रुपाली चाकणकर : असा आहे राजकीय प्रवास

फोटो स्रोत, RupaliChakankar
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं नाव राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्याची माहिती आहे. पण त्याची याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून पावणे दोन वर्षं राज्य महिला आयोगाचं अध्यक्ष पद रिक्त होतं.
राज्यात बलात्काराच्या काही घटना घडल्यानंतर राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त असण्यावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका झाली. त्यानंतर आता अध्यक्षपदासाठी रूपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा आहे.
2019च्या ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्याच्या राजकारणात आलेल्या रुपाली चाकणकर कोण आहेत? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? याबाबतचा हा आढावा...
राजकीय पार्श्वभूमी
रुपाली चाकणकर या मूळच्या दौंडमधल्या. रयत शिक्षण संस्थेमध्ये साधना महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं. अधिकारी होण्याची इच्छा असल्यामुळे विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही त्यांनी केला.
पण त्यात फारसं यश मिळालं नाही. पुढे लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्या. रुपाली चाकणकर यांना माहेरची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. पण चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी होती.
रुपाली चाकणकर यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्यांच्या माध्यमातून रूपाली चाकणकर यांचा राजकारणाशी संबंध येऊ लागला.

फोटो स्रोत, @NcpRupaliChakankar
2002 पासून पुढची 5-6 वर्षं त्यांनी महिला बचतगटासाठी काम केलं. त्यानंतर चाकणकर यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. तिथून रूपाली चाकणकरांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली.
पुढे पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहर अध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. 2019 ला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी तडकाफडकी रूपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी रुपाली चाकणकर यांना राज्याच्या राजकारणात स्थान मिळालं.
पण ही निवड करण्याच्या काही दिवस आधीच चाकणकर यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं. त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण त्यानंतर अचानक महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांना आश्चर्य वाटलं होतं.
चाकणकर आणि टीका
रुपाली चाकणकर यांनी तत्कालीन सरकारविरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्यावर 12 गुन्हे दाखल आहेत. महिला प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी विविध नेत्यांवर केलेल्या बोचर्या टीकांमुळे त्या चर्चेत राहील्या. सुरुवातीलाच त्यांनी 'चित्रा वाघ यांनी पळून जाण्याची भूमिका का स्वीकारली?' अशी प्रश्न विचारला होता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या होत्या, "मी राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष असताना रूपाली चाकणकर यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं. मी त्यावेळी तिच्या पाठीशी उभी राहिले होते. मी राजीनामा दिल्यामुळे ती महिला प्रदेशाध्यक्ष झाली हे तिने विसरू नये."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत चित्रा वाघ यांनी टीका केली असता, "ज्यांचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकला आहे त्यांना बोलण्याचा काय अधिकार," अशी बोचरी टीका चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली होती.

फोटो स्रोत, @NcpRupaliChakankar
काही दिवसांपूर्वी प्रविण दरेकर यांनी सुरेखा पुणेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना चाकणकर यांनी' दरेकर माफी मागा नाहीतर गाल आणि थोबाड रंगवू' असा इशारा प्रविण दरेकर यांना दिला होता.
अमृता फडणवीस यांनी भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्याला उत्तर देताना रूपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं, "ज्यांच्या गाण्याचा सूरांशी कधी ताळमेळ नसतो तसाच त्यांच्या बोलण्यातही नसतो."
धनंजय मुंडे यांच्यावर करूणा शर्मा यांनी केलेले आरोप किंवा पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप असोत याबाबत मात्र रूपाली चाकणकर यांनी मौन बाळगलं. यामुळे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.
रावणाला मदत करणारी शूर्पणखा बसवू नका...!
रूपाली चाकणकर यांची राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकर यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
त्या म्हणतात, "महिलांचं शील भ्रष्ट करणारे रावण राजरोसपणे फिरतायेत. तरीही राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही. ही लाजिरवाणी बाब आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कुणी अनुभवी मिळत नसेल तर, किमान 'रावणाला मदत करणारी शूर्पणखा' तरी बसवू नका. अन्यथा सरकारचं प्रत्येकवेळी नाक कापलं जाईल."

फोटो स्रोत, @NcpRupaliChakankar
चित्रा वाघ यांना या टीकेविषयी विचारलं असता, त्या बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, "मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. अद्याप अध्यक्षाची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कुणीतरी चांगली आणि महिलांना न्याय देणारी व्यक्ती त्या पदावर बसावी असं मला वाटतं."
याबाबत आम्ही रूपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "त्या ट्वीटचा रोख माझ्याकडे असण्याचं कारण नाही. मी गेले 2 वर्षं महिला सक्षमीकरणासाठी राज्यभर काम करत आहे. आमच्या समोर लोकांचं प्रश्न सोडविण्याचं आव्हान आहे. त्यामुळे विरोधक टीका करत असतात. त्याकडे लक्ष देण्याची आता गरज वाटत नाही.
"त्याचबरोबर मी राज्यभर महिलांसाठी काम करते आहे. पक्षाने माझ्यासाठी काय ठरवलं आहे? याबाबत मला कल्पना नाही. त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 3
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








