बायकोला नवऱ्याइतका पगार का मिळत नाही?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
तुम्हाला तुमच्या नवऱ्याइतकाच पगार मिळतो का, असं विचारलं तर जगातील बहुतांश महिलांना या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं द्यावं लागेल, असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
या संशोधनात गेल्या चार दशकांत म्हणजे 1973 ते 2016 या काळात जगातील 45 देशांमधल्या सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीचा अभ्यास केला गेला. कुटुंबातील पगारामध्ये असलेल्या असमतेविषयी हे पहिलंच जागतिक पातळीवरचं सर्वेक्षण आहे.
बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील सेंटर फॉर पब्लिक पॉलिसीचे प्राध्यापक हेमा स्वामिनाथन आणि प्राध्यापक दीपक मालघन यांनी हे संशोधन केलं आहे. त्यात 28.5 लाख घरांतील 18 ते 65 वर्षे वयोगटातल्या भिन्नलिंगी जोडप्यांचा समावेश आहे. लक्झमबर्ग इन्कम स्टडी या संस्थेनं ही माहिती गोळा केली होती.
प्रा. स्वामिनाथन सांगतात, "गरीबीविषयी पारंपरिक मानकांनुसार एका घराचा विचार केला जातो. एका घरात सर्वांचं उत्पन्न एकत्र केलं जातं आणि त्याची समान वाटणी होते, असा समज आहे. पण घरात मोठ्या प्रमाणात असमानता असते आणि तीच आम्हाला उघड करायची होती."
त्यांच्या अहवालात घराचं वर्णन एक 'ब्लॅक बॉक्स' असं केलं आहे. त्यामागचं कारण सांगताना स्वामिनाथन विचारतात, "आपण आत पाहात नाहीयोत, पण आत पाहिलं, तर चित्र कसं बदलेल?"
भारतात महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणारी वागणूक असमान आहे, हे जगजाहीर आहे. इथे नोकरी करणाऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण तुलनेनं कमी आहे आणि ज्या महिला नोकरी करतात, त्या पूर्णवेळ नोकरी करण्याची शक्यताही कमी आहे.
प्रा. स्वामिनाथन आणि मालगान यांना जागतिक पातळीवर काय परिस्थिती आहे हे पाहायचं होतं. प्रा. स्वामिनाथन सांगतात, "उदाहरणार्थ, नॉर्डिक देश (डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, फिनलंड, आईसलँड) हे स्त्री-पुरुष समतेच्या बाबतीत आशेचा किरण असल्याचं सांगितलं जातं. पण तिथे काय परिस्थिती आहे? तिथे घरांमध्ये कामाची आणि संपत्तीची विभागणी समान आहे का?"
साधारण त्या देशातली असमानता आणि कुटुंबाअंतर्गत असलेली असमानता याआधारे संशोधकांनी देशांची यादी तयार केली. त्यांच्या असं लक्षात आलं, की देश कुठलाही असो, वेगवेगळ्या काळात श्रीमंत आणि गरीब घरांमध्येही स्त्री-पुरुषांच्या उत्पन्नात असमानता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"महिला आपल्या पतीएवढीच कमाई करतायत, असं एकाही देशात - अगदी श्रीमंत आणि विकसित देशातही आम्हाला आढळून आलं नाही," असं प्रा. मालगान सांगतात.
"जिथे स्त्री-पुरुष असमानतेचं प्रमाण कमी आहे अशा नॉर्डिक देशांतही, महिलांचा वाटा 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे."
महिला पुरुषांपेक्षा कमी कमाई करतात, याची काही साधारण कारणं आहेत. जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये पुरुष पैसा कमावणारा आणि बाई घर चालवणारी अशा दृष्टीनं पाहिलं जातं.
जेंडर पे गॅप
अनेक महिला मुलांना जन्म घातल्यावर नोकरीतून ब्रेक घेतात, किंवा कधीकधी काम सोडूनही देतात. 'जेंडर पे गॅप' म्हणजे महिला आणि पुरुषांना मिळणाऱ्या पगारातली असमानता तसंच महिला आणि पुरुष समान काम करत असतानाही महिलेला कमी पगार मिळणं हे जगात अनेक ठिकाणचं वास्तव आहे. तसंच घरकाम आणि कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेणं ही आजही घरातील महिलेची जबाबदारी मानली जाते, ज्यासाठी तिला पगार मिळत नाही.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या 2018 मधील अहवालानुसार, घरातल्यांची काळजी घेण्यासाठी जो वेळ दिला जातो, त्यात महिलांचं योगदान 76.2% टक्के म्हणजे पुरुषांपेक्षा तिप्पट आहे. आशिया-पॅसिफिक प्रदेशात तर ते 80% एवढं आहे.
या अहवालानुसार विनापगार देखरेखीचं हे काम "महिलांना नोकरी करण्यापासून, नोकरीत राहण्यापासून आणि तिथे प्रगती करण्यापासून रोखतं."

फोटो स्रोत, Getty Images
एखाद्या महिलेचं उत्पन्न कमी असेल, तर त्याचा परिणाम आर्थिक पातळीवरच राहात नाही, तर तो घरातील लिंगभेदालाही खतपाणी घालतो आणि महिलांची परिस्थिती आणखी प्रतिकूल बनवू शकतो.
"गृहिणी म्हणून पत्नीचं योगदान अदृष्य स्वरुपात असतं तर रोख रक्कम दिसून येते. त्यामुळे पगार कमावणारी महिला, जी कुटुंबाच्या उत्पन्नात रोख रक्कम जमा करते, तिला थोडाफार मान मिळतो. तिचं घरातलं स्थान आणि आवाज यांना त्यामुळे महत्त्व मिळतं," असं निरीक्षण प्रा. स्वामिनाथन नोंदवतात.
"उत्पन्न वाढलं, की तिची चर्चा, वाटाघाटी करण्याची ताकद वाढते. इतकंच नाही, तर त्यामुळे तिला एखाद्या अन्यायकारक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिला मदत आणि आधारही मिळतो."
पगारातली विसंगती दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेवरही परिणाम करते, असं प्रा. मालगान नमूद करतात. कारण कमी उत्पन्न असल्यानं महिलांची बचत कमी होते, त्या तुलनेनं कमी संपत्ती गोळा करतात. वय झाल्यावर मिळणारं पेन्शन किंवा तत्सम उत्पन्नही कमी होतं, कारण तेही पगारावरच अवलंबून असतं.
कुटुंबाअंतर्गत असमानतेत घट
पण या अहवालात आशेचा एक किरणही आहे. कुटुंबाअंतर्गत असमानतेमध्ये 1973 ते 2016 या चार दशकांत 20 टक्के घट झाली असल्याचं दिसून आलं आहे.
"जगात बहुतांश ठिकाणी आर्थिक विकास आणि वृद्धी होते आहे आणि नोकरीमध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे," प्राध्यापक स्वामिनाथन सांगतात. "जगात अनेक ठिकाणी महिलांना मदत होईल अशी धोरणं राबवली जातायत. समान कामासाठी समान पगाराची मागणी करणाऱ्या चळवळी उभ्या राहतायत, ज्यामुळे महिला आणि पुरुषांच्या उत्पन्नातली दरी कमी होते आहे."

फोटो स्रोत, Getty Images
पण एवढी मजल मारली असली, तरी अजूनही बरंच अंतर बाकी आहे आणि ही दरी आणखी भरून निघण्याची गरज आहे, असंही त्या सांगतात.
"कोणतीही सरकारं दिलेली आश्वासनं पाळत नाहीयेत. कंपन्या अधिकाधिक महिलांना नोकरी देत नाहीयेत, विनापगार घरकाम किंवा कुटुंबियांची काळजी घेणाऱ्या महिलांना शिक्षाच होते आहे. त्यामुळेच आपल्याला प्रश्न विचारायला हवा, महिलांच्या कामाची दखल घेतली जाते आहे का? कुटुंबाला किंवा लहान मुलांना विचारात घेऊन धोरणं बनवली आहेत का? हे पाहायला हवं.
"असे पुरुष वाढवायला हवेत, जे घरातल्या विनापगार कामात योगदान देऊन पत्नीवरचा भार हलका करतील. सरकार आणि समाज अजून खूप काही करू शकतो."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








