You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आर्यनच्या जामिनाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा NCBचा मार्ग खुला - उज्ज्वल निकम #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. आर्यनच्या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा एनसीबीचा मार्ग खुला - उज्ज्वल निकम
प्रचंड चर्चेत असलेल्या क्रूज ड्रग्ज प्रकरणी अखेर शाहरुखचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर झाला आहे. मात्र या जामीनाविरोधात एनसीबीला सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा अधिकार असल्याची माहिती ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिल्याचं वृत्त लोकमतंनं दिलं आहे.
"एनसीबीनं सादर केलेल्या व्हॉट्स अॅप चॅटच्या आधारे सत्र न्यायालयानं जामीन नाकारला होता. उच्च न्यायालयातही हेच मुद्दे मांडले. पण आर्यन खानच्या वतीनं नामंकित वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर जामीन मंजूर झाला."
आरोपींच्या विरोधात तपास यंत्रणांकडे असलेल्या पुराव्यांचं मूल्यमापन करून न्यायव्यवस्था निर्णय घेत असते, असं उज्ज्वल निकम यानी सांगितलं.
एनसीबीला या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला आहे. ते तो पर्याय स्वीकारणार की नाही, हा त्यांचा निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलं.
2. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर आर. माधवननं दिला शाहरुखला धीर
आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी शाहरूख आणि आर्यनला धीरही दिलाय.
अभिनेता आर. माधवन यानंही ट्वीट करत त्याच्या भावना मांडल्या. "एक बाप म्हणून मला हायसं वाटलं आहे. देवाच्या कृपेनं भविष्यात सर्व काही सकारात्मक होईल," असं माधवननं त्याच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
3. वानखेडे प्रकरणावरून रोहित पावरांचा केंद्राला टोला
समीर वानखेडे प्रकरणावरून राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये वातावरण प्रचंड तापलंय. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता, रोहित पवारांनी या याप्रकरणाचा धागा पकडत केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
केंद्र सरकारनं यंत्रणांचा गैरवापर करण्यासाठी राजकीय हेतू त्यांना बळ दिलं. मात्र, अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर सुरू केल्याचं दिसत आहे, असं रोहित पवार म्हणाले.
अशा प्रकारे अधिकाऱ्यांकडून केला जाणारा अधिकारांचा वापर पाहता, केंद्र सरकारचंच या अधिकाऱ्यांवर नियंत्रण राहिलं नसल्याचं दिसत आहे, असा टोला रोहित यांनी लगावला.
मलिक यांनी वानखेडेंवर आरोप करत सादर केलेले बहुतांश पुरावे खरे असल्याचं दिसत आहे. त्यामुळं आगामी महिनाभरात त्यांच्यावर केंद्राकडून कारवाई झालेली दिसेल, असंही रोहित पवार म्हणाले. महाराष्ट्र टाईम्सनं हे वृत्त दिलं आहे.
4. रजनीकांत चेन्नईतील रुग्णालयात दाखल
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना गुरुवारी रात्री चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांना रुटिन चेकअपसाठी दाखल केल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीनं देण्यात आली.
चेन्नईतील कावेरी रुग्णालयात रजनीकांत यांना दाखल करण्यात आलं. त्यांचं रुटिन चेकअप केलं जाणार असून, लवकरच त्यांना घरी सोडलं जाणार असल्याची माहिती, रुग्णालयाच्या वतीनं देण्यात आली.
रजनीकांत यांनी काही महिन्यांपूर्वी आरोग्याच्या कारणामुळंच त्यांनी स्थापन केलेली राजकीय संघटना बंद करत राजकारणातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं होतं. एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
5. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हॅटिकन सिटीमध्ये घेणार पोप फ्रान्सिस यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हवामान बदलासंबंधीच्या COP-26 आणि G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी युरोपच्या दौऱ्यावर जात आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी पोप फ्रान्सिस यांची भेट घेणार आहेत.
नरेंद्र मोदी हे इटली भेटीदरम्यान व्हॅटिकन सिटीमध्ये पोप फ्रान्सिस यांना भेटणार आहेत. शनिवारी 30 ऑक्टोबर रोजी सकाळी ही भेट होणार आहे.
G 20 परिषदेनंतर पंतप्रधान COP-26 या हवामान बदलासंबंधीच्या परिषदेत सहभागी होतील. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही नेत्यांबरोबर द्विपक्षीय चर्चादेखील होणार आहे.
विविध देशांच्या नेत्यांबरोबर होणाऱ्या चर्चेमध्ये इतर महत्त्वाच्या मुद्द्यांबरोबरच अफगाणिस्तानातील स्थितीसंदर्भातील मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. द हिंदूनं हे वृत्त दिलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)