परमबीर सिंह यांच्याविरोधातील खंडणी प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक

परमबीर सिंह, अनिल देशमुख, महाविकास आघाडी, गुन्हे
फोटो कॅप्शन, परमबीर सिंह

परमबीर सिंह खंडणी प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना सोमवारी संध्याकाळी अटक करण्यात आली आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बीबीसी मराठीला या वृत्ताबाबत दुजोरा दिला आहे. अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात येईल. या परमबीर सिंह यांच्याविरोधातील खंडणी प्रकरणात अटक झालेले हे पहिले पोलीस अधिकारी आहेत.

या प्रकरणात परमबीर हे मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे. कुख्यात गुंड छोटा शकील मार्फत पुनामियाला धमकी दिल्याच्या आरोपाखाली भाईंदर येथील बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना 'मोक्का'अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्याची धमकी परमबीर यांनी दिली होती.

तसेच पुतण्याची खोटी स्वाक्षरी घेऊन खोटे दस्तावेज बनवून अग्रवाल यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खंडणी म्हणून घेतली.

याच प्रकरणात नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी 50 लाखांची खंडणी मागितली. अग्रवाल यांनी उसने पैसे घेऊन कोरके यांना 50 लाख दिले.

याप्रकरणी कोरके व गोपाळे दोघांनाही चौकशीसाठी सीआयडीने बोलवले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही याप्रकरणातील चौथी अटक आहे. यापूर्वी याप्रकरणी संजय पुनामिया व सुनील जैन यांना याप्रकरणी अटक झाली होती.

परमबीर सिंह यांच्याविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोन आरोपी जामीनावर आहेत. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर अटक करण्यात आली आहे. नंदकुमार गोपाळे यांनी मुंबई क्राइम ब्रांचमध्ये काम केलं आहे. 2013 मध्ये IPL बेटिंग प्रकरणाच्या चौकशीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. एन श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पन यांची अटक गोपाळे यांनी केली होती. त्यावेळी गोपाळे मुंबई क्राइम ब्रांचच्या प्रॅापर्टी सेलचे प्रमुख होते.

परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती 29 फेब्रुवारी 2020 रोजी झाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून सिंह यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने कमिशनने जामीनपात्र वॉरंट काढलं होतं.

परमबीर सिंह, अनिल देशमुख, महाविकास आघाडी, गुन्हे, मुंबई पोलीस

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

फोटो कॅप्शन, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचा आरोप केला होता. त्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगाने सिंह यांना वारंवार समन्स बजावलं. पण, सिंह एकाही समन्सनंतर चौकशी समितीसमोर हजर राहिले नाहीत.

पोलिसांच्या मागे उभा रहाणारा, धडाकेबाज आणि हाय प्रोफाईल आणि मुंबईची नस ओळखणारा अधिकारी अशी त्यांची ओळख.

परमबीर सिंह यांचा प्रवास

पोलीस आयुक्त परमबीर सिंह 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत. मूळचे हरियाणाचे असलेल्या परमबीर सिंह यांचं शिक्षण दिल्लीत झालं.

यूपीएससी परीक्षेत पास झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांची निवड IRS कॅडरमध्ये झाली होती. पण, त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि IPS हे पद मिळवलं.

1990 च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डने आपली पाळंमुळं रोवण्यास सुरूवात केली. दाऊद, अरूण गवळी यांसारखे डॉन मुंबईवर अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी भंडारा, चंद्रपूर सारख्या ठिकाणी काम केलेल्या परमबीर सिंह यांची बदली मुंबईत करण्यात आली.

परमबीर सिंह, अनिल देशमुख, महाविकास आघाडी, गुन्हे, मुंबई पोलीस
फोटो कॅप्शन, परमबीर सिंह

वरळी गॅंगचा कणा मोडण्यात परमबीर आघाडीवर होते. दिवंगत एनकाऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्यासोबत त्यांनी टीम तयार केली आणि गवळी गॅंगच्या अनेकांचा एन्काउंटर केला

पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई आणि पोलीस उपायुक्त गुन्हे म्हणून काम केल्यानंतर 2002 मध्ये त्यांची ठाणे ग्रामीणला बदली झाली. त्यानंतर ठाणे शहरात त्यांनी पोलीस उपायुक्त गुन्हे म्हणून काम केलं.

साध्वी प्रज्ञा सिंहचे आरोप

2006 मध्ये परमबीर सिंह यांची महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात (ATS)नियुक्ती झाली. याकाळात त्यांनी दहशतवादाच्या अनेक प्रकरणांची चौकशी केली. पण 2008 मध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना ATSने मालेगाव ब्लास्ट प्रकरणी अटक केली. साध्वी प्रज्ञा यांनी परमबीर सिंह यांच्यावर पोलीस कस्टडीत असताना मारहाण केल्याचा आरोप केला. हे आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळले होते.

26/11 चा मुंबई हल्ला आणि घणसोलीची दंगल

मुंबईवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यावेळी सिंह आपल्या टीमसोबत ओबेरॉय ट्रायडेंट हॉटेलमध्ये गेले होते. 26/11 च्या हल्लादरम्यान सिंह यांच्या पथकानेच पाकिस्तानी अतिरेक्यांचे कॉल ट्रेस केले.

नवी मुंबईतील घणसोली भागात सुरू असलेली दंगल आटोक्यात येत नव्हती. परमबीर त्यावेळी राज्य राखीव पोलीस दलात पोलीस उपमहानिरीक्षक होते. त्यांना दंगल नियंत्रणात आणण्यासाठी पाचारण करण्यात आलं. परमबीर सिंह यांच्यावर या दंगलीत हल्ला करण्यात आला होता.

ठाणे पोलीस आयुक्त

कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक पदाची धुरा साभाळल्यानंतर 2016च्या सुमारास परमबीर सिंह यांची ठाणे पोलीस आयुक्तपदी बदली झाली. ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्या टीमने मीरारोड भागात फेक कॉलसेंटर छापा मारला होता.

भारतातील या सर्वांत मोठ्या फेक कॉलसेंटरच्या तपासासाठी एफबीआयची टीम भारतात आली होती.

दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला परमबीर हे ठाणे पोलीस आयुक्त असताना खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

एल्गार परिषदचं प्रकरण

महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था असताना परमबीर सिंह यांनी पुणे पोलिसांनी एल्गार परिषद कार्यकर्त्यांना अटक केल्याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती.

यात त्यांनी पोलिसांकडे असलेले पुरावे समोर ठेवले. त्यानंतर सिंह यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

फेब्रुवारी 2020मध्ये परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

परमबीर सिंह याचं फिटनेसवर काटेकोरपणे लक्ष असतं. योग्य आहार, व्यायाम यावर त्यांचा जास्त जोर असतो

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)