नवाब मलिक : 'देवेंद्र फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत हे उद्या सांगेन'

फोटो स्रोत, @DEV_FADNAVIS
'देवेंद्र फडणवीस यांनी माझे अंडर वर्ल्डशी संबंध असल्याचं म्हटलं होतं. मी याबद्दल आता काही बोलणार नाही. पण देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी काय संबंध आहेत, हे मी उद्या सकाळी दहा वाजता सांगेन,' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं.
नवाब मलिक यांनी आज (9 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं.
राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाहवली, सलीम पटेल यांच्याकडून जमीन विकत घेतली असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
मुंबई येथे आज (9 नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले होते.
या आरोपाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी म्हटलं की, मी बॉम्बब्लास्टच्या कोणत्याही आरोपीकडून प्रॉपर्टी खरेदी केलेली नाहीये. त्या जमिनीची खरेदी कायद्यानुसार झाली आहे, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप
नवाब मलिकांनी कोट्यवधी रुपयांची जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकत घेतली, असं फडणवीस यांनी म्हटलं.
1993 बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान या व्यक्तीकडून एका कंपनीच्या मार्फत नवाब मलिकांनी एलबीएस रोडवर जागा विकत घेतली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आर. आर. पाटील हे एकदा एका इफ्तार पार्टीला गेले होते. त्या पार्टीत उपस्थित असलेल्या मोहम्मद सलीम पटेल या व्यक्तीसोबत त्यांचा फोटो झळकला होता. सलीम पटेल हा दाऊदचा माणूस होता. यात आर. आर. पाटील यांचा काही दोष नव्हता पण याच सलीम पटेलकडून नवाब मलिकांनी जमीन विकत घेतली असं देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले आहे.
सलीम पटेल हा हसीना पारकर यांचा ड्रायव्हर होता. त्याच्या नावावरच पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आलेली होती.
1 लाख 23 हजार स्क्वेअर फूटांची गोवावाला कंपाऊंड येथे एलबीएस मार्गावर मोक्याच्या ठिकाणी ही जमीन आहे. या जमिनीची एक नोंदणी सॉलिडस नावाच्या कंपनीच्या नावावर आहे. ही कोट्यवधी रुपये किंमत असलेली जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकण्यात आली. हा व्यवहार खरा झाला की केवळ अंडरवर्ल्डची जमीन सरकारकडे जाऊ नये म्हणून हा व्यवहार करण्यात आला होता, याचा तपास होणे आवश्यक आहे, असं फडणवीस यांनी म्हटले.
व्यवहार कसा झाला?
हा व्यवहार आधी एका व्यक्तीच्या नावे मग नंतर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे असं करत झाल्याचं फडणवीस म्हणाले.
त्यांनी सांगितले, मरिअम बाई ऑफ गोवावाला, प्लंबर यांच्या वतीने सलीम पटेल यांना पॉवर ऑफ अटॉर्नी देण्यात आली. त्यांना वली खान यांच्याकडून जमीन मिळाली होती. ही जमीन त्यांनी सॉलिडस नावाच्या कंपनीला विकली.
नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची ही कंपनी आहे. सॉलिडसमध्ये नवाब मलिक होते. मंत्री झाल्यावर त्यांनी सॉलिडस कंपनी सोडली. फरहान मलिक यांच्याकडे कंपनीची मालकी गेली.
एलबीएस मार्गावर फोनिक्स मार्केट आहे. 2000 रुपये स्क्वेअर फूट दराने ही जमीन विकण्यात आली. अंडरवर्ल्डच्या लोकांकडून खरेदी केलेल्या जागेचं मूल्य 30 लाख रुपये इतके होतं. या व्यवहारात 20 लाखांचं पेमेंट झालं आहे. 15 लाख सलीम पटेल यांच्या खात्यात जमा झाले आहेत. 10 लाख शाह वली खान यांना दिले आणि 5 लाख नंतर दिले जातील असं लिहिलं आहे असं फडणवीस म्हणाले.
नवाब मलिकांविरोधातले पुरावे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संबंधित एजन्सीजकडे देणार आहे असं फडणवीस यांनी म्हटले.
नवाब मलिकांनी काय दिलं उत्तरं?
नवाब मलिक यांनी म्हटलं की, "आम्ही भाडेकरू होतो, मालकी हक्क मिळवण्यासाठी पैसे दिले. सलीम पटेल गुंड आहेत याची मला कुठलीही माहिती नाही. मी हसीना पारकरला ओळखत नाही."
फडणवीसांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं. आम्ही चौकशीसाठी तयार आहोत, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं. बॉम्ब ब्लास्टशी नाव जोडून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं.
चौकशीला नवाब मलिक घाबरेल असं त्यांना वाटतं पण मी घाबरणार नाही, असं म्हणत नवाब मलिक यांनी आपण फडणवीसांनी अंडरवर्ल्डच्या मदतीने शहर कसं वेठीस धरलं होतं, हे सांगू असं म्हटलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








