मुंबईतील सर्वांत मोठ्या कचऱ्याचा डोंगर कसा दूर करणार?

फोटो स्रोत, AFP
देशातील शहरांना विद्रूप बनविणाऱ्या कचऱ्याच्या डोंगरांची जागा लवकरच कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्लान्ट्स घेतील, असं आश्वासन पंतपप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरूवातीला दिलं होतं.
त्याच पार्श्वभूमीवर लेखिका सौम्या रॉय या देशातील सर्वांत जुन्या आणि जवळपास 18 मजली इमारतीएवढ्या उंच अशा कचरा डेपोची परिस्थिती मांडत आहेत.
दररोज सकाळी फरहा शेख मुंबईतील शंभर वर्षं जुन्या असलेल्या कचरा डेपोतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभ्या राहून कचऱ्याचे ट्रक कधी येतील याची वाट पाहत असते.
19 वर्षांची फरहा ही जेव्हापासून समजतंय तेव्हापासून मुंबईच्या देवनार भागातील या कचरा डेपोमधून कचरा वेचतीये.
त्या सगळ्या कचरापट्टीतून ती बहुतेकदा प्लास्टिकच्या बाटल्या, ग्लास आणि वायर्स गोळा करते...शहरातील भंगार मार्केटमध्ये विकायला. पण तिची नजर ही मोडके मोबाईल फोन धुंडाळत असते.
जवळपास काही आठवड्यांच्या अंतराने फरहाला कचऱ्यामध्ये 'कामातून गेलेला' एखादा मोबाईल फोन सापडतच असतो. मग ती कमाईतून वाचवलेले पैसे बाहेर काढते आणि तो फोन दुरुस्त करून घेते. त्या फोनमध्ये जरा धुगधुगी आली, की ती रात्री त्या फोनवर सिनेमा पाहण्यात, व्हीडिओ गेम खेळण्यात किंवा मित्र-मैत्रिणींना फोन करण्यात वेळ घालवते.
काही दिवस किंवा आठवड्यांनी तो फोन बंद पडला की, फरहाचा बाहेरच्या जगाशी संपर्क पुन्हा तुटतो. पुन्हा कचरा वेचणं आणि दुसऱ्या एखाद्या फोनचा शोध घेणं सुरू होतं.
देवनारच्या या डेपोत 16 दशलक्ष टनांहून अधिक कचरा आहे- त्यातील आठ दशलक्ष टन कचरा 300 एकरांहून अधिक परिसरात पसरला आहे. हा देशातील सर्वांत मोठा आणि जुना कचरा डेपो असल्याचं म्हटलं जातं. इथल्या कचऱ्याच्या ढीगाची उंची 120 फूट (36.5 मीटर) आहे.
याच कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या आसपास अनेक झोपडपट्ट्या आहेत.

फोटो स्रोत, SAUMYA ROY
कुजणाऱ्या कचऱ्याच्या ढिगातून मिथेन, हायड्रोजन सल्फाइड आणि कार्बन मोनॉक्साईडसारखे विषारी वायू बाहेर पडत असतात. 2016 मध्ये या कचऱ्याच्या डोंगराला आग लागली, जी काही महिने धुमसत होती आणि त्यातून निघालेल्या धुरानं मुंबईला वेढलं होतं.
भारतातील प्रदूषण नियंत्रकांनी 2011 मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार कचरा डेपोमधील आगी या शहरातील वायू प्रदूषणाच्या प्रमुख कारणांपैकी एक होतं.
दिल्लीमधील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरन्मेंट (सीएसई) या संस्थेनं 2020 मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार देशभरात कचऱ्याचे 3,159 डोंगर आहेत, जिथला एकूण कचरा आहे 800 दशलक्ष टन.
देवनार इथला कचरा डेपो बंद करण्यात यावा यासाठी गेल्या 26 वर्षांपासून न्यायालयात संघर्ष सुरू आहे, पण तिथं कचरा टाकणं सुरुच आहे.
भारतातील हे कचरा डेपो दीर्घ काळापासून राजकारणी आणि अधिकाऱ्यांमधील संघर्षाचं कारण ठरत आहेत. 1 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वच्छता कार्यक्रमासाठी जवळपास 13 कोटी डॉलर्सची घोषणा केली. देवनारसारख्या खुल्या कचरा डेपोंची जागा कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांनी घ्यावी यासाठी या निधीत तरतूद आहे.
पण तज्ज्ञांना याबद्दल थोडी साशंकता आहे. "छोट्या शहरात काही प्रमाणावर असे प्रयोग झाले असले, तरी मोठ्या शहरात इतक्या मोठ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणं अवघड आहे," असं सीएसईमध्ये डेप्युटी प्रोग्राम मॅनेजर असलेल्या सिद्धार्थ घनश्यान सिंह यांनी सांगितलं.
"ही समस्या आहे, हे आपल्याला कळतंय. पण जर आपण मुंबई किंवा दिल्लीसारख्या शहरांत राहत असू, तर हे कचऱ्याचे डोंगरही असणारच ही गोष्ट आपण जणू स्वीकारलीये," असं कचरा व्यवस्थापनाबद्दल काम करणाऱ्या ग्लोबल अलायन्स फॉर इनसिनेरेटर अर्ल्टरनेटिव्हज या संस्थेचे देशातील समन्वयक धर्मेश शाह सांगतात.
2000 पासून महानगरपालिकांनी कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासंबंधी नियम आहेत. पण अनेक राज्यांतील शहरांत कचऱ्यावर प्रक्रिया करणारे पुरेसे प्लान्ट्स नाहीयेत. देशाची आर्थिक आणि मनोरंजनाची राजधानी असलेली मुंबई हे अशाच शहरांपैकी एक आहे. आता देवनारमध्ये कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या योजनेवर विचार सुरू आहे.

फोटो स्रोत, Reuters
मोदी यांनी म्हटलं आहे की, या नवीन, हरित रोजगार निर्माण करण्यासाठीच्या योजनांची त्यांना अपेक्षा आहे. पण फरहासारख्या कचरा वेचणाऱ्या आणि त्यावरच उदरनिर्वाह अवलंबून असलेल्यांसाठी हीच काळजीची गोष्ट आहे.
2016मध्ये लागलेल्या आगीनंतर कचरा डेपोत जाऊन कचरा वेचणं अजूनच अवघड बनलं आहे. महानगरपालिकेनं कचरा वेचणाऱ्यांना आत जाण्यापासून अडविण्यासाठी तसंच धातू मिळणवण्यासाठी हलक्या वजनाचं भंगार वितळविण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा वाढवली आहे.
डेपोत लपूनछपून घुसणाऱ्यांना मारहाण केली जाते, ताब्यात घेतलं जातं आणि परत पाठवतात. पण काहीजण आत घुसण्यासाठी सुरक्षा रक्षकांना लाचही देतात. पण एकूणच आता देवनार कचरा डेपोमध्ये कचऱ्याचं विलगीकरण होत नाही. बराचसा कचरा आता शहरातच वेगळा केला जातो, त्यामुळे देवनारमध्ये येणारा कचरा काही प्रमाणात कमी झाला आहे.
फरहाला अनेक महिन्यांपासून फोन मिळालेला नाहीये. देवनार डेपोमध्ये जाऊन कचरा वेचण्यासाठी तिला गार्डला दररोज 50 रुपयांची लाच द्यावी लागते.
पण तिचे कुटुंबीय तिला कोव्हिडमुळे तयार होत असलेला 'घातक कचरा' गोळा करू नकोस, असं सांगतात. त्यामुळे पावसामध्ये संरक्षित कपडे घालून रिसेलसाठी प्लास्टिक गोळा करणाऱ्यांना पाहत ती आसपासच रेंगाळत असते.
गेली अनेक वर्षं या शहरातून कचरा येतच आहे आणि कचऱ्याचा डोंगर वाढतोच आहे. त्यामुळे कचरा वेचणारे तो गोळा करून विकत राहणारच.
"आम्ही जर भुकेनं नाही मेलो, तर आजारपणानं नक्की मरू," फरहा सांगते.
(सौम्या रॉय या मुंबईस्थित पत्रकार आणि लेखिका आहेत. त्यांचं Mountain Tales: Love and Loss in the Municipality of Castaway Belonging हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे.)
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








