष्ट दिसतो. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी एका दुसऱ्या मशिदीवरही काही अज्ञातांनी हल्ला केला होता.
त्रिपुरामध्ये मुसलमान अल्पसंख्याक आहेत आणि बहुतांश लोकसंख्या हिंदुंची आहे. यात मोठ्या संख्येने बांगलादेशहून आलेले हिंदू सुद्धा आहेत.
रोवा हिंसा
चामतिला मशिदीपासून जवळपास दीड किलोमिटर अंतरावर रोवा गाव आहे. याठिकाणी जमावाने कमीत कमी पाच दुकानं पेटवली.
'प्रतिवादी रॅली' आणि प्रशासनाने दावा केला होता की केवळ दोन दुकानांचं नुकसान झालं आहे पण बीबीसीने पाच दुकानांना भेट दिली आणि या माहितीची पडताळणी केली.
काही दुकानं पूर्ण किंवा निम्मी जळाली आहेत. दुकानांच्या मालकांची नावं आहेत- आमिर हुसैन, मोहम्मद अली तालुकदार, सनोहर अली, निजामुद्दीन आणि अमीरुद्दीन.
अमीरुद्दीन यांनी सांगितलं, "आमच्या समोर सुरुवातीला तोड-फोड केली गेली, मग लूट केली आणि दुकानाला आग लावली. मी इथेच उभा होतो मशिदीसमोर, तिथे जाणार होतो पण पोलिसांनी आम्हाला थांबवलं." अमीरूद्दीन यांचं दुकान जळून राख झालं आहे. फ्रिज सुद्धा पूर्ण जळाला आहे.
सनोहर अली सुद्धा रोवा येथे राहतात. ते म्हणाले, "हिंसा सुरू असताना आम्ही जवळच्या मशिदीमागे उभे होतो."
ते म्हणाले, "जमाव तिकडे पोहचू शकत नव्हता म्हणून त्यांनी रागात आमच्या दुकानांना आग लावली. एका दुकानाला आग लावली आणि मग बाजूच्या दुकानांची आग इकडे पसरली. या चपला, ही बॅग, छत्री सारं काही जळून राख झालं."
जिल्हा प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात आधीपासूनच सात ते आठ पोलीस कर्मचारी तैनात केले होते असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. पण 'ते अपुरे पडले' असंच दिसतं.
कदमतला येथे काय झालं?
चामतिला येथील हिंसाचाराच्या घटनांची माहिती जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगाने पसरली असं स्थानिक सांगतात. एकाबाजूला चामतिला येथे अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचत होत्या आणि दुसऱ्या बाजूला कदमतला विधानसभा क्षेत्रात मुस्लीम समुदायाचे लोक विरोधात एकत्र जमत होते.
याच दिवशी रात्री दहा वाजता कदमतला जवळ चुडाइबाडी परिसरात जमाव एकत्र आला आणि काही हिंदू कुटुंबियांच्या घरावर दगडफेक झाल्याचं समोर आलं.
सुनाली साहा यांचं यात मोठं नुकसान झालं. त्यांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या. बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "मी अभ्यास करत होते. अचानक काही लोक त्याबाजूने आले आणि हल्ला केला. आम्ही बाहेरही पडू शकत नव्हतो कारण खूप आवाज येत होता. मम्मीने दरवाजा बंद केला. पाच-दहा मिनिटांत हालचाली शांत झाल्या. मग आम्ही बाहेर पडलो पण जमिनीवर पाय ठेवता येत नव्हता एवढ्या काचा सगळीकडे पसरल्या होत्या. आम्ही पहिल्यांदाच अशा परिस्थितीला सामोरं गेलो. आम्ही खूप घाबरलो होतो."
कदमतलाचे आमदार इस्लामुद्दीन सीपीएम पक्षाचे आहेत. ते म्हणाले, "पानीसागर येथील घटनांनंतर मुस्लीम समुदायात रोष होता हे खरं आहे. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न केले."
सुरुवातीला पोलीस प्रशासन सक्रिय दिसत नव्हतं. पानीसागर इथे झालेल्या हिंसाचारानंतर प्रशासनाला जाग आली. पानीसागरच्या रॅलीनंतर कदमतला, उनाकोटि जिल्ह्यातील कैलाश शहर, धर्मनगर आणि युवराजनगर या ठिकाणी मुस्लिमांकडून प्रतिवादाला सुरुवात झाली. यानंतर पोलीस प्रशासन कामाला लागलं."
त्रिपुरातील तीन जिल्ह्यात सांप्रदायिक तणाव निर्माण झाल्याने घडलेल्या घटनांमुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
प्रशासनाने तातडीने पावलं न उचलता धीम्या गतीने काम केलं तसंच संशयितांना ताब्यात घ्यायलाही उशीर झाला असा आरोप केला जात आहे.
त्रिपुराचे (उत्तर) पोलीस अधिक्षक भानुप्रदा चक्रवर्ती यांनी हे आरोप फेटाळत बीबीसीला सांगितलं, "धर्मनगर येथील रॅलीमध्ये 10 हजार लोकांचा सहभाग होता हे खरं आहे. परंतु मशिदीला आग लावली की नाही हे अद्याप स्पष्ट नसून तपास सुरू आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. आम्ही कुठलाही भेदभाव न करता संशयितांना तातडीने ताब्यात घेतलं."
तणाव
त्रिपुरा लगत बांगलादेशची 856 किलोमीटर लांब सीमा आहे. यापूर्वी बांगलादेश येथे बहुसंख्य मुस्लिमांकडून झालेल्या हिंसेचे पडसाद इकडे काहीअंशी म्हणजेच आंदोलनाव्यतिरिक्त काही दिसले नाहीत.
1980 साली त्रिपुरामध्ये बंगाली आणि आदिवासी यांच्यात हिंसा झाली होती. यात हिंदू आणि मुस्लीम दोघांचाही सहभाग दिसला होता.
वर्ष 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सीपीएमच्या नेतृत्त्वात असलेल्या डाव्यांच्या सरकारचा पराभव केला. राज्यात डाव्यांची 25 वर्षे सत्ता होती.
राज्यात भाजपचं सरकार स्थापन झाल्यापासून 'सांप्रदायिक एकता धोक्यात आली आहे' असा आरोप आता विरोधक करत आहेत.
बीबीसीने हाच प्रश्न त्रिपुरा विधानसभेचे उपसभापती आणि धर्मनगरचे आमदार बिश्वबंधु सेन यांना विचारला. मुस्लीम समुदाय दहशतीत आहे का? याविषयी त्यांच्याकडून जाणून घेतलं.
बिश्वबंधु सेन यांनी सांगितलं, "असं अजिबात नाही. भाजप सत्तेत आल्यापासून मुस्लीम समुदायाला जाणवलं की त्यांचं काहीही नुकसान नाही. आम्हाला वाटतं की जे लोक मोदींच्या विरोधात आहेत, भाजपाच्या विरोधात आहेत, बिप्लव देब यांना विरोध करतात त्यांच्यामुळे राज्यात सांप्रदायिक तणाव निर्माण होतोय."
पानीसागर हिंसेच्या दोन आठवड्यांनंतर त्रिपुरा सरकारने दोन महिला पत्रकारांना कथित भडक साहित्य पोस्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. दोन दिवसांतच त्रिपुरातील एका कोर्टाने सांप्रदायिक हिंसेचे वार्तांकन करण्यासाठी पोहचलेल्या या दोन पत्रकारांना जामीन मंजूर केला.
ज्येष्ठ भाजप नेते बिश्वबंधु सेन यांना आम्ही विचारलं की, "पत्रकारिता हा गुन्हा कधीपासून बनला. पत्रकार आपलं काम करत असतील, फोटो घेत असतील आणि लोकांशी बोलत असतील तर कोणताही चार्ज न लावता पत्रकारांना अटक कशी होते? ही लोकशाही आहे का?"
बिश्वबंधु सेन प्रश्नाचं थेट उत्तर देण्याऐवजी म्हटले, "लोकशाहीचं संपूर्ण स्वातंत्र्य पत्रकार घेत आहेत. राजकीय पक्ष नव्हे. अनेक लोक फेक न्यूज बनवत आहे. ही लोकशाही आहे का? काही वृत्तपत्र आणि पत्रकार नेहमी काहीतरी पसरवत असतात."
प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती वेगळी आहे. जे दावे केले जात आहेत त्यापेक्षा खूप वेगळी. खरं सांगायचं तर या घटनांमुळे त्रिपुराला धक्का बसला आहे. हिंसा प्रत्यक्षात जवळून पाहिलेल्या लोकांनाही याची जाणीव आहे आणि त्रिपुरात कधीही सांप्रदायिक तणाव निर्माण झाला नाही याचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांनाही.
जे काही घडलं त्याबाबत खेद वाटतो का? असा प्रश्न आम्ही विश्व हिंदू परिषदेचे पानीसागरचे अध्यक्ष आणि प्रतिवादी रॅलीच्या आयोजकांपैकी एक बिजित रॉय यांना विचारला. जवळपास दहा सेकंद ते थांबले आणि म्हणाले, "आम्हाला खेद वाटतो, खूप जास्त खेदजनक आहे. यापुढे आम्ही खात्री करू की असं काही पुढच्या शंभर वर्षांतही घडणार नाही."
एका लहानशा सरकारी मदरशामध्ये एकूण पाच मुलं शिकण्याचा प्रयत्न करत तर होते पण त्यांच्या चेहऱ्यावरील दहशत स्पष्ट दिसत होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)