You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एसटी संप: सरकार पडेल असं वाटल्याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत-अण्णा हजारे #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. सरकार पडेल असं वाटल्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत - अण्णा हजारे
"38 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारवर आणखी दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही. सरकार पडेल, असा दबाव आल्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत," असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संप मागे घेण्याचं आवाहन केलं तरी भाजपने आक्रमकपणे संपात सहभागी होणं सुरू केलं आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यावेळी आपला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसंच अण्णा हजारे यांनी कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही यावेळी केल्या. सरकारवरील दबाव आणखी वाढवणं गरजेचं असल्याचं त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं. ही बातमी लोकमतने दिली.
2. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा अभ्यास करून शासन सकारात्मक निर्णय घेईल - अनिल परब
एसटी महामंडळ शासनामध्ये विलीनकरण करण्यासाठी गेले काही दिवस संपकरणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी मोठा दिलासा दिला आहे.
एसटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीचा अभ्यास करून शासन सकारात्मक निर्णय घेईल.
तसेच विलीनीकरणसंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीला आपला अहवाल लवकर देण्याबाबत सांगण्यात येईल. समितीने विलीनीकरणाची शिफारस केल्यास ती आम्हाला मान्य असेल, असेही आश्वासन ॲड. परब यांनी संपकरी एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाला आज दिले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ), रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी शनिवारी (13 नोव्हेंबर) ॲड. अनिल परब सह्याद्री अतिथीगृह यांची भेट घेतली. यावेळी परब यांनी वरील आश्वासन दिलं. ही बातमी ई-टीव्ही भारतने दिली.
3. महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपचे प्रयत्न - नाना पटोले
महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे.
म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपाचे षडयंत्र आहेत, असा आरोप पटोले यांनी केला.
महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भाजप विरोधात तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून असे षडयंत्र केले जात आहे, असंही पटोले म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.
दरम्यान, याच मुद्द्यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही एक प्रतिक्रिया दिली. राज्यातील हिंसाचारामागे एखादी मोठी शक्ती आहे, असं दानवे म्हणाले.
4. PMAY ग्रामीण योजनेचा पहिला हप्ता आज देणार, 700 कोटींची तरतूद
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (14 नोव्हेंबर) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्रिपुरातील 1.47 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण म्हणजेच PMAY-G चा पहिला हप्ता जारी करणार आहेत.
या अंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 700 कोटींहून अधिक रुपये थेट जमा केले जातील, असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं.
पंतप्रधानांच्या हस्तक्षेपानंतर आणि त्रिपुराची अद्वितीय भौगोलिक-हवामानाची स्थिती लक्षात घेऊन राज्यासाठी 'कच्चा' घराची व्याख्या विशेषत: बदलण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात कच्चे घर असलेल्या लोकांना मोठ्या संख्येने घरासाठी मदत मिळू शकणार आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
5. नीरज चोप्रासह 12 खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार प्रदान
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रासह 12 खेळाडूंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी (13 नोव्हेंबर) खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवी दिल्लीत राजभवनात यानिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कारप्राप्त खेळाडूंमध्ये क्रिकेटपटू मिताली राज, फुटबॉलपटू सुनिल छेत्री, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता कुस्तीपटू रवीकुमार दहिया, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेईन, हॉकीपटू पीआर श्रीजेश व मनप्रीतसिंह,
पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक विजेती अवनी लेखरा आणि भालाफेकपटू सुमित अंतिल यांचादेखील समावेश आहे.
याशिवाय, क्रिकेटपटू शिखर धवन, पॅराबॅडमिंटनपटू सुहास यतिराज, पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेल, उंच उडीतील खेळाडू निषाद कुमार आणि ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या भारतीय पुरूष हॉकी संघातील सर्वच खेळाडूंसह ३५ जणांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)