Bitcoin Scam : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची डोकेदुखी का वाढली?

बिटक्वॉईन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, इमरान कुरेशी
    • Role, बीबीसी हिंदीकरिता

भारतातल्या पहिल्या बिटकॉईनचा घोटाळा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासाठी डोकेदुखी बनला आहे. या प्रकरणामुळे बोम्मई यांना पक्षांतर्गत तसंच पक्षाबाहेरून टीकेला तोंड द्यावं लागत आहे.

एका जेमतेम 25 वर्षांच्या हॅकरने कर्नाटकच्या बोम्मई सरकारसमोर आव्हान निर्माण केलं. श्रीकृष्ण रमेश उर्फ सिर्की असं या हॅकरचं नाव आहे.

श्रीकृष्ण रमेशने बिटकॉईन एक्सचेंड, पोकर गेम वेबसाईट आणि कर्नाटक सरकारच्या ई-शासन विभागाच्या ई-खरेदी वेबसाईट हॅक केल्या, असा त्याच्यावर आरोप आहे.

सिर्कीच्या मते, त्याने फक्त आपल्या शालेय शिक्षणादरम्यान हॅकिंग शिकली होती. पोलिसांना दिलेल्या आपल्या कबुलीजबाबात सिर्कीने म्हटलं की त्याने 2015 मध्ये हाँगकाँगच्या बिटफायनेक्स क्रिप्टोकरन्सीचं हॅकिंग केलं होतं.

त्या एक्सचेंजमधून ऑगस्ट 2016मध्ये 1 लाख 19 हजार 756 बिटकॉईन चोरी झाले होते. त्याच्यापूर्वीच एका वर्षापूर्वी सिर्कीने तिथं हॅकिंग केलं होतं.

सिर्की हा ड्रग्जशी संबंधित प्रकरणातही अनेकवेळा तुरुंगात गेला होता. अशाच एका प्रकरणात तो मागच्या आठवड्यात सुटून बाहेर आला.

पण कर्नाटकच्या तपास यंत्रणांना दिलेल्या त्याच्या जबाबांवरून तसंच तपासाच्या वेगावरून मुख्यमंत्री बोम्मई आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात राजकीय खडाजंगी सुरू झाली.

बसवराज बोम्मई

फोटो स्रोत, Getty Images

पोलिसांच्या मते, श्रीकृष्ण रमेशने केलेल्या दाव्यांची पुष्टी अद्याप होऊ शकलेली नाही. तपासाशी संबंधित एका अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं की, सिर्कीच्या दाव्यांची पुष्टी करणं ही अवघड बाब आहे.

बातम्यांनुसार, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. राज्यातील पक्षाचे लोक मला बिटकॉईन प्रकरणावरून त्रास देत आहेत, असं बोम्मई यांनी म्हटलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यासंदर्भात पक्षाच्या प्रांतीय युनिटकडे अहवाल मागितला आहे. भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी अधिकृतपणे या बातम्यांचं खंडन केलेलं नाही.

दुसरीकडे, भाजप या प्रकरणाचा तपास थंड बस्त्यात घालू पाहत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काही बड्या लोकांना वाचवण्यासाठीच हा पोलीस तपास सुरू आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या निगराणीखाली होणारा तपासच या प्रकरणातील सत्य समोर आणू शकतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार प्रियांक खर्गे यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

सिर्कीची भूमिका

पोलिसांच्या मते, श्रीकृष्ण रमेश उर्फ सिर्की याच्याकडे हॅकिंगबाबत कौशल्य आहे. मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या समोर दिलेल्या जबाबात श्रीकृष्णने आपण चौथ्या इयत्तेपासूनच हॅकिंग शिकणं सुरू केलं होतं, असं मान्य केलं. नंतर केलेल्या सायबर गुन्ह्यात त्याला ते उपयोगी पडलं.

ऑनलाईन

फोटो स्रोत, Getty Images

श्रीकृष्णच्या मते, चौथी ते दहावीदरम्यान तो ब्लॅकचॅट हॅकर्सच्या समूहाशी जोडलेला होता. इथं त्याने हॅकिंग करणं, तसंच या माध्यमातून पैसे कमवण्याच्या पद्धती शिकून घेतल्या.

यानंतर श्रीकृष्णने बंगळुरूच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेतलं. पुढे तो नेदरलँड्सला निघून गेला.

त्याने वेबसाईटच्या आत अनधिकृतपणे घुसण्याचं शिकून घेतलं. यामध्ये बिटकॉईन एक्सचेंजचाही समावेश आहे. याठिकाणी पैशांच्या मोबदल्यात बिटकॉईनचे व्यवहार केले जातात.

श्रीकृष्णच्या म्हणण्यानुसार, त्याचं स्वतःचं असं कोणतंच बँक अकाऊंट नाही. पश्चिम बंगालमधला त्याचा मित्र रॉबिन खंडेलवाल त्याच्या सगळ्या पैशांचा हिशोब ठेवतो. त्याला आपण आठ कोटी किंमतीचे बिटक्वॉईन दिले असल्याचा दावा श्रीकृष्णने केला.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, कृष्णाचे मित्र त्याला अनेक दिवस टॉप हॉटेलांमध्ये ठेवत. मित्रांनी पोकर कार्ड गेम जिंकावं यासाठीचं हॅकिंग तो याच ठिकाणी हॉटेलातून करून होता.

हाँगकाँगच्या बिटकॉईन एक्सचेंज बिटफायनेक्सला हॅकिंग करणाऱ्या सुरुवातीच्या लोकांमध्ये मी सहभागी होतो, असा दावा श्रीकृष्णने केला.

तिथून त्याने दोन हजार बिटकॉईन चोरले होते. त्यावेळी त्याची किंमत शंभर ते दोनशे डॉलर इतकी होती. उच्चभ्रू हॉटेलांमध्ये त्याने ही रक्कम उडवली, असंही श्रीकृष्णने म्हटलं.

बिटक्वॉईन

फोटो स्रोत, Getty Images

बंगळुरूत एका मॉलमध्ये झालेल्या भांडणानंतर पहिल्यांदा श्रीकृष्णची नोंद पोलिसांच्या डायरीत झाली.

फर्जी कॅफे प्रकरण या नावाने ही घटना ओळखली जाते. याठिकाणी काँग्रेस आमदार एन. ए. हारीस यांचा मुलगा मोहम्मद नालापड यांनी एका प्रभावी कुटुंबातील सदस्य असलेल्या विद्वत नामक तरूणावर हल्ला केला होता.

त्यावेळी कॅफेमध्ये राजकीय पार्श्वभूमीतील इतर अनेक मुले होती. त्यांचं नावही या प्रकरणात आलं होतं.

मुख्य मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट यांच्यासमोर दिलेल्या जबाबाद श्रीकृष्णने म्हटलं की, नेदरलँड्सवरून परतल्यानंतर त्याने ज्या-ज्या व्यक्तींशी संपर्क साधला, त्यामध्ये नालापड हेसुद्धा होते.

या प्रकरणात अनेक आरोपींसोबत श्रीकृष्ण याचंही नाव होतं. अंतरिम जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर पडला.

श्रीकृष्ण उत्तर भारतातील शहरांमध्ये फिरत राहिला. अटक टाळत राहिला.

यानंतर 2020 मध्ये तो डार्क नेटच्या माध्यमातून मागवलेल्या ड्रग्जसोबत पडकला गेला. यावेळी त्याचं नाव पुन्हा चर्चेत आलं.

ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीदरम्यानच श्रीकृष्ण रमेशने आपलं हॅकिंग कौशल्य आणि लाईफस्टाईल यांच्याबाबत सांगितलं होतं.

कृष्णाच्या या कबुलीजबाबात पोलिसांना 2019 मध्ये ई-खरेदी वेबसाईटमध्ये झालेल्या 11.5 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची कुणकुणही लागली.

या प्रकरणात हॅकर्सनी लिलावासाठी लोकांनी जमा केलेले 11.5 कोटी रुपये हॅक करून चोरले होते.

या प्रकरणाचा तपास आता ईडी करत आहे. ई-शासन विभागाच्या वेबसाईटवरून चोरलेला पैसा उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमधील एका कंपनीशी संबंधित 14 बँक खात्यांमध्य ठेवण्यात आला होता. निम्मी एंटरप्रायझेसशिवाय हा पैसा उदय ग्राम विकास संस्था, नागपूर यांच्या खात्यातही होता, असं तपासात बाहेर आलं.

या पैशाचा निपटारा करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजन करण्यात आलं होतं. हे एका मोठ्या षडयंत्राचं भाग वाटतं. कृष्णासारख्या हॅकरसोबत मिळून केलेलं हे काम एखाद्या राजकीय पक्षाकडून सर्वांना खुश करण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग तर नाही ना, अशी शंका पोलिसांना त्यावेळी आली, असं पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं.

राजकीय आरोप-प्रत्यारोप

बिटकॉईन घोटाळ्यावरून राजकीय शेरेबाजी सुरू झाली तरी विरोधी पक्ष काँग्रेसचे नेते सिद्धरमैय्या यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे.

सिद्धरमैय्या

फोटो स्रोत, Getty Images

बिटकॉईन घोटाळा प्रकरणात अनेक मोठे नेते सहभागी असल्याचा आरोप सिद्धरमैय्या यांनी पोस्टमधून केला होता.

हे प्रकरण बंद करून राजकीय नेत्यांना फायदा पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला, असा दावा सिद्धरमैय्या यांनी केला.

मुख्यमंत्री आणि सिद्धरमैय्या यांच्यात सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनंतर सिद्धरमैय्या यांनी क्राईम ब्रांचकडून दाखल एक आरोपपत्र दाखवलं. त्यामध्ये नमूद पाच हजार बिटक्वॉईनशी संबंधित प्रकरणाकडे त्यांनी बोट दर्शवलं.

सुरुवातीला हे प्रकरण ईडी आणि सीबीआय यांच्याकडे पाठवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले होते. पण नंतर काँग्रेस आणि जेडीएसच्या मागच्या सरकारनेच श्रीकृष्णची सुटका केली होती, असा आरोप त्यांनी केला. सिद्धरमैय्या यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

या प्रकरणात सर्वात आश्चर्यजनक बाब म्हणजे इतर भाजप नेते मुख्यमंत्री बोम्मई यांच्या बचावासाठी मैदानात उतरले नाहीत.

काही मंत्री मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण देत होते. पण त्यामध्ये मागच्या पडलेल्या सरकारमधून भाजपमध्ये दाखल झालेले बहुतांश नेते होते.

प्रियांक खरगे यांनी विचारलं, "भाजपचे प्रदेशाध्यक्ष नवीनकुमार कतील हे प्रत्येक लहान-मोठ्या घटनेवर प्रतिक्रिया देतात. पण या प्रकरणावर ते अद्याप शांत का आहेत?"

गेल्या आठवड्यात बोम्मई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

बिटकॉईनच्या मुद्द्यावरून कोणतीही अडचण नाही, असं ते त्यावेळी म्हणाले होते.

दरम्यान, बोम्मई हे बिटक्वॉईन घोटाळ्यात सहभागी आहेत किंवा नाही, हे आपल्याला माहीत नाही. पण या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा. दोषींना शिक्षा मिळावी, अशी आपली मागणी असल्याचं सिद्धरमैय्या यांनीही स्पष्ट केलं आहे.

सिद्धरमैय्या यांच्यासोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि आमदार प्रियांक खरगे हेसुद्धा या प्रकरणाच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

सिद्धरमैय्या आणि कुमारस्वामी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिद्धरमैय्या आणि कुमारस्वामी

सिद्धरमैय्या म्हणतात, "पोलिसांनी पत्रकार परिषदा घेतल्या. सिर्कीकडे 9 कोटी किंमतीचे बिटक्वॉईन आढळून आल्याचा दावा त्यांनी केला. बोम्मई त्यावेळी गृहमंत्री होते. त्या 31 बिटक्वाईनचं काय झालं, हे त्यांनी सांगायला पाहिजे. सध्या एक बिटक्वॉईन हे 50 लाख रुपये किंमतीचं आहे."

कर्नाटक भाजपचे प्रवक्ते कॅप्टन गणेश कर्णिक यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "भाजप या प्रकरणाच्या तपासाबाबत अत्यंत गंभीर आहे. कोणालाही वाचवण्याचा किंवा सत्य लपवण्याचा विषय नाही. पण फर्जी कॅफे प्रकरणाचा बिटक्वॉईनशी काहीतरी संबंध आहे, असं जनता दलाचे नेत एच. डी. कुमारस्वामी यांनी त्यावेळी म्हटलं होतं, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे."

कर्णिक म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा उचलल्यानंतरच पंतप्रधानांनी क्रिप्टोकरन्सीच्या मुद्द्यावर बैठक घेतली आहे.

पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह

दरम्यान, बंगळुरू पोलिसांनी गायब झालेल्या 31 बिटकॉईनसंदर्भात सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

पोलीस आयुक्त कमल पंत यांनी म्हटलं की, श्रीकृष्णच्या अकाऊंटवरून बिटकॉईन ट्रान्सफर झालेलेच नाहीत. शिवाय बिटकॉईन गायबही झालेले नाहीत.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सरकारने पोलिसांना क्रिप्टोकरन्सी अकाऊंट उघडण्याची परवानगी दिली होती. श्रीकृष्णने बिटकॉईन अकाऊंट वॉलेट दाखवलं होतं. त्यावेळी त्यामध्ये 31.08 बिटकॉईन होते. पण बिटकॉईन काढण्याचा प्रयत्न केला असता त्यामध्ये 186.811 बिटकॉईन होते.

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

सायबर तज्ज्ञांच्या मते, आरोपीने जे अकाऊंट आपलं असल्याचं सांगितलं, ते एखाद्या एक्सचेंजचं लाईव्ह अकाऊंट होतं. आरोपीकडे ते उघडण्यासाठीचं पासवर्डही नव्हतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं.

श्रीकृष्ण याने केलेल्या दाव्यांच्या पुष्टी केली जाऊ शकत नाही, असंही पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या हवाल्याने सांगितलं.

आतापर्यंत कोणत्याच परदेशी एजन्सीने किंवा कंपनीने हॅकिंगसंदर्भात बंगळुरू पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. बिटफायनेक्स कंपनीनेही कथित हॅकिंगबाबत कोणतीही तक्रार नोंदवली नाही किंवा माहितीही मागितली नाही.

आरोपीने क्रिप्टोकरन्सी वेबसाईट हॅक केल्याचा दावा केला होता. त्यामुळे एप्रिल 2021 मध्ये त्यांचं प्रकरण सीबीआय इंटरपोलसोबत काम करणाऱ्या त्यांच्या अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलं होतं.

पण प्रियांक खरगे यांनी यावर प्रश्न उपस्थित करताना म्हटलं की जे प्रकरण इंटरपोलकडे पाठवलं गेलं ते फक्त 23 हजार रुपयांचं आहे. आता पोलिसांचं म्हणणं आहे की प्रकरण क्रमांक चुकला होता. पण हे पोलिसांना 6 महिन्यानंतर आम्ही प्रश्न विचारल्यानंतर कळलं का?"

ते म्हणतात, "हा तपास बड्या लोकांना वाचवण्यासाठीचाच तपास आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या निगराणीत तपास होणार नाही, तोपर्यंत सत्य समोर येणार नाही."

बिटकॉईनची डोकेदुखी

बंगळुरू स्थित सिक्युरिटी कन्सल्टन्सीचे संस्थापक शशिधर सी. एन. यांच्या मते, "तांत्रिक स्वरुपात पाहायचं म्हटलं तर बिटकॉईनवर कुणाचंच नियंत्रण नाही. याच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कोणताच कायदा नाही.

शशिधर म्हणतात, इथं तुम्ही तुमची ओळख लपवून राहू शकता. तसंच बिटकॉईनची खरेदी विक्री करू शकता. त्यामुळे याचा वापर गुन्हेगारी कारणांसाठी होऊ शकतो. हा एका हवाला रॅकेटप्रमाणे आहे. याचा वापर ड्रग्जच्या व्यवहारांसाठी केला जाऊ शकतो. हे पूर्णपणे बँकिंग यंत्रणेच्या बाहेर आहे. त्यामुळे ही सरकारसाठी डोकेदुखी बनली आहे."

अशा स्थितीत श्रीकृष्णचा दावा खरा की खोटा हे कसं समजेल?

याचं उत्तर देताना शशिधर म्हणतात, "त्याच्या सगळ्या हालचालींवर रेकॉर्ड तयार केला जाऊ शकतो. त्याने काहीही केलं असेल तर इंटरनेटच्या माध्यमातूनच केलं असेल. प्रत्येक ऑनलाईन गतिविधी ही नोंदवली जात असते. त्यामुळे त्याचा माग काढणे शक्य आहे. पण पोलिसांच्या स्पष्टीकरणावर एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. त्यांनी बिटकॉईन एजन्सी किंवा इतर संबंधितांकडून हॅकिंगसंदर्भात माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला की नाही?"

श्रीकृष्णचं म्हणणं काय?

श्रीकृष्ण हा एका रुग्णालयाजवळ फाईव्ह स्टार हॉटेलात राहत होता. त्याच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पबमध्ये झालेल्या घटनेनंतर मला अटक करण्यात आली. सुटल्यानंतर त्यांनी पत्रकारांना म्हटलं की या सगळ्या बनावट आणि खोट्या बातम्या आहेत. याबद्दल मला काहीच माहीत नाही.

आता पुढे काय?

आपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर एका भाजप नेत्याने बीबीसीशी चर्चा केली.

त्यांच्या मते, श्रीकृष्ण हा एक माध्यम आहे. त्याचा वापर श्रीमंत, प्रभावी आणि राजकीय लोक करत आहेत.

ते म्हणतात, "जिथं आग असते, तिथूनच धूर निघतो. त्यामुळे ही आग कुठेपर्यंत पोहोचली आहे, ते पाहावं लागेल. हे प्रकरण किती मोठं आहे, हे कुणालाच माहीत नाही."

श्रीकृष्णचं हे प्रकरण कुठेपर्यंत पोहोचेल, याचे कोणते राजकीय परिणाम पाहायला मिळतात, हे आताच सांगणं अवघड आहे.

भाजपमध्ये आम्ही जितक्या लोकांशी बोललो, त्यांची प्रतिक्रिया जवळपास एकसारखीच होती.

त्यांच्या मते, "अमित शाह यांना सगळं माहीत आहे. पण ते कधी कोणतं पाऊल उचलतील हे सांगू शकत नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)