भारतात लशीचा 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण, तरीही अडचणी कायम

भारताने लसीकरणाच्या 100 कोटी डोसचा टप्पा आज (21 ऑक्टोबर) पार केला आहे. भारतात जानेवारीत लसीकरणाची मोहीम सुरू झाली होती.

16 जानेवारीला लसीचा पहिला डोस दिला गेला. त्यानंतर 278 हा दिवसांनी हा टप्पा भारताने पार केला आहे.

भारतात आतापर्यंत 30% लोकांनी (29.1 कोटी) लशीचे दोन डोस घेतले आहेत, तसंच 70.7 कोटी लोकांना पहिला डोस मिळाला आहे. 2021 च्या शेवटापर्यंत संपूर्ण लोकसंख्येला लस देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते त्यासाठी लसीकरणाची मोहीम आणखी वेगवान करावी लागणार आहे.

100 कोटी डोस देणारा भारत हा जगातला दुसरा देश आहे. चीनने हा टप्पा जून महिन्यात पूर्ण केला होता. 278 दिवसात हा टप्पा पूर्ण केला याचा अर्थ देशात रोज 30 लाख डोस दिले जातात. मात्र जानेवारीपासून हा आकडा कमी जास्त होत आहे.

भारत सरकारने हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्याची पूर्ण तयारी केली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय लाल किल्ल्यावर एक गीत आणि एक फिल्म यानिमित्ताने प्रकाशित करणार आहेत.

भारतात आतापर्यंत 3.4 कोटी लोकांना कोव्हिडची लागण झाली आहे. आणि 4,52,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि ब्राझील खालोखाल भारतात कोव्हिड रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे.

लसीकरणाचा उपक्रम कसा सुरू आहे?

तज्ज्ञांच्या मते या वर्षाच्या शेवटापर्यंत लसीकरण पूर्ण करायचं असेल तर दिवसाला किमान 1.2 कोटी लोकांना लस मिळायला हवी. 45 पेक्षा अधिक वयाच्या सात कोटी लोकांना अजूनही लस मिळालेली नाही, असं आरोग्य अर्थतज्ज्ञ डॉ.रिजो जॉन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

"लशीबाबत असलेली उदासीनता आणि तळागळातल्या प्रत्येकाला लस मिळणं हे येत्या काळातलं मोठं आव्हान असेल" ते पुढे म्हणाले.

मोदींच्या वाढदिवशी म्हणजेच 17 सप्टेंबरला 2 कोटी लोकांना एका दिवसात लस देण्याचा विक्रम भारताने केला होता. ऑक्टोबर महिन्यात 53 लाख लोकांना दरदिवशी लस मिळाली आहे. 18 तारखेला हा आकडा 60 लाख इतका झाला होता.

लसीकरणाचा वेग भारतात सुरुवातीला अतिशय कमी होता. भारतात 96 कोटी लोकांना लस देण्याचं उद्दिष्ट आहे.

लसीच्या वितरणातील अडचणी, उत्पादनातील अडचणी, कोव्हिडची दुसरी लाट यामुळे लसीकरणाला भारतात वेळ लागत आहे.

देशातील पूर्ण लोकसंख्या संपूर्णत: लसीकृत होण्यासाठी आणखी 90 कोटी डोझेसची गरज आहे. भारत सरकारचं उद्दिष्ट लक्षात घेतलं तर त्यासाठी आता फक्त दोन ते तीन महिनेच शिल्लक आहेत. येत्या काळातील लशीची उपलब्धता आणि लोकांची उदासीनता हे या उद्दिष्टासमोरील मुख्य अडथळे आहेत.

लसीकरणासाठी सरकारने विविध उपाययोजना आतापर्यंत केल्या आहेत. सरकारने 61000 केंद्रे उभी केली आहेत. अंदमान निकोबार भागात तर लसीकरणासाठी ड्रोन्सचाही वापर करण्यात आला होता. या ड्रोनमध्ये 900 मात्रा मावतात आणि ते 70 किमीपर्यंत जाऊ शकतं.

असं असलं तरी लसीकरणात असलेला लिंगाधारित भेदही चिंताजनक आहे. सध्या सहा टक्के कमी बायकांना लसी मिळत आहे. कारण ग्रामीण भागात बायका कमी संख्येने इंटरनेट वापरतात आणि अनेकांना लस घ्यायची भीती वाटते. आजही शहरी भागात लस घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे.

जगातील बहुतांशी देशांना लसी देण्यात अनंत अडचणी आल्यात. भारतात हा सगळ्यात मोठा लस उत्पादक देश आहे. इथेही ही समस्या उद्भवेल असं वाटलं नव्हतं.

मोदी सरकारने लस उत्पादकांना वेळेत ऑर्डर दिली नाही. एप्रिलमध्ये आलेल्या लाटेमुळे लसीकरणाचा वेग सरकारला वाढवावा लागला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)