Mumbai Local : लशीचे दोन डोस झालेल्यांना आता मिळणार लोकल ट्रेनचं तिकीट

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना आता मुंबई लोकलचं तिकीट मिळणार आहे.
याआधी राज्य सरकारने लोकल प्रवासासाठी मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते.
मात्र त्यामुळे गेले काही दिवस गोंधळ बघायला मिळाला होता.
रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्या नंतर राज्य सरकारने पुन्हा एक पत्र रेल्वेला लिहिले आहे.
या पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अशा सर्वच प्रवाशांना एक दिवसाचं तिकीट काढण्याची परवानगी देण्यात येत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Maharashtra Govt.
रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी अशा सूचना देखील राज्य सरकारने केल्याचे पत्रात आहे.
विनातिकीट प्रवास
मुंबईमध्ये आता जवळपास सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस झालेल्या प्रवाशांना महिन्याभराचा पास काढावा लागत होता.
प्रवाशांना एका दिवसाच्या प्रवासासाठी तिकीट मिळत नव्हतं. त्यामुळे प्रवासी एक-दोन दिवसाच्या प्रवासासाठी महिन्याभराचा पास काढण्यापेक्षा विनातिकीट प्रवास करताना दिसत होते.
सरकार निर्बंध शिथिल करताना लोकलचा विचार का करत नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात होता.
"मी ठाण्याला राहतो. माझं बँकेचं ऑफीसही ठाण्यात आहे. पण मला आठवड्यातून एकदा बँकेच्या कल्याण शाखेत जावं लागतं. आठवड्यातून एकदा म्हणजे महिन्यातून चार वेळा मी लोकलने कल्याणला जातो. पण त्या चार दिवसांसाठी मी महिनाभराचा पास का काढू? मला तिकीट दिलं जात नाही. त्यामुळे मी विनातिकीट प्रवास करतो."
एका नावाजलेल्या बँकेत काम करणाऱ्या व्यकीने नाव न छापण्याच्या अटीवर हे सांगितलं होतं.
या व्यक्तीसारखे अनेक प्रवासी आहेत. आम्हाला तिकीटं देणं सुरू करा. मग ही अडचण येणारच नाही, असंही ते सांगत होते.
यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली होती.

फोटो स्रोत, Getty Images
71 कोटींचा दंड वसूल
1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधीत लोकलने विनातिकीट प्रवास करणे, कोरोना नियमांचे पालन न करणे यासाठी मध्य रेल्वेने 12.47 लाख प्रवाशांना पकडलं आहे. त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेली रक्कम तब्बल 71.25 कोटी रुपये असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली होती.
सर्व झोनल रेल्वे दंडाच्या बाबतीत ही रक्कम सर्वाधिक असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली होती.
लोकांसमोर पर्याय नसेल तर लोक विनातिकीट प्रवास करणारच. त्यांच्यासाठी सिंगल तिकीटं उपलब्ध करून द्या, ही मागणी प्रवासी संघटनेकडून करण्यात आली होती.
प्रवासी संघटनेचे मधु कोटीयन म्हणाले, "लसीचे दोन डोस झालेल्यांना प्रवासाची मुभा द्या ही आमची मागणी मान्य केली. पण पासचा फंडा कुठून आला? जर लोकांना 1-2 तासासाठी प्रवास करायचा आहे तर त्यांनी महिन्याचा पास का काढायचा?
"जिथे 20 रूपयाच्या तिकीटाने प्रवास शक्य आहे, तिथे प्रवाश्यांनी 125 रुपये का द्यायचे? ही प्रवाश्यांची लूट सुरू आहे. राज्य सरकारने लवकर ही अट काढून टाकावी आणि प्रवाश्यांना तिकीटं देणं सुरू करावं".
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








