गोव्यात सत्ता मिळाल्यास हिंदूंना अयोध्यावारी घडवणार - अरविंद केजरीवाल #5मोठ्याबातम्या

अरविंद केजरीवाल

फोटो स्रोत, ANI

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. गोव्यात मोफत वीजेबरोबरच सर्वधर्मियांसाठी मोफत तीर्थयात्रांचे 'आप'चे आश्वासन

गोव्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीनं मोठी आश्वासनं आणि घोषणा केल्या आहेत. गोव्यामध्ये मोफत वीजेबरोबरच सर्वधर्मियांसाठी मोफत तीर्थयात्रांचं आयोजन करण्याचं आश्वासन केजरीवालांनी दिलं आहे.

गोव्यामध्ये आपची सत्ता आली तर, सरकारच्या माध्यमातून सर्व धर्मियांसाठी मोफत तीर्थयात्रेचं आयोजन केलं जाईल. हिंदुंसाठी अयोध्या, ख्रिश्चनांसाठी वेलनकन्नी तर मुस्लिम बांधवांसाठी अजमेर शरीफ आणि साई भक्तांसाठी शिर्डी येथील दर्शनासाठी मोफत यात्रा आयोजित करण्याचं आश्वासन केजरीवालांनी दिलंय.

केजरीवाल यांनी गोव्यात प्रत्येक कुटुंबाला महिन्यात 300 युनिट वीज मोफत देण्याचं आश्वासन आधीच दिलं आहे. तसंच 24 तास वीज आणि शेतकऱ्यांना मोफत वीज अशी आश्वासनंही त्यांनी दिलेली आहेत.

लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

2. 'काँग्रेसमध्ये या, भारत वाचवा'

काँग्रेसनं सोमवारी देशभरामध्ये सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात केली आहे. 31 मार्चपर्यंत ही सदस्य नोंदणी चालणार असून 31 मार्चला संघटनांतर्गत निवडणुकांपर्यंत ही मोहीम सुरू असेल.

काँग्रेसच्या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी ऑनलाईन या मोहिमेची सुरुवात केली. 'काँग्रेसमध्ये या, भारत वाचवा' अशा नावाने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत नागरिकांनी, घटनात्मक मूल्य नष्ट करणाऱ्यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य यांच्या निवडींने या मोहिमेचा शेवट होणार आहे. काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी पुढील वर्षी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान निवडणुकांचं आयोजन केलं जाणार आहे.

काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारताना संबंधिताला दारु आणि ड्रग्जपासून दूर राहण्याची घोषणा करावी लागणार आहे. तसंच मर्यादेपेक्षा अधिक संपत्ती बाळणगणार नाही, असंही जाहीर करावं लागेल. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

3. पोटनिवडणुकीचा आज लागणार निकाल

लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या 29 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. 13 राज्य आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील जागांसाठी ही निवडणूक झाली.

ईव्हीएम मशीन

फोटो स्रोत, Getty Images

लोकसभेच्या तीन जागा हिमाचल प्रदेशमधील मंडी, मध्य प्रदेशातील खांडवा आणि दादरा आणि नगर हवेली या आहेत. या तिन्ही ठिकाणी खासदारांच्या मृत्यूमुळं जागा रिक्त झाल्या होत्या.

तर विधानसभेच्या जागांचा विचार करता आसामध्ये पाच, पश्चिम बंगालमध्ये चार तर मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयात प्रत्येकी तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.

महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

4. मोदींच्या रॅलीत स्फोट घडवणाऱ्या 4 दोषींना फाशी

नरेंद्र मोदी यांच्या पाटण्यातील हुंकार रॅलीमध्ये बॉम्बस्फोट घडवल्याप्रकरणी एनआयए कोर्टानं 4 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. 8 वर्षांनी या प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाटण्यामध्ये ऐतिहासिक गांधी मैदानावर 27 ऑक्टोबर 2013 रोजी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. तसंच पाटणा जंक्शनच्या फलाट क्रमांक 10 वर बॉम्बस्फोटही झाला होता. त्यात सहा जणांचा मृत्यू आणि 80 हून अधिक जण जखमी झाले होते.

या प्रकरणी कोर्टानं एकूण 9 जणांना दोषी ठरवलं आहे. त्यापैकी चौघांना फाशिची शिक्षा दोघांना जन्मठेप, दोघांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा तर एकाला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हैदर अली, नोमान अन्सारी, मुजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज आलम अशी फाशीची शिक्षा सुनावलेल्या दोषींची नावं आहेत. महाराष्ट्र टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

5. लोकांच्या असिष्णुतेमुळं डाबर कंपनीला मागे घ्यावी लागली जाहिरात - जस्टीस चंद्रचूड

डाबर इंडिया लिमिटेड कंपनीला त्यांची एक जाहिरात मागं घ्यावी लागली होती. कंपनीला ग्राहकांचा रोष आणि असहिष्णुता यांमुळे ही जाहिरात मागं घ्यावी लागली असं, सुप्रीम कोर्टाचे जस्टीस डी. वाय. चंद्रचूड म्हणाले.

या जाहिरातीमध्ये एक समलैंगिक महिला जोपडं दाखवण्यात आलं होतं. एकमेकींसाठी या दोघी करवा चौथ साजरी करत असल्याचं दाखवल्यानं या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला होता.

मध्य प्रदेशच्या गृह मंत्र्यांनी याबाबत थेट खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात बोलताना यावरून टीका केली. कायद्यातील आदर्श आणि समाजातील वास्तविकता यात मोठा फरक असल्याचंही ते म्हणाले.

महिलांची ओळख केवळ महिला म्हणून नाही. ट्रान्सजेंडर महिलांना अनेक प्रकारच्या भेदभावाला सामोरं जावं लागतं, असंही चंद्रचूड यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटलं.

एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)