रियाझ भाटी : दाऊद इब्राहिमशी संबंधाचे आरोप होत असलेली ही व्यक्ती कोण आहे?

Riyaz Bhati

फोटो स्रोत, Riyaz Bhati

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंधाचे आरोप असलेल्या रियाझ भाटींना देवेंद्र फडणवीसांनी संरक्षण दिल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केलाय.

नवाब मलिक यांच्या आरोपांना अद्याप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं नाही किंवा त्यावर प्रतिक्रियाही दिलेली नाही.

एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसने रियाझ भाटींचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे फोटो सार्वजनिक केलेत, तर दुसरीकडे भाजपने रियाझ भाटी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतचे फोटो प्रसिद्ध केले.

रियाझ भाटी यांचा दाऊद इब्राहीमशी खरंच काही संबंध आहे का? राजकारण्यांशी रियाझ भाटी यांची जवळीक कशी? कोण आहे रियाझ भाटी? हे पाहूया.

कोण आहे रियाझ भाटी?

रियाझ भाटींवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कथित हस्तक असल्याचा आरोप अनेकवेळा करण्यात आला आहे. 2016 मध्ये एका मुलाखतीत भाटींनी दाऊदचा हस्तक असल्याचे आरोप फेटाळून लावले होते.

Riyaz Bhati

फोटो स्रोत, Riyaz Bhati

मुंबई पोलीस क्राइम ब्रांचचे निवृत्त अधिकारी विनायक सावदे सांगतात, "रियाझ भाटी छोटा राजनच्या गॅंगमध्ये होता. पण त्याच्यासोबत बिनसल्यानंतर तो छोटा शकीलसाठी काम करू लागला."

ते पुढे म्हणाले, "रियाझ भाटीवर जमीन बळकावण्याचा, खंडणी आणि फायरिंगसारखे आरोप आहेत."

रियाझ भाटी शार्प शूटर म्हणून काम करत नाही. लोकांना धमकावून पैसे उकळण्याचं काम करतो, अशी माहिती पोलीस अधिकारी देतात.

मुंबईतील राजकीय, क्रीडा आणि बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी रियाझ भाटी हे नाव नवं नाही.

पश्चिम उपनगरातील अंधेरी, ओशिवरा या भागातील बिल्डर म्हणून रियाझ भाटींची ओळख आहे.

रियाझ भाटी क्रीडाक्षेत्राशीदेखील संबंधित आहेत. नाव न घेण्याच्या अटीवर एक वरिष्ठ क्रीडा पत्रकार सांगतात, "2013 मध्ये विल्सन कॉलेजने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सदस्य म्हणून भाटीच्या नावाची शिफारस केली होती. ही शिफारस मोठ्या वादाचा मुद्दा ठरली होती."

मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीबीसीआयचे माजी अधिकारी प्राध्यापक रत्नाकर शेट्टी यांनी याला विरोध केला होता. पण, रियाझ यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रवेश केला.

रियाझ भाटींची इंडियन स्पॉर्ट्स अकादमी नावाची एक संस्था आहे. Riyazbhati.com नावाच्या वेबसाईटवर याची माहिती देण्यात आलीये. याचं ऑफिस मुंबईतील अंधेरी परिसरात आहे.

Riyaz Bhati

फोटो स्रोत, Riyaz Bhati

एवढंच नाही रियाझ भाटी भारतीय जिमनॅस्टिक्स असोसिएशनचे पदाधिकारीदेखील राहिले आहेत.

परमबीर सिंह यांच्यासोबत खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी

रियाझ भाटींचं नाव याचवर्षी परमबीर सिंह प्रकरणी चर्चेत आलं.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात रियाझ भाटींवरही FIR दाखल करण्यात आली आहे.

खंडणी प्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचने रियाझ भाटींना चौकशीसाठी बोलावलं होतं. पण चौकशीला उपस्थित न राहता भाटी फरार झाले.

रियाझ भाटींनी अटकपूर्ण जामीनासाठी अर्ज केला होता. पण कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. सध्या मुंबई पोलीस रियाझ भाटींचा शोध घेत आहेत.

रियाझ भाटीवर आरोप कोणते?

2015 मध्ये रियाझ भाटींना मुंबई एअरपोर्टवर ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याच्याकडे दोन वेगवेगळे पासपोर्ट मिळाले होते. मुंबई पोलिसांनी रियाझ भाटींना अटक केली. त्यानंतर या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला होता.

Riyaz Bhati

फोटो स्रोत, Riyaz Bhati

रियाझ काही दिवसांतच सुटला कसा? हा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले आहेत.

त्यानंतर 2019 मध्ये रियाझ भाटी पुन्हा चर्चेत आले. मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने त्यांना अटक केली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वांद्रे-कुर्ला क्लब हाऊचं सदस्यपद मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र वापरल्याप्रकरणीही अटक करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, रियाझ भाटी यांनी विल्सन कॉलेजचा स्टॅम्प आण सिल वापरून बनावट कागदपत्र तयार केली होती. त्यानंतर त्यांचे एमसीएशी संबंध संपुष्टात आले.

2010 मध्ये रियाझ भाटींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. एका बिल्डरला धमकावल्याच हे प्रकरण होतं.

तर 2006 मध्ये जमीन बळकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

राजकीय नेत्यांशी जवळीक कशी?

रियाझ भाटी यांची महाराष्ट्रातील सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांसोबत उठबस असल्याचं फोटोंवरून तरी दिसून येतंय.

नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस या संघर्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाटींचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो सार्वजनिक केले, तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी रियाझ भाटींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांसोबतचे फोटो जारी केले.

आशिष शेलार म्हणाले, "कोणाची नावं बदनाम करण्यासाठी फोटोचा धंदा करू नका."

रियाझ भाटींच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच्या फोटोंवर नवाब मलिक यांना विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणले, "सार्वजनिक जीवनात अनेक लोक फोटो काढतात. त्यामुळे मी फोटोबाबत काही बोलणार नाही."

Riyaz Bhati

फोटो स्रोत, Riyaz Bhati

रियाझ भाटी यांचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो खरे आहेत का? हे तपासण्यासाठी आम्ही त्यांचं फेसबूक आणि इंन्स्टाग्राम अकांउंट पाहिलं. यात त्यांचे महाराष्ट्रातील बड्या नेत्यांसोबतचे फोटो पाहायला मिळले. यात उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर इतर नेत्यांसोबतचे फोटो आहेत.

एवढंच नाही बॉलीवूड आणि क्रिकेट जगताशी संबंधित बड्या माजी खेळाडूंसोबतही रियाझ भाटींचे फोटो आढळून येतात.

रियाझ भाटी कुख्यात गुंड - मलिक

आर्यन खानच्या अटकेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झाली.

मुंबईत ड्रग्जच्या धंद्याला देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद असल्याचा आरोप केल्यानंतर मलिक यांनी फडणवीसांवर अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना संरक्षण दिल्याचा आरोप केला.

पत्रकारांशी बोलाना नवाब मलिक म्हणाले, "रियाझ भाटी कुख्यात गुंड आहे. त्याचे दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याची माहिती आहे. मग त्याला पंतप्रधानांच्या कार्यक्रमात परवानगी कशी मिळाली? रियाझ पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?"

रियाझ भाटींना 29 ऑक्टोबरला बनावट पासपोर्टप्रकरणी ताब्यात घेण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.

ते म्हणाले, "रियाझ भाटी तुमच्या डिनर टेबलवर आणि कार्यक्रमात होता. त्याला तुम्ही संरक्षण दिलंय."

बनावट पासपोर्ट प्रकरणी अटकेत असलेला हा व्यक्ती दोन दिवसात कसा सुटला? असा सवाल त्यांनी पुढे उपस्थित केला.

नवाब मलिक यांच्या आरोपांवर भाजपची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. याउलट त्यांनी एक सूचक ट्वीट नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर केलंय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

भाजपचे विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, "नवाब मलिकांचं डोकं ठिकाणावर नाहीये. पुरावे न देता बिनबुडाचे आरोप करत आहेत."

देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी नवाब मलिकांवर 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात दोषी आढळलेल्या लोकांकडून जमीन विकत घेतल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांचा रियाझ भाटीशी संबंध नाही असं म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी आरोप फेटाळून लावलेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)