नवाब मलिकांना आता उत्तर न देणं ही भाजपाची अडचण की वादळापूर्वीची शांतता?

फोटो स्रोत, @DEV_FADNAVIS / Getty Images
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
आर्यन खान आणि क्रूझवरच्या ड्रग प्रकरणानं राजकीय आखाड्यात वळण घेतलं आणि हे प्रकरण राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध भाजप असं झालं. एका बाजूनं नवाब मलिकांनी आघाडी उघडली होती आणि दुस-या बाजूनं भाजपचे एक एक नेते यात पडत शेवटी देवेंद्र फडणवीसांनी त्यात उडी घेतली.
आरोप एवढे टीपेला पोहोचले की ड्रग प्रकरण बाजूला राहून एकमेकांवर वैयक्तिक टीकेची राळ उडू लागली. शेवटी फडणवीसांनीच जॉर्ज बर्नाड शॉचं वाक्य उद्धृत करत त्यांच्या बाजूनं या आरोपांच्या चिखलेफेकीला पूर्णविराम दिला.
पण अशा केवळ उत्तरादाखल आरोपांच्या फैरींमध्ये पडू नये ही भाजपला उशीरा सुचलेली रणनीती होती की अगोदर ती नसतांना त्यांचा गोंधळ उडाला होता? एकटे नवाब मलिक विरुद्ध भाजपचे सगळे नेते असं चित्र तयार झालं ते राजकीय दृष्ट्या अडचणीचं ठरलं का?
बेछूट आरोप होत असतांना त्याचे राजकीय परिणामही होतातच. लोकांमध्ये परसेप्शन तयार होतं. हे परसेप्शन तयार करण्यात मलिक वरचढ ठरले की आता तूर्तास या प्रकरणावर प्रतिक्रिया न देण्याचं ठरवणाऱ्या भाजपात ही वादळापूर्वीची शांतता आहे?
भाजप एनसीबी आणि वानखेडेंची बाजू घेत आहे का ?
किरण गोसावीच्या सेल्फीवरुन समीर वानखेडे यांना लक्ष करायला सुरुवात करणाऱ्या नवाब मलिक यांनी रोज पत्रकार परिषदा घेऊन त्यांच्या दाव्यानुसार हाती असलेल्या पुराव्यांनुसार रोज नवनवे आरोप करायला सुरुवात केली. रोज नवनव्या आरोपांनी आणि त्याला वानखेडे कुटुंबाकडून मिळालेल्या उत्तरानं प्रकरण दिवसागणिक गंभीर बनत गेलं. नवनवी नावं समोर येत गेली, पात्रं समोर येत गेली. पण चित्र मलिक विरुद्ध एनसीबी आणि वानखेडे असंच तयार होत राहिलं.
पण भाजपाचे काही नेते प्रतिक्रिया देऊ लागले. किरीट सोमय्या, राम कदम बोलत होते. वानखेडे कुटुंबीयांनी सोमय्या यांची भेटही घेतली. मोहित भारतीय (कंभोज) यांचं नाव आल्यावरही तेही पत्रकार परिषदा घेऊ लागले. यानं एक प्रश्न असाही विचारला जाऊ लागला की भाजपाचे नेते एनसीबीची वा वानखेडेंची बाजू मांडताहेत का?

फोटो स्रोत, Amruta Fadnavis /facebook
मलिक यांच्या आरोपांचा रोख राजकीयदृष्ट्या भाजपाकडे वळू लागला. मग त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे काही फोटो समाजमाध्यमांवर प्रकाशित करुन काही आरोपवजा प्रश्न विचारल्यावर तर कल्लोळ झाला. मग स्वत: देवेंद्र फडणवीसही मैदानात उतरले आणि दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फोडणार आहे असं त्यांनी जाहीर केलं. अमृता फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन मलिकांवर खरमरीत टीका केली.
इथपर्यंत हे प्रकरण आता मलिक विरुद्ध वानखेडे असं न राहता मलिक विरुद्ध फडणवीस असं झालं. मग पुन्हा आरोप प्रत्यारोप झाले, ज्याचा मूळ ड्रग्स प्रकरणाशी काही संबंध नव्हता. मलिकांची मुलगी आणि फडणवीस यांच्या पत्नी यांनी विरुद्ध बाजूबद्दल कायदेशीर मार्गही पत्करले. हे जास्तच भरकटतं आहे असं दिसल्यावर फडणवीस यांनी 'डुकरासोबत लढाई केल्यास आपल्याच अंगावर चिखल उडतो' हे बर्नाड शॉचं विधान ट्विट करुन आपल्या बाजूनं हा प्रतिक्रियांचा सिलसिला थांबवला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
पण मलिक आणि वानखेडेंच्या लढाईत जर राजकीय कुरघोडी करायला भाजपा मध्ये पडलंच नसतं तर ही काहीशी अडचणीची स्थिती निर्माण झाली का? "नवाब मलिक कुठेतरी जाऊन थांबतील असं त्यांना वाटलं होतं. पण मग त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायला लागले आणि मग नवाब मलिकांच्या जाळ्यामध्ये अडकायला लागलो असं भाजपाला वाटायल लागलं. मग नको त्या गोष्टी बाहेर यायला लागल्या. मग अमृता फडणवीसांचं नाव असेल किंवा बाकी असेल. ते अडचणीचं ठरणारं होतं," राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात.
देशपांडे पुढे म्हणतात, "सुरुवातीला भाजपाला असं वाटलं की वानखेडेंना खूप सहानुभूती लोकांमध्ये आहे. आपण जर त्यांच्या बाजूनं उतरलो तर आपल्यालाही एक नैतिक पाठिंबा मिळेल. पण ते तसं नाही झालं. ज्या प्रकारे वानखेडेंच्या काही गोष्टी समोर आल्या आणि त्यांच्या एजन्सीनंच या प्रकरणाची चौकशी करायचं ठरवलं, तेव्हा जर त्यातून आणखी काही गोष्टी बाहेर आल्या, तर त्याची जबाबदारी पण स्वीकारावी लागेल. त्यामुळे काही गोष्टींच्या बाबतीत आपण एनसीबी आणि वानखेडेंपासून दूर राहिलेलं बरं असं नंतर भाजपाला वाटलं."
पण आता जरी चित्रं भाजप शांत झाला आहे असं वाटत असलं तरी ते तसं राहणार नाही असं ज्येष्ठ राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकरांना वाटतं. त्यांना हेही वाटतं की मलिकांनी त्यांच्याविरुद्ध आरोप केल्यावर जे प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं, ते लोकांपर्यंत पोहोचवायलाही भाजपा कमी पडला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"भाजप नक्कीच शांत नाही बसणार. ते योग्य वेळेची वाट पाहत असतील. जे आरोप मलिक यांच्यावर आहेत, ते नीट लोकांपर्यंत पोहोचवण्यात भाजपा अपयशी ठरतं आहे. दाऊदच्या हस्तकांची जमीन जर कोणीही विकत घेतली असेल आणि खरंच जर मुख्यमंत्री त्यांना 'गुड गोईंग' म्हणाले असतील, तर ते कसं होऊ शकतं? भाजपाच्या बाजूला वाचाळपणा जास्त झाला होता, म्हणून कदाचित आता ते शांत बसले असतील. शिवाय एसटीचा संप वगैरे आहेच," नानिवडेकर म्हणतात.
'केंद्र महाराष्ट्राला टारगेट करतंय' या मताला पुष्टी?
मलिक विरुद्ध वानखेडे आणि एनसीबी या वादात भाजपानं पडल्यानं या प्रकरणापेक्षा बाकी राजकारणावरही परिणाम झाला. महाविकास आघाडी कायम हा आरोप करत आली आहे की केंद्रीय यंत्रणांच्या सहाय्यानं भाजप राज्यातल्या सरकारला कायम टारगेट करत आलं आहे. आता मलिकांच्या आरोपाबद्दल प्रतिक्रिया देत भाजपही उतरल्यानं मलिकांना तोच मुद्द्दा पुन्हा पटविण्यात मदतच मिळाली.
"वानखेडेंच्या चुका आपल्या पदरात घ्यायच्या का असाही प्रश्न भाजपला आता पडला असणार. नवाब मलिकांनी भाजपाविरुद्ध कुठंही भूमिका घेतली नव्हती. जेव्हा वानखेडेंच्या समर्थनार्थ भाजपचे नेते आले आणि मग त्यांना मलिकांनी अंगावर घेतलं. आता यापुढे एजन्सी विरुद्ध नवाब मलिक असंच चालावं असा भाजपाचा पवित्रा दिसतो आहे. काही राजकीय वाद होण्यापेक्षा," अभय देशपांडे म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
"वानखेडे विरुद्ध नवाब मलिक किंवा एनसीबी विरुद्ध मलिक इथपर्यंत ठीक आहे. पण उद्या जर प्रत्येक एजन्सीच्या, मग कधी आयकर खात्याच्या बाजूनं, कधी सीबीआयच्या बाजूनं हे जर उभे राहिले तर, महाविकास आघाडी जे 'व्हिक्टिम कार्ड' खेळताहेत, त्याला अजून बळकटी मिळते. त्यामुळे मग शेवटी ते एजन्सी विरुद्ध व्यक्ती अशा प्रकारावरच सगळं सोडून दिलं," देशपांडे पुढे म्हणतात.
मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते मात्र जरी मुख्य प्रकरण बाजूला राहून भाजप-राष्ट्रवादीत आरोपांची राळ उठली असली तरी त्यामुळे महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत, ते नजरेआड करुन चालणार नाहीत.
"मला बेसिकली असं वाटतं आहे की महाराष्ट्राच्या व्यवस्थेचे महत्वाचे मुद्दे चर्चेत आले आहेत. ते पक्षनिरपेक्ष आहेत. म्हणजे जो कोणी हा भाटी नावाचा माणूस आहे, तो कसा काय कोणत्याही माणसांबरोबर फोटो काढू शकतो? आणि आता तो गायब कसा होऊ शकतो? म्हणजे सुरक्षेचं या बड्या नेत्यांना काही देणंघेणं आहे की नाही?," नानिवडेकर विचारतात.
"अशा प्रतिक्रियांमुळे काय होईल हा अंदाज भाजपला अगोदर आला नसेल. पण माध्यमं ज्या रितीनं नवाब मलिकांचं कौतुक करताहेत, त्यांना प्रश्न मात्र कोणीच विचारत नाही आहे. मोनोलॉग असल्यासारख्या पत्रकार परिषदा चालल्या आहेत. असं किती दिवस चालणार आहे?"
"तुमची मुलगी त्यांच्या बायकोवर बोलते, त्यांची बायको तुमच्यावर बोलते. याचा काय अर्थ आहे? आपल्याकडे खऱ्या प्रश्नांना भिडण्याची प्रगल्भता आहे का? दोन्ही बाजूंना प्रश्न विचारले गेले नाहीत. मोहित कंभोज कोण आहे, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, हे काहीतरी कोणी पाहतंय की नाही/ माजी मुख्यमंत्री सरळ सांगून मोकळे होतात की तो आत आमच्या पक्षात नाही म्हणून? त्यांना तुम्ही पक्षात घेतलं होतं ना?" नानिवडेकर पुढे विचारतात.
शेवटी नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की एकमेकांच्या पक्षांविरुद्धची लढाई नाही. संजय राऊत यांनीही ही चिखलफेक थांबली पाहिजे असं म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी यात हस्तक्षेप करावा असं म्हटलं. तूर्तास तरी वरवर दिसणारी शांतता या राजकीय पातळीवर दिसते आहे. पण राजकारणात शांतता असली तर अधिक शंकेला जागा असते. त्यामुळे छोट्या घडामोडींवरही सगळ्यांचे लक्ष आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








