कोरोना व्हायरसः 'कोरोनाचा कचरा' किती घातक आहे आणि त्याची विल्हेवाट कशी लावतात?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गुरप्रीत सैनी
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
भारतात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि या लॉकडाऊन-2 मध्ये घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क वापरणं सर्वांसाठीच बंधनकारक करण्यात आलं आहे.
काल घराबाहेर पडले तेव्हा झुडपामध्ये एक मास्क पडलेला दिसला. मास्क बघून मेंदूची चक्र उलट फिरायला लागली आणि मी अचानक फ्लॅशबॅकमध्ये गेले.
पीटीआयच्या फोटो जर्नलिस्टनेही अशी अनेक छायाचित्रं आपल्या कॅमेऱ्यातून टिपली आहेत.
ती छायाचित्रं बघताना कोरोना वॉरियर्सचे जे चेहरे आतापर्यंत तुमच्या मनात होते त्यात अचानक नवा चेहरा दिसायला लागतो.
तो चेहरा असतो हॉस्पिटल्समधून कोरोनाचा कचरा उचलणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा. या कर्मचाऱ्यांकडे आतापर्यंत कदाचित तुम्ही कोरोना वॉरियर्स म्हणून बघितलं नसेल. मात्र, हा लेख वाचल्यावर कोरोनाशी लढा देण्यात आपले हे शिपाईसुद्धा काही कमी नाही, याची पुरेपूर कल्पना तुम्हाला येईल.

फोटो स्रोत, PTI/RAVI CHOUDHARY
कोरोना विषाणू येताना आपल्यासोबत अनेक आव्हानं घेऊन आलेला आहे. यापैकीच एक आहे 'कोरोनाशी लढताना निर्माण होणारा कचरा'.
कोव्हिड-19 आजारावरचे उपचार, डायग्नोसिस आणि विलगीकरण या सर्व प्रक्रियांमध्ये अनेक प्रकारच्या वस्तुंचा वापर होतो.
वेस्ट एक्सपर्ट म्हणजेच कचरा व्यवस्थापनतज्ज्ञ यांच्या मते प्रत्येक राज्यातून दररोज 1 ते 1.5 टन कचरा निर्माण होतो.
या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने काही दिशानिर्देश जारी केले आहेत.

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा -लहान मुलांना कोविड 19 चा धोका किती?
- वाचा - व्हेंटिलेटर्स काय असतात? कोरोनाच्या लढ्यात ते इतके महत्त्वाचे का आहेत?
- वाचा - कोरोनाच्या तडाख्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था अजूनच संकटात?

कोव्हिड-19 कचरा हाताळणे (Handling), त्यावर प्रक्रिया (Treatment) आणि विल्हेवाट (Disposing) हे सर्व घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 आणि जैववैद्यक कचरा व्यवस्थापन नियमांतर्गत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हॉस्पिटलमधून येणारा सर्व प्रकारचा कचरा - मग तो सर्जरीचा असो, औषधांचा असो किंवा उपचारादरम्यान निघालेला असो - हा सर्व जैववैद्यक म्हणजेय बायोमेडिकल कचरा असतो.
सरकारी दिशानिर्देश
सरकारी दिशानिर्देशांनुसार आयसोलेशन केंद्रं, रुग्णांचे नमुने गोळा करणारी केंद्रं, चाचण्या करण्यात येणाऱ्या लॅब यासाठी वेगवेगळे नियम आहेत आणि क्वारंटाईन केंद्र आणि होम क्वारंटाईनसाठी वेगळे नियम आहेत.
आयसोलेशन वॉर्ड्स (अलगीकरण कक्ष) : कोव्हिड-19च्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे आणि डबल-लेअर्ड बॅग किंवा डबे ठेवले पाहिजे. त्यावर लेबल असायला हवं. ज्या ट्रॉलीमधून कोव्हिड कचरा नेतात त्यातून दुसरा कचरा नेता कामा नये. कोव्हिड कचरा हाताळणाऱ्या सॅनिटेशन स्टाफला दुसरं कुठलंही काम किंवा इतर कचरा उचलण्याचं काम देता कामा नये.

फोटो स्रोत, PTI/RAVI CHOUDHARY
क्वारंटाईन सेंटर्स (विलगीकरण केंद्र) : बायोमेडिकल वेस्ट पिवळ्या पिशव्यांमध्ये गोळा करावा. त्यानंतर तो जैववैद्यक कचरा प्रक्रिया केंद्रात पाठवावा. दैनंदिन कचऱ्याची घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार विल्हेवाट लावली जाते.
होम क्वारंटाईन : घरी असणाऱ्यांनी बायोमेडिकल कचरा पिवळ्या पिशवीत टाकावा. हा कचरा स्थानिक प्रशासनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना द्यावा.
अशाप्रकारचे दिशानिर्देश तयार करण्यात आले आहे. मात्र, त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे सोपं नाही.
कर्मचाऱ्यांची सुरक्षा
बीबीसीने हॉस्पिटलमध्ये कोरोना कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करतात, याविषयी अनेक खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलमधल्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एम्स आणि मॅक्ससारख्या हॉस्पिटल्सने सांगितलं की ते वेगवेगळ्या प्रकारचा कचरा वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये गोळा करतात. काही कर्मचारी केवळच याच कामासाठी नेमून दिले आहेत. कचरा व्यवस्थापनतज्ज्ञ असद वारसीदेखील हे मान्य करतात.
सरकारी निर्देशांनुसार तर कचरा गोळा करणारे आणि तो हातळणारे अशा सर्वांना पीपीई देणं गरजेचं आहे आणि त्या कर्मचाऱ्यांनी हे पीपीई कायम घालून असायला हवं. यात थ्रीलेअर मास्क, गाऊन, हेव्ही ड्युटी ग्लोव्ज, गम बुट्स आणि सेफ्टी गॉगल्स असायला हवे. मात्र, या बाबतीत बऱ्याच अडचणी आहेत.
मात्र, हॉस्पिटलमधले बहुतांश स्वच्छता कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसीसवर असतात, असं दिल्ली अस्पताल ठेका कर्मचारी युनियनचे जनरल सेक्रेटरी मृगांक यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटल आपले कर्मचारी मानत नाहीत. कचरा व्यवस्थापनाचं काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझेशनसाठी खूप झगडावं करावा लागतं. या वस्तुंचा तुटवडा आहे आणि म्हणून आधी हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना त्या देण्यात येतील, असं हॉस्पिटलचं म्हणणं आहे. विषाणुच्या संपर्कात येऊ नये, यासाठी कचरा हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट्स देणं गरजेचं आहे. मात्र, सुरुवातीला स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई मिळालेच नाहीत. आम्ही हॉस्पिटल प्रशासनाला पत्रं लिहिलं आणि त्यानंतर आताकुठे काही हॉस्पिटल्समध्ये या वस्तू उपलब्ध होत आहेत. मात्र, समस्या अजूनही कायम आहे."
असद वारसी यांनीही सांगितलं की हॉस्पिटलमधला जैववैद्यक कचरा गोळा करून व्यवस्थापन केंद्रात आणणाऱ्या आणि व्यवस्थापन केंद्रात त्याची विल्हेवाट लावणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण आणि पीपीई किट्स मिळालेल्या नाहीत.
ते म्हणतात मोठ्या शहरांमध्ये काही प्रमाणात का होईना या सर्व सुविधा मिळू लागल्या आहेत. मात्र, लहान शहरांमध्ये परिस्थिती वाईट आहे.
कॉमन बायोमेडिकल वेस्ट फॅसिलिटीची कमतरता
कोव्हिड कचरा गोळा करून नेमून दिलेल्या गाड्यांमधून तो कचरा बायोमेडिकल वेस्ट फॅसिलिटी केंद्रांमध्ये नेतात. या केंद्रात उच्च तापमानात हा कचरा जाळतात. मात्र, अशा केंद्रांची संख्याही खूप कमी आहे.
असद वारसी ऑल इंडिया कॉमन बायोमेडिकल वेस्ट फॅसिलिटी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरीसुद्धा आहेत.

फोटो स्रोत, PTI/RAVI CHOUDHARY
देशात 200 ते 250 अशी केंद्रं आहेत आणि देशातल्या 600 ते 700 शहरातल्या कचऱ्याची इथे विल्हेवाट लावली जाते, अशी माहिती त्यांनी दिली.
मात्र, अनेक छोटी शहरं आणि ग्रामीण भागांमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही.
टेरीच्या पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापन विभागाचे सौरभ मनुजा सांगतात की भारतात यापूर्वीसुद्धा संपूर्ण कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नव्हती.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 2017 सालच्या एका अहवालानुसार, भारत रोज 559 टन बायोमेडिकल कचरा निर्माण होतो. यातला जवळपास 92% कचऱ्यावरच प्रक्रिया व्हायची. प्लांट्सची क्षमता कमी असल्यामुळे पूर्वीसुद्धा संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावणं शक्य होत नव्हतं आणि आता तर या प्लांट्सवर अधिकचा भार आला आहे.
ही अडचण लक्षात घेता कॉमन बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट करणारे प्लांट्स अधिक वेळ सुरू ठेवावे आणि जिथे हे प्लांट्स नाही तिथे जमिनीत खोल खड्डा करून त्यात कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असं सरकारी निर्देशांमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
मात्र, कचरा व्यवस्थापनतज्ज्ञांच्या मते कोव्हिड-19 मुळे कोरोना कचऱ्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे त्याचं व्यवस्थापन मोठं आव्हान आहे.
क्वारंटाईन होम
ज्या घरांमध्ये कुणी होम क्वारंटाईन आहेत, तिथून प्रोटोकॉलनुसारच कचरा गोळा करण्यात येत असल्याचं प्रशासन आणि आरोग्य विभागाचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, इथे दोन प्रकारच्या अडचणी आहेत. पहिली अडचण म्हणजे कुठल्या घरात एखादी व्यक्ती क्वारंटाईन आहे, याची कुठलीच माहिती नाही. क्वारंटाईन असणाऱ्यांच्या घराबाहेर स्टिकर लावतात. मात्र, काही घरांवर स्टिकर नाहीत किंवा ज्यांनी हे स्टिकर काढले तिथे ते घरं क्वारंटाईन आहे की नाही, हे कळायला दुसरा मार्गच नाही.
इतकंच नाही तर क्वारंटाईन असणाऱ्या घरांमध्ये कचरा वेगवेगळा गोळा करतात की नाही, याची खातरजमाही केली जात नाही.
सामान्यांच्या आणि घरांच्या अडचणी
सामान्य जनता, पोलीस कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारीदेखील कोरोनापासून बचावासाठी मोठ्या प्रमाणावर मास्क, गोल्वज वापरत आहेत.
घरामध्ये सर्व प्रकारचा कचरा एकाच ठिकाणी गोळा केला जातो. शिवाय हा कचरा गोळा करण्यासाठी स्थानिक पातळीवर विशिष्ट सिस्टिमही नाही. मोठ्या शहरांमध्ये तरी काही प्रमाणात ओला आणि सुका कचरा, मेडिकल वेस्ट, काचेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वेस्ट वेगवेगळा ठेवला जातो. मात्र, छोट्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागात अजून एवढी जागरुकता नाही.
टेरीचे सौरभ मनुजा सांगतात की घरातून जो जनरल कचरा निघतो, "त्यात प्लास्टिक, कार्डबोड, मेटल अशा वस्तूही असतात. या वस्तुंवर कोरोना विषाणू बरेच दिवस सक्रीय असतो. हा विषाणू 24 ते 72 तास सक्रीय असतो. त्यामुळे कचरावेचकांना याचा संसर्ग होऊ शकतो. यातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वाढते."

फोटो स्रोत, Getty Images
हरियाणातले कोरोनाचे नोडल अधिकारी ध्रुव चौधरीदेखील कोरोना कचरा मोठं आव्हान असल्याचं म्हणतात. कारण भारतात घरामध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याचीही अजून पद्धत नाही. अशात बायोमेडिकल कचरा लोक स्वतःहून वेगळा गोळा करून ठेवतील, याची शक्यता फारच धुसर आहे.
ते म्हणतात, "सामान्यपणे लोक सगळा कचरा एकत्रितच गोळा करतात. ही पद्धत अचानक बदलणार नाही. त्यासाठी वेळ लागेल. मात्र, काळानुरूप त्यातही बदल होईल, अशी अपेक्षा आहे. प्रशासन त्यासाठी प्रयत्न करतंय."
उपाय काय असू शकेल?
कचरा व्यवस्थापन तज्ज्ञांच्या मते लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.
लोकांना हे सांगायला हवं की वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये गोळा करावा. शिवाय, स्वच्छता कर्मचाऱ्यांनीदेखील वेगवेगळा कचरा वेगवेगळाच गोळा करण्याची यंत्रणा तयार करायला हवी.
लोकांना सांगायला हवं की कोरोनाच्या सार्स-कोव्ह-2 हा विषाणू 72 तासांपर्यंत सक्रीय राहू शकतो. त्यामुळे कोरोनाचा कचरा वेगळ्या पिशवीत गोळा करून ती पिशवी व्यवस्थित बंद करावी आणि तीन दिवस कुणीही त्याला हात लावू नये. तीन दिवसांनंतर ती पिशवी स्वच्छता कर्मचाऱ्यांना द्यावी. यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही.
तसंच ऑफिसेस आणि कामाच्या ठिकाणीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्यासाठी वेगवेगळे डबे ठेवायला हवे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








