अमित शाह यांचा कलम 370 हटवल्यानंतरचा पहिला काश्मीर दौरा महत्त्वाचा का?

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, माजिद जहांगीर
    • Role, श्रीनगरहून बीबीसी हिंदीसाठी

गृहमंत्री अमित शाह जम्मू काश्मीरच्या तीनदिवसीय दौऱ्यासाठी शनिवारी (23 ऑक्टोबर) श्रीनगर येथे दाखल झाले आहेत.

श्रीनगरच्या विमानतळावर ते दाखल होण्याच्या आधीपासूनच काश्मीर खोऱ्यात जोरदार पाऊस आणि अनेक ठिकाणी बर्फवर्षाव होत होता.

5 ऑगस्ट 2019 रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधलं कलम 370 हटवलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच ते जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कट्टरवाद्यांनी 11 सामान्य नागरिकांची हत्या केली. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा होत आहे.

मृतांमध्ये पाच स्थलांतरीत मजूर होते. त्याशिवाय काश्मीरमधील अल्पसंख्याक समाजातील लोकांचाही त्यामध्ये समावेश होता.

या हत्यांची माहिती समोर आल्यानंतर अनेक स्थलांतरीत मजूर आणि काश्मिरी पंडीत काश्मीर खोरं सोडून गेले आहेत.

अमित शाह यांचा जम्मू-काश्मीर दौरा सुरू होण्याच्या आधीच त्याठिकाणी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे. विशेषतः श्रीनगरमध्ये अतिशय कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

ठिकठिकाणी चेक-पोस्ट, स्नायपर डॉग्ज, शार्प शूटर्स तैनाक करण्यात आले आहेत. श्रीनगरचं दल सरोवरही सुरक्षारक्षकांच्या निगराणीखाली आहे.

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

श्रीनगरच्या राजभवनच्या आजूबाजूने जाणारे रस्तेही पुढील दोन दिवस सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

तत्पूर्वी, गृहमंत्र्यांच्या दौऱ्याच्या आधीपासूनच सुरक्षा बलांनी कट्टरवाद्यांविरुद्ध मोहिम वेगाने राबवली. गेल्या 23 दिवसांत सुमारे 18 पेक्षा जास्त कट्टरवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी काश्मीरमध्ये दुचाकी गाड्या मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून जप्त केल्या जात आहेत.

या प्रकरणाचा संबंध कट्टरवादी हिंसाचाराशी असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये 700 जणांना अटक झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांची संख्या आहे.

काश्मीर दौऱ्यावर केंद्रीय मंत्री

मोदी सरकार जम्मू-काश्मीरमध्ये 'आऊटरिच प्रोग्रॅम' राबवत आहे. याअंतर्गत गेल्या एका महिन्यापासून अनेक केंद्रीय मंत्री जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जात आहेत.

2018 पासून जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. 2018 मध्ये भाजपने पीडीपी पक्षाचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार पडलं होतं.

अमित शाह

फोटो स्रोत, @AMITSHAH

योग्य वेळ आल्यानंतर येथील निवडणूक पुन्हा घेतली जाईल, असं केंद्र सरकारने सांगितलेलं आहे.

दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे सर्व राजकीय पक्ष राज्याचा विशेष दर्जा पुन्हा बहाल करण्याची मागणी करत आहेत. तोही योग्य वेळ आल्यानंतर बहाल केला जाईल, असं शाह यांनी सांगितलं होतं.

कलम 370 हटवण्यात आल्यापासूनच काश्मीरच्या राजकीय घडामोडी थंडावल्या आहेत. कलम 370 हटवताना काश्मीरच्या मुख्य राजकीय पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये तीन माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता.

त्यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये परिसीमन करण्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतर इथं निवडणुका घेण्यात येऊ शकतात, असं म्हटलं जात आहे.

दौरा महत्त्वाचा का?

गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याला स्थानिक भाजप नेत्यांच्या दृष्टीनेही खूप महत्त्व आहे.

पक्षाच्या एका वरीष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीशी संवाद साधला.

ते म्हणतात, "काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता, गृहमंत्र्यांचा दौरा महत्त्वपूर्ण आहे. यामुळे सर्वांना हुरूप येईल. काश्मीरमधील अल्पसंख्याक समुदाय तसंच इथं राहणारे बिगर-काश्मिरी यांनाही धीर येईल."

अमित शाह

फोटो स्रोत, @AMITSHAH

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती शांततापूर्ण नसल्यामुळेच अमित शाह यांच्या दौऱ्याचं महत्त्व वाढतं, असं तेथील राजकीय विश्लेषक म्हणतात.

काश्मीरमधील ज्येष्ठ पत्रकार हारून रेशी म्हणतात, "काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत स्थलांतरीत मजूर, हिंदू पंडीत आणि शीख समाजातील लोकांच्या हत्या झाल्या आहेत. जम्मूच्या पूंछ परिसरात गेल्या 12 दिवसांपासून सुरक्षाबलांची कट्टरवाद्यांविरुद्धची मोहीम सुरू आहे. म्हणून या दौऱ्याला महत्त्व प्राप्त होतं."

"गृहमंत्री या प्रकरणी सुरक्षा बलांना कठोर आदेश देऊ शकतात, असं लोकांना वाटतं," असं ते म्हणाले.

"कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर प्रकरण सुटल्याचं सरकारने म्हटलं होतं. कलम 370 इथल्या विकासातला अडथळा आहे, अशी सरकारची भूमिका होती. पण सरकारचा दावा फोल होता, हे आपण गेल्या दोन वर्षांत पाहू शकतो. हिंसेच्या घटना होतच आहेत. बालाकोट स्ट्राईकनंतर घुसखोरी बंद होईल, असं सरकारने म्हटलं होतं. पण अजूनही जम्मू-काश्मीरमधली परिस्थिती ठीक नाही."

अमित शाह यांच्यासमोर कोणते मुद्दे?

राज्यशास्त्र विषयाचे माजी प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक नूर अहमद बाबा यांनी याविषयी अधिक माहिती दिली.

ते म्हणतात, "2019 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये बदल करण्यात आले त्यावेळी अमित शाह हेच गृहमंत्री होते. हे बदल लागू करण्यात ते पुढे होते. पण गेल्या दोन वर्षांत विशेष काही बदल झाला नाही. पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरच्या नेत्यांसोबत एक बैठक केली होती. त्यानंतर काहीच कार्यवाही पाहायला मिळाली नाही."

"गृहमंत्र्यांनी श्रीनगरमध्ये कट्टरवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या अधिकाऱ्याच्या घरी जाऊन भेट घेतली. तुम्ही एकटे नाहीत, असा विश्वास त्यांनी दिला आहे, हाच संदेश त्यांना सर्वांना द्यायचा असेल," असं बाबा यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)