नरेंद्र मोदी: 'माझ्या कोव्हिड लशीच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो का आहे?'

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कोव्हिड-19 लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असावा की नाही? याबाबत केरळ उच्च न्यायालय पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहे.

पीटर एम. यांनी यासंदर्भात केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसलेलं प्रमाणपत्र हवं आहे अशी मागणी त्यांनी केलीय.

'हे माझ्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे,' अशी त्यांची भूमिका आहे.

पीटर एम 62 वर्षांचे माहिती अधिकार कार्यकर्ते असून ते काँग्रेसचे सदस्य आहेत. ते मुळचे कोटायम जिल्ह्याचे आहेत. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "माझ्या प्रमाणपत्रावर त्यांनी स्वत:चा फोटो छापला आहे. नागरिकांच्या खासगी आयुष्यात त्यांनी दखल घेतली आहे. हे घटनाबाह्य असून मी पंतप्रधानांना ही चूक सुधारण्याचे निवेदन करतो."

"लोकशाहीत हे पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि राष्ट्र किंवा कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा कोणताही उपयोग नाही." असंही ते म्हणाले.

आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात येत असलेल्या या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचा फोटो तसंच वैयक्तिक माहिती, इंग्रजी आणि स्थानिक भाषेत दोन संदेश लिहिलेले असतात.

आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण यांनी ऑगस्ट महिन्यात संसदेत माहिती दिली की, सार्वजनिक हित पाहता प्रमाणपत्रावर फोटो आणि संदेश देण्यात आले आहेत. लसीकरणानंतरही नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी असं करण्यात आल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

'माझ्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचा फोटो का असावा?'

लसीकरण पूर्ण केलेले नागरिक आधीपासूनच आपल्या वर्तनाविषयी जागरुक आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रावर लिहिलेले संदेश केवळ उपदेश आहेत असं पीटर एम यांना वाटतं.

"नरेंद्र मोदी काही भारताचे पहिले पंतप्रधान नव्हे, ना ही भारताची ही पहिली लसीकरण मोहीम आहे. परंतु लसीकरण मोहीम केवळ एका व्यक्तीची आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. पंतप्रधानांचे हे प्रपोगंडा टूल आहे." अशी टीकाही त्यांनी केली.

या सर्व प्रकरणावर ते नाराज आहेत. सरकारी रुग्णालयात लसीकरणासाठी मोठी रांग होती त्यामुळे आपण खासगी रुग्णलयात पैसे देऊन लस घेतल्याचं ते सांगतात. "मी लशीच्या एका डोससाठी 750 रुपये दिले आहेत. मग माझ्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचा फोटो का असला पाहिजे?" असा प्रश्न ते उपस्थित करतात.

केरळ उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला यासंबंधी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.

यासंदर्भात आम्ही भाजपच्या दोन प्रवक्त्यांशी संपर्क साधला परंतु पीटर एम यांच्या याचिकेविषयी प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला.

लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोला विरोध

लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असल्याने राजकीय विरोधकांनीही यावर आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या काही राज्यांनी तर नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला आणि आपल्या मुख्यमंत्र्यांचा फोटो छापला आहे.

नरेंद्र मोदी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वापर वैयक्तिक प्रचारासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी केला आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतकांच्या प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापा असं म्हणत टीका केलीय.

त्यांनी एका पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केला की, "समजा मी तुमची समर्थक नाही. मला तुम्ही आवडत नाही. पण तरीही मला हे ठेवावं लागणार. का? माझी स्वतंत्रता कुठे आहे?"

"तुम्ही कोरोना प्रमाणपत्रावर स्वत:चा फोटो अनिवार्य केला मग मृत्यू प्रमाणपत्रावरही करा," असंही त्या पुढे म्हणाल्या.

या फोटोमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या काही भारतीय प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागल्याचंही वृत्त आहे.

वॉईस न्यूजने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, नरेंद्र मोदी यांचा चेहरा माहिती नसलेल्या एका इमिग्रेशन अधिकाऱ्याने यामुळे अनेक प्रवाशांवर आरोप केला होता.

पीटर एम या संपूर्ण प्रकरणी चिंता व्यक्त करतात. असंच सुरू राहिलं तर यापुढे पंतप्रधान 'आपल्या मुलांच्या शाळा आणि कॉलेजच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरही आपला फोटो छापतील.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आवश्यकता नसलेल्या ठिकाणीही दिसतो यामुळेही पीटर एम यांनी काळजी व्यक्त केली.

समर्थकांचा पाठिंबा

नुकतेच एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयाने अधिकृत ईमेलच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांचा फोटो असलेली एक सरकारी जाहिरात हटवण्याची सूचना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फोटो काढण्याची आणि सेल्फी घेण्याची आवड जगजाहीर आहे. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक त्यांना फॉलो करतात. देशभरात होणाऱ्या त्यांच्या सभांनाही लोक गर्दी करतात.

त्यांचे समर्थक सांगतात, लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो असणं यात गैर काहीच नाही. तसंच त्यांचा चेहरा देशात सर्वाधिक लोकप्रिय आहे असंही त्यांचे चाहते सांगतात.

बिलबोर्ड्सपासून ते गल्लीतील होर्डिंग्सपर्यंत सगळीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हसरा चेहऱ्याचा फोटो दिसतो. तसंच सरकारी जाहिराती आणि वेबसाईट्वरही त्यांचा फोटो दिसून येतो. बातम्यांमध्ये येणाऱ्या सरकारी जाहिरातींमध्येही ते झळकतात.

समीक्षकांचं म्हणणं आहे की भारतात असा नेता कधीच नव्हता जो अशा प्रकारे स्वत:च्या स्तुतीमध्ये मग्न असेल. गांधी-नेहरू घराण्यांच्या नावाने विमानतळ, विद्यापीठे, पुरस्कार आणि कल्याणकारी योजनांचे नाव आतापर्यंत ठेवण्यात येत होते.

दलित आयकॉन आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना स्वतःचा पुतळा बनवल्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागले होते. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी भोजनालय, औषधं आणि मिठाच्या पाकिटांवर स्वत:चा चेहरा छापला होता.

पंतप्रधान मोदी यांच्यावर जीवनावर आधारित पुस्तक लिहिणारे लेखक आणि पत्रकार निलंजन मुखोपाध्याय म्हणतात, "पंतप्रधान मोदींनी ही आत्मस्तुती वेगळ्या पातळीवर नेली."

ते पुढे सांगतात, "ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत. जो संघ संस्था ही व्यक्तीपेक्षा मोठी आहे असं शिकवतो. पण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक व्यक्ती संस्थेपेक्षा मोठी झाली आहे."

"जर तुम्ही त्यांना बोलताना ऐकले, तर ते आमच्या सरकारने हे केले असं कधीच म्हणत नाहीत. तर त्याऐवजी माझे सरकार किंवा मोदी सरकार असा उल्लेख करतात. जाहीर भाषणांमध्येही ते 'मी, माझा, मी' अधिक वापरतात. फेब्रुवारी महिन्यात तर त्यांनी एका स्टेडियमला स्वत:चे नाव दिले,"

मुखोपाध्याय म्हणतात की, पंतप्रधान मोदी यांनी या आरोग्य संकटाचा वापर "स्वत:चा प्रचार करण्याची एक मोठी संधी" म्हणून केला.

"आतापर्यंत कोव्हिड-19 पासून संरक्षण करण्याचा लस हा एकमेव मार्ग आहे आणि लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर स्वत:चा फोटो छापल्याने ते स्वत: ला लोकांचे संरक्षक म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत." असंही ते सांगतात.

"त्यांना स्वतःला देवाचा मानवी चेहरा असल्याचं दाखवायचे आहे जेणेकरून ते लोकांचा विश्वास संपादन करू शकतील आणि याचे रुपांतर त्यांच्यासाठी मतांमध्ये होईल,"

अशा प्रचाराचा मतदारांवर परिणाम होतो का?

इमेज गुरू दिलीप चेरियन सांगतात की पंतप्रधानांचा प्रमाणपत्रावरील फोटो यात "पक्षाचा दृष्टिकोन आणि सरकारचा दृष्टीकोन यात एक बारीक रेषा आहे."

ते पुढे सांगतात, 'प्रमाणपत्राचा वापर मतं जिंकण्यासाठी केला जातोय. निवडणुकीसाठी फायदा मिळवल्यासारखे वाटते. इतरही अनेक साधनं आहे. उदा. सरकारी जाहिराती, योजनांची कागदपत्र या सर्वांचा अर्थ एकच आहे."

चेरियन म्हणतात की 'राजकारणात चेहरा ओळख' मोठी भूमिका बजावत असते कारण आज पक्षाची ओळख त्या व्यक्तीशी जोडली गेली आहे.

"आपला फोटो छापण्याचा उद्देश हा वैयक्तिक मतदारांना आपली आठवण करून देण्यासाठी आहे." असंही त्यांना वाटतं.

एखाद्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो असण्यात गैर काय आहे? याविषयी बोलताना पीटर एम सांगतात, "ते एक राजकारणी आहेत जे एका राजकीय पक्षाचे नेतृत्व करतात. ते निवडणूक लढवतात. त्यामुळे हे तत्काळ थांबवलं पाहिजे." असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)