संभाजी भिडे वाद: बाईच्या कपाळावरची टिकली हे हिंदू धर्माचं प्रतीक की आभूषण?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

(शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला म्हटले की आधी टिकली लाव मगच मी तुझ्याशी बोलतो. यानंतर पुन्हा एकदा टिकली आणि कुंकू यावरून वाद निर्माण झाला आहे. या आधी देखील असाच वाद निर्माण झाला होता तेव्हा या कुंकू टिकली बाबतचा आढावा बीबीसी मराठीने घेतला होता. हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.)

बायकांनी कुंकू लावावं की लावू नये? फक्त हिंदू स्त्रियाच कुंकू किंवा टिकली लावतात का? विधवा महिलांनी कुंकू लावलं तर कुठे बिघडतं?

हे आणि असे प्रश्न अनेक महिला सोशल मीडियावर विचारत आहेत. कुणी म्हणतायत, कुंकू-टिकली हे हिंदू धर्माचं प्रतीक आहेत, तर कुणी म्हणतात नाही. तर कुणी म्हणतायत, आम्हाला लावायचं असेल, तर आम्ही लावू?

चिमूटभर कुंकू किंवा थेंबभर गंधावरून एवढी चर्चा का होते आहे? आणि कुंकू-टिकली-गंध लावलं की नाही, यावरून एखाद्या महिलेचं चारित्र्य ठरतं का?

जाहिरातीवरून सुरू झाला वाद

हा वाद सुरू झाला फॅब इंडिया या फॅशन ब्रँडच्या एका जाहिरातीवरून. या ब्रँडनं दिवाळीसाठी आपल्या खास कलेक्शनला 'जश्न ए रिवाझ' हे उर्दू नाव दिलं, जे काही हिंदुत्ववादी सोशल मीडिया यूझर्सना पटलं नाही. कारण उर्दू ही मुस्लिमांची भाषा आहे, असं त्यांना वाटतं.

फॅब इंडियानं त्यानंतर ही जाहिरात मागे घेतली, पण वाद तिथेच थांबला नाही.

काहींनी मग याकडे लक्ष वेधून घेतलं, की या जाहिरातीत दिसणाऱ्या मॉडेल्सनी पारंपरिक वेश परिधान केला आहे, पण त्यांनी कुंकू लावलेलं नाही. म्हणजे ही हिंदू सणाची जाहिरात असू शकत नाही, अशी चर्चा सुरू झाली.

महिलांचं दिसणं कुंकू लावल्यानं पूर्ण होतं की नाही, हे पुरुषांनी का ठरवावं अशा आशयाचे प्रश्नही विचारले जाऊ लागले.

उजव्या विचारसरणीच्या लेखिका शेफाली वैद्य यांनी त्यावरून 'नो बिंदी नो बिझनेस' असा हॅशटॅग व्हायरल केला. त्यांचं म्हणणं आहे की मी "दिवाळीसाठी त्या ब्रँड्सकडून काहीही विकत घेणार नाही, ज्यांच्या जाहिरातीत मॉडेल्सनी बिंदी लावलेली नाही."

आपल्या वक्तव्याचं समर्थन करताना त्यांनी पुढे म्हटलंय, "हा मुद्दा काही एखाद्यानं बिंदी वापरावी की नाही, याबाबतचा नाहीये. एक ब्रँड हिंदू सणासाठी प्रोडक्ट विकत आहे, पण तो ते करताना हिंदूंच्या भावना दुखावत आहे, याविषयीचा हा मुद्दा आहे. तुम्हाला हिंदू लोकांकडून पैसे पाहिजे असतील, तर हिंदू धर्मातील प्रतिकांचा आदर करा. त्यामुळेच 'नो बिंदी, नो बिझनेस' हा हॅशटॅग चालवला जात आहे."

पण अनेक महिलांनी त्यांना उत्तरही दिलं आहे. काही जणी म्हणाल्या, मी टिकली लावली की नाही, यावरून मी हिंदू आहे की नाही हे ठरत नाही.

पूजा कोपरगावकर यांनी ट्विट करत म्हटलंय की, "मी बऱ्याचदा बिंदी वापरत नाही. पण जेव्हा वापरते तेव्हा ती यासाठी वापरते कारण मला ती आवडते. त्यामुळे आपल्या धर्मात सांगितलं असल्यामुळे महिलांनी कपाळावर बिंदी वापरली पाहिजे असं जे कुणी ट्विटरवर म्हणत आहेत, त्यांनी नरकात जावं. बिंदी न वापरल्यामुळे माझं हिंदुत्व किंवा भारतीयत्व काही कमी होत नाही."

आभूषण की धर्माचं प्रतीक?

भारतातली जुनी शिल्पं आणि मूर्ती पाहिल्या तर हे स्पष्ट होतं, की शेकडो वर्षांपासून कुंकू किंवा तिलक लावणं इथल्या संस्कृतीचा भाग आहे.

आपलं सौंदर्य खुलून दिसावं यासाठी महिला कपाळावर वेगवेगळ्या प्रकारचं कुंकू रेखत आल्या आहेत. मग काहींनी बंड म्हणून कुंकू न लावण्यास सुरुवात केली. साडीऐवजी पंजाबी ड्रेस किंवा बाकीचे आधुनिक पोशाख महिलांनी स्वीकारले, तसं पोशाखानुसार कपाळावरचं कुंकू बदलत गेलं किंवा गायब झालं.

आजच्या आधुनिक काळात कुंकू धर्मापेक्षा फॅशन स्टेटमेंट बनलं आहे. कुणी सणासुदीला आपली बंगाली, मराठी अशी ओळख दाखवण्यासाठी कुंकू, चंद्रकोर आवर्जून लावू लागल्या आहेत.

पण नवऱ्याला 'कुंकवाचा धनी' आणि कुंकवाला 'सौभाग्याचं लेणं' बनवताना त्याचा संबंध लग्नाशी जोडला गेला, हेही अनेकींना पटत नाही.

काळ बदलला, तसे नवरा आणि कुंकवाविषयीचे विचार बदलले आहेत. जिच्या पतीचं निधन झालं आहे, अशी स्त्रीही आता कुंकू लावते. पण कुंकवाविषयी अशी कुठलीही सक्ती योग्य नाही असं बहुतांश महिलांना वाटतं.

पत्रकार निमा पाटील म्हणतात, "जिचा नवरा मरण पावला तिचा कुंकू लावण्याचा अधिकार काढून घेतला. साधं शृंगाराचं साधन असलेल्या कुंकवावरून बायकांचं जिणं हराम केलं गेलं. लोकांच्या रोजच्या जगण्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींनाही त्यांच्याच शोषणाचं साधन बनवायची हातोटी या देशातील एका वर्गाकडे कायम होती. ही विकृती आता पुन्हा वाढीला लागली आहे. तिचा स्वीकार होतो की नाकारली जाते हे दिसेलच."

कुंकू लावण्याची सक्ती करणाऱ्यांची तुलना काही सोशल मीडिया युझर्सनी इस्लामच्या नावाखाली बुरख्याची सक्ती करणाऱ्यांशीही केली आहे.

सामाजिक कार्यकर्ता कुंदा प्रमिला नीळकंठ यांना सक्तीची ही भूमिका चुकीची वाटते. त्या म्हणतात, "कुंकू लावायचं की नाही हे बाईनंच ठरवायला हवं. आपली परंपरा चालवली पाहिजे, हे एक प्रकारचं दडपण स्त्रियांवर टाकलं जातं. गेल्या काही वर्षांत आपली ओळख हा एक मोठा पैलू त्याच्याशी जोडला गेला आहे.

"आताच्या पिढीतल्या कित्येक मुली फक्त लग्नसमारंभात छोटीशी टिकली लावतात. हे समाजानं आतापर्यंत मान्य केलं आहे, पण आजकाल त्यांना हटकलं जात आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावर सांस्कृतिक ओळख म्हणून ही गोष्ट रुजवायचा प्रयत्न केला जातो आहे, हे चिंताजनक आहे. ही बंधनं स्त्रियांनी मोकळी केली आहेत, ती आम्ही पुन्हा घट्ट करणार या वृत्तीतून ते येतं आहे, याला विरोध करायला हवा."

रेणुका खोत लिहितात, "धर्माचे समाजाने ठरवलेले धरबंध स्त्रियांना जोडायचे. ते तिने मानले नाहीत की ती धर्माचा अनादर करतेय असं धरबंध शेवटी कसले असतात तेच, तिचं राहणं खाणं पेहराव वावरणं शिक्षण ह्याबद्दलच साचीव झालेले.

एखादी स्त्री टिकली लावते की नाही ह्यावरून ती धर्माचा आदर अनादर करतेय हे दुसरे कोण कस काय ठरवू शकतात? तिचं काम अभ्यास तिचं स्ट्रगल हे सगळं काहीच महत्वाचं नसतं धर्म संस्कार सभ्यतेच्या सतत गोष्टी करणारांसाठी?"

इथे दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी मांडलेल्या एका विचाराचीही आठवण होते.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, "बायका जेव्हा विचार करायला लागतील, माणूस म्हणून जगायला सुरूवात करतील आणि माणूस म्हणून जगणं म्हणजे विचार करून जगणं, तेव्हाच या प्रतिकांना ओलांडून पुढे जातील."

पाकिस्तानातही झालेला कुंकवावरून वाद

खरं तर कपाळावर कुंकू, टिकली किंवा टिळा लावण्याची पद्धत हिंदूंमध्ये आहे, पण ती फक्त भारतापुरती किंवा फक्त हिंदू धर्मापुरतीच मर्यादित नाही.

दक्षिण आशियात आणि दक्षिण पूर्व आशियात अनेक महिला कुंकू लावतात.

बांगलादेशात तर पोहेला बैशाख म्हणजे बंगाली नववर्ष साजरं करताना अनेक मुस्लिम महिलाही कुंकू लावतात. कारण मोठ्ठं ठसठसीत लाल कुंकू ही तिथे धर्माशी नाही, बंगाली असण्याशी जोडली गेलेली गोष्ट आहे.

पाकिस्तानात तर टिकली लावली, म्हणून सनम बलोच, हिना आगा यांसारख्या सेलिब्रिटीजना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पण अनेकजण त्यांच्या पाठीशीही उभे राहिले होते.

पॉपस्टार सेलिना गोमेझ हिनं स्टेजवर आपल्या कार्यक्रमात टिकली लावली होती, यावरून अमेरिकेत बरीच चर्चा झाली. कुणाला हे Cultural appropriation वाटलं, कुणाला पैशासाठी केलेला स्टंट वाटला, तर कुणाला ही तिनं भारतीय संस्कृतीला दिलेली दाद वाटली.

त्यानंतर अमेरिकेतील काही श्रीलंकन तमिळ महिलांनी एक वेगळाच मुद्दा मांडला होता. श्रीलंकेतील गृहयुद्धादरम्यान, कपाळावरचं कुंकू पाहून एखादी महिला तमीळ असल्याचं ओळखलं जायचं आणि त्यांच्यावर कारवाई, प्रसंगी अत्याचारही व्हायचा असा त्यांचा अनुभव होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)