You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सौरभ कृपाल : देशातील पहिले समलैंगिक न्यायाधीश ठरणार
- Author, सुचित्र मोहंती
- Role, बीबीसी हिंदीसाठी
सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमनं ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांना दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश नियुक्त करण्याची शिफारस केली आहे. हे पद स्वीकारल्यास ते देशातील पहिले समलैंगिक न्यायाधीश असतील.
सौरभ कृपाल यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर स्कॉलरशिप मिळवत ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीमधून एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून एलएलएमची पदवी घेतली.
काही काळ त्यांनी जिनिव्हामध्ये संयुक्त राष्ट्रांबरोबर काम केलं आणि त्यानंतर 1990 मध्ये ते भारतात आले. याठिकाणी दोन दशकं त्यांनी सुप्रीम कोर्टात वकिली केली.
सौरभ कृपाल सहा वर्षांचे होते. त्यावेळी त्यांचे वडील निवृत्त न्यायाधीश बी. एन्. कृपाल उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले होते. त्यांनी अनेक उच्च न्यायालयांमध्ये काम केलं. त्यात गुजरातचाही समावेश होता. त्यानंतर ते भारताचे सरन्यायाधीशही बनले.
माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) आणि सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील विकास सिंह हे सौरभ कृपाल यांचे निकटवर्तीय आहेत.
"सौरभ हे अत्यंत हुशार वकील आहेत. उच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस हे चांगलं पाऊल आहे, तसंच न्यायपालिकेसाठीही ते चांगलं आहे. देशानं काळानुसार पुढं जायला हवं," असं विकास सिंह बीबीसीबरोबर बोलताना म्हणाले.
माजी अॅटर्नी जनरलकडून मार्गदर्शन
सौरभ कृपाल यांनी माजी अॅटर्नी जनरल आणि सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्या मार्गदर्शनाखाली कायद्याचे धडे गिरवले आहेत. रोहतगी यांच्या मार्गदर्शनात कृपाल बरंच काही शिकले असं विकास सिंह सांगतात. त्यामुळंच कॉलेजियमनं कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचं काम पाहून त्यांच्या नावाचा विचार केला.
"सौरभ कृपाल हे अतिशय निपुण आहेत आणि त्यांना कायद्याबाबत संपूर्ण माहिती आहे," असं विकास सिंह सांगतात.
कृपाल यांनी प्रामुख्यानं संविधान विषयक, वाणिज्य, नागरी आणि गुन्हेगारी प्रकरणं हाताळली आहेत. सुप्रीम कोर्टच्या घटनापीठासमोर असलेल्या LGBTQ प्रकरणातील वकिलांच्या पथकात त्यांचा सहभाग होता.
कलम 377 प्रकरणाचे वकील
ते सुप्रीम कोर्टात भारत सरकार विरुद्ध नवतेज सिंह जोहर यांच्या याचिकेच्या प्रकरणातही वकिलांच्या पथकात होते. हे प्रकरण समलैंगिकांच्या हक्कांशी निगडीत होतं.
त्यांनी आयपीसीचं कलम 377 गुन्हेगारी प्रकरणांतून वगळण्यासाठी जोरदार युक्तीवाद केला. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय देत समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारं हे कलम रद्द केलं होतं.
सौरभ कृपाल कायद्याच्या क्षेत्रातल्या त्यांच्या यशासाठी वडील जस्टीस बीएन कृपाल आणि जनरल मुकूल रोहतगी यांना श्रेय देतात.
अॅस्ट्रोफिजिक्स आणि ऑक्सफर्ड
सौरभ कृपाल ऑक्सफर्डमध्ये अत्यंत कमी लेक्चरला उपस्थित असायचे. त्याचं पहिलं प्रेम अॅस्ट्रोफिजिक्स हे होतं. ते ऑक्टफर्डमध्ये 15 मतांनी निवडणूकही जिंकले होते, हे फार कमी लोकांना माहिती असल्याचं सुप्रीम कोर्टात अनेक वर्षांपासून वकिली करणाऱ्या एका ज्येष्ठ वकिलांनी ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं.
सौरभ कृपाल यांनी समान अधिकारांसाठी विविध न्यायालयांमध्ये अनेक लोकांसाठी लढा देत, न्याय मिळवून दिला, असंही ते म्हणाले.
भारतात समलैंगितेला गुन्ह्याच्या श्रेणीतून काढण्यासाठी लढणारी पहिली सामाजिक संघटना नाझ फाऊंडेशन ट्रस्टचे ते ट्रस्टीही आहेत.
शिफारस करण्यास उशीर
सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमनं 11 नोव्हेंबर 2021 मध्ये सौरभ कृपाल यांची दिल्ली हाय कोर्टातील न्यायाधीश म्हणून नियुक्तीची शिफारस केली.
मात्र, काही माध्यमांच्या वृत्तानुसार ऑक्टोबर 2017 मध्येच दिल्ली उच्च न्यायालय कॉलेजियमनं सौरभ कृपाल यांची दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्तीची शिफारस केली होती.
सौरभ कृपाल समलैंगिक असल्यामुळं त्यांच्या नावाच्या शिफारसीसाठी वेळ लागल्याची चर्चा होत आहे. कारण ते देशातील पहिले समलैंगिक न्यायाधीश असतील.
कृपाल यांचं नाव केंद्र सरकारला वारंवार पाठवण्यात आलं होतं. सरकारनं शिफारसीची प्रक्रिया आधी रोखली होती.
"माझा 20 वर्षं जुना पार्टनर विदेशी वंशाचा आहे, त्यामुळं सुरक्षेबाबत धोका निर्माण होऊ शकतो असं कारण सांगितलं जात आहे. मात्र, हे केवळ दिखाव्यासाठीचं कारण असून पूर्ण सत्य नाही, असं वाटतं. त्यामुळंच माझ्या लैंगिकतेमुळं माझ्या पदोन्नतीचा विचार करण्यात आला नाही," असं एका मुलाखतीत सौरभ कृपाल म्हणाले होते.
लैंगिकता किंवा एखाद्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीची न्यायाधीशांच्या निवडीत भूमिका असायला नको, असं प्रसिद्ध वकील गीता लुथरा यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
"सौरभ कृपाल यांच्या वैयक्तिक आवडीचा त्यांच्या दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश म्हणून नियुक्तीच्या शिफारसीवर काही परिणाम व्हायला नको. योग्यता आणि क्षमता यांना प्राधान्य द्यायला हवं. न्यायाधीश बनण्यासाठीचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आहेत," असं लुथरा म्हणाल्या होत्या.
कायद्याच्या क्षेत्रात सौरभ कृपाल यांचं मोठं योगदान आहे. "ते प्रतिभावान आहेत आणि कायद्याच्या क्षेत्रात असाधरण क्षमता त्यांच्यात आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमद्वारे दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्तीची शिफारस करण्यासाठी ते खरंच योग्य आहेत," असं गीता लुथरा म्हणाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)