मुंबईत कोव्हिड-19 चे मृत्यू शून्यावर, तिसऱ्या लाटेचं संकट टळलं?

मुंबईत रविवारी (17 ऑक्टोबर) कोरोनासंसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. कोव्हिड-19 चा संसर्ग पसरल्यानंतर तब्बल दीड वर्षांनंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूसंख्या शून्यावर आली आहे.

मुंबईत 97 टक्के लोकांना कोरोनाविरोधी लशीचा एक डोस मिळालाय. तर, कोरोनामुक्त होण्याचं प्रमाणही 97 टक्क्यांवर पोहोचलंय.

हिंदुजा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अविनाश सुपे सांगतात, "मुंबईत आजाराची प्रखरता कमी झालीये. त्यामुळे कोरोनासंसर्गाची तीव्र लाट येण्याची शक्यता आता नाही."

मुंबईत तिसरी लाट टळलीये का? मुंबई शहरावरचं कोरोनासंकट टळलंय? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मुंबईत 'शून्य' कोरोनामृत्यू

रविवारचा (17 ऑक्टोबर) दिवस मुंबईसाठी आशेचा किरण घेऊन आला. मुंबईत (गेल्या 24 तासात) कोरोना संसर्गामुळे एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर मार्च 2020 ला शहरात पहिला बळी गेला होता.

मुंबईतील शून्य कोरोना मृत्यूबाबत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले, "मुंबईत कोरोना मुत्यूसंख्या शून्यावर येणं निश्चितच चांगली गोष्ट आहे. लोकांनी तोंडावर मास्क घालावा. प्रत्येक नागरिकाला लस मिळावी हेच आमचं उद्दिष्ट आहे."

•कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत 20 जून 2020 ला एकाच दिवशी 136 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला

•दुसऱ्या लाटेत मे 2021 मध्ये एकाच दिवशी 90 कोरोनामृत्यू नोंदवण्यात आले

मुंबईत कोरोनासंसर्गाची सुरूवात झाल्यापासून 16,180 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनासंसर्गाची सद्यस्थिती काय?

सद्य स्थितीत मुंबईत 5902 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एकूण रुग्णसंख्या 7 लाख 51 हजारांपेक्षा जास्त आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दिवसाला सरासरी 400 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद होते आहे.

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार,

•कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण 97 टक्के

•रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1214 दिवस

•रुग्णवाढीचा आठवड्याचा दर 0.06 टक्के

•साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 1.61 टक्के

मुंबईत आत्तापर्यंत 1 कोटी 39 लाख नागरिकांना कोरोनाविरोधी लस देण्यात आलीये. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणतात, "कोरोनाविरोधी लशीसाठी पात्र 97 टक्के नागरिकांना एक डोस देण्यात आलाय. तर, 55 टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेत."

राज्यात गेले दोन दिवस 2000 पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीये.

मुंबईत तिसऱ्या लाटेचं संकट टळलं?

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत निर्बंध कडक करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यापासून कोरोना संसर्ग नियंत्रणात येऊ लागल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात झाली. मॉल, बाजारपेठा उघडण्यात आल्या. लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यात आली.

गणपती, दसरा आणि सणांच्या दिवसात होणाऱ्या गर्दीमुळे रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. पण मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात असल्याचं चित्र दिसून येतंय.

मुंबईत वाढतं लसीकरण आणि रुग्णवाढ नियंत्रणात आल्यामुळे तिसऱ्या लाटेचं संकट टळलंय का?

हिंदुजा रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अविनाश सुपे मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे माजी संचालक राहिलेत. ते म्हणतात, "मुंबईत कोरोना संसर्गाची प्रखरता कमी झालीये. रुग्णासंख्या वाढली तरी, मृत्यू जास्त नाहीयेत. त्यामुळे, येणाऱ्या काळात कोव्हिड-19 ची तीव्र लाट येणार नाही."

फेब्रुवारीत अमरावतीतून महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली होती. ही लाट सुनामीसारखी पसरली होती.

डॉ. सुपे पुढे सांगतात, "येणारे दोन-तीन महिने परिस्थिती अशीच राहील. कोरोनारुग्णांची संख्या वाढू शकेल. पण याला तिसरी लाट म्हणता येणार नाही. "

मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी, "मुंबई पूर्णत: सुरक्षित आहे," असं म्हणणं योग्य ठरणार नाही, तज्ज्ञ सांगतात.

आरोग्य विभागाने राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत गेल्या आठवड्यात कॅबिनेटला माहिती दिली होती. सप्टेंबर 26 ते ऑक्टोबर 6 या कालावधीत मुंबईतील साप्ताहिक नवीन रुग्ण 18 ने वाढले होते. तर, इतर जिल्ह्यात कमी होताना दिसून आली होती.

महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक म्हणतात, "सद्यस्थितीत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत नाहीये. पण, ऑक्सिजनच्या गरजेवर लक्ष ठेवलं पाहिजे. ऑक्सिजनची गरज वाढली तर निर्बंध पुन्हा घालावे लागतील."

तज्ज्ञांच्या मते कोरोनाव्हायरसमध्ये मोठं म्युटेशन झालं नाही तर राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता जवळपास नाही.

मुंबईच्या नायर रुग्णालयाचे अधीष्ठाता डॉ. रमेश भारमल सांगतात, "मुंबईत तिसऱ्या लाटेचं संकट टळलं असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. पण परिस्थिती नक्कीच समाधानकारक आहे." मुंबईत कोरोनारुग्णांची संख्या 300 ते 450 आहे.

ते पुढे म्हणाले, "लसीकरणाचा वेग वाढतोय. रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे सद्य परिस्थिती खूप चांगली आहे. कोरोना आपल्यासोबत रहाणार आहे. पण, लसीकरणामुळे संसर्ग झालाच तर अत्यंत सौम्य स्वरूपाचा होईल."

मुंबईत रविवारी (17 ऑक्टोबर) 387 कोरोनारुग्णांची नोंद करण्यात आलीये. गेल्या काही दिवसात एकच दिवशी मुंबईतील रुग्णसंख्या 500 वर पोहोचली होती.

मुंबईच्या लीलावती रुग्णालयाचे फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. जलिल पारकर म्हणतात, "कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही." रुग्णसंख्या वाढेल पण औषध, लसीकरण यामुळे रुग्णांची परिस्थिती गंभीर होणार नाही.

ते पुढे सांगतात, "कोरोना संसर्गाची लाट येणार नाही असं नाही. पण ही लाट फार जास्त वाईट नसेल."

तिसऱ्या लाटेबाबत काय म्हणतात पालिका अधिकारी?

मुंबईत दररोज रुग्णसंख्या कमी-जास्त होताना पहायला मिळतेय. पण आजार नियंत्रणात आल्याचं दिसून येतंय.

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका टळलाय का? याबाबत बोलताना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणतात, "मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात दिसून येत आहे. पण धोका टळलाय असं आत्ताच म्हणता येणार नाही."

ते पुढे सांगतात, "मुंबईत रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालंय. पावसाळ्यामध्ये परराज्यात गेलेले मजूर परतू लागलेत. इतर राज्यात लसीकरणाचं प्रमाण कसं आहे याबाबत माहिती नाही. त्यामुळे आपल्याला कटाक्षाने लक्ष ठेवावं लागेल."

पर राज्यातून येणाऱ्या लोकांचा मुद्दा डॉ. अविनाश सुपे यांनीदेखील उपस्थित केलाय. ते म्हणाले, "मुंबईतील रुग्णसंख्येवर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो. परराज्यातून येणारे लोक खूप आहेत. त्यामुळे मुंबई रहाणारे किती आणि बाहेरून येणारे किती. याचा अभ्यास महत्त्वाचा आहे."

मुंबईत कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचे रुग्ण जास्त आहेत. हे तपासण्यासाठी पालिकेने जिनोम सिक्वेंसिंग स्टडी केला होता.

•343 नमुन्यांची तपासणी करण्यात आली

•डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण 54 टक्के

•34 टक्के नमुन्यांमध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्ह

•12 टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचे इतर व्हेरियंट आढळून आले

तर, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी प्रत्येकाने काळजी घेऊन तोंडावर मास्क लावला पाहिजे अशी सूचना केली आहे.

दिवाळीपूर्वी मुंबई उघडणार?

कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे मुंबईतील बाजारपेठा, दुकानं आणि मॉल उघडण्यात आलेत. चित्रपटगृह आणि नाट्यगृह येत्याकाही दिवसात उघडण्यात येणारेत. तर धार्मिकस्थळं लोकांसाठी खुली करण्यात आली आहेत. कॉलेज आणि शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

लोकलमध्ये लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुभा असली. तरी एक डोस झालेल्यांनाही प्रवेश द्यावा याबाबत राज्य सरकार विचार करतंय.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, "रुग्णसंख्या आटोक्यात राहिली तर लोकल, मॉलमध्ये एक डोस घेतलेल्यांना काही सवलत देता येईल का याबाबत विचार सुरू आहे." दिवाळीनंतर राज्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील असं ते म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)