You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मिरी पंडित: 'आम्ही काश्मिरी आहोत, काश्मीर सोडून जायचा प्रश्नच नाही'
- Author, रियाज मसरुर
- Role, श्रीनगरहून, बीबीसी न्यूज
सिद्धार्थ बिंदरू वडिलांसाठी चिकन श्वार्मा आणण्यासाठी जात होते. तितक्यात त्यांना पॉलिक्लिनिकमधून फोन आला.
पलीकडून बोलणाऱ्या माणसाने सांगितलं की त्यांचे वडील गेले. हे ऐकताच 40वर्षीय प्रसिद्ध एंडोक्राइनोलॉजिस्ट बिंदरू यांना धक्का बसला.
5 ऑक्टोबरला रात्री उशिरा हातात पिस्तूल घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी बिंदरू 'हेल्थ झोन' प्रवेश केला आणि त्याचे मालक माखनलाल बिंदरू यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.
दुकानाच्या सेल्समनने सांगितलं की ते फोनवर बोलत होते तेवढ्यात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आणि नंतर अंधारात पळून गेले.
अतिशय अस्वस्थ दिसणाऱ्या डॉ. सिद्धार्थ यांनी सांगितलं की, "वडिलांना एक गोळी हृदयात लागली आहे. दुसरी खांद्याला तर तिसरी गळ्यात लागली आहे."
डॉक्टर सिद्धार्थ त्याच पॉलिक्लिनिकमध्ये प्रॅक्टीस करतात पण त्यादिवशी त्यांची सुटी होती. रडतरडत त्यांनी त्यादिवशी काय घडलं ते सांगितलं.
"बाबांनी दुपारी मला फोन केला आणि चिकन श्वार्मा आणायला सांगितलं. त्यांना हे खूप आवडतं. म्हणून मी ते घेऊन जायला निघालो. पण चिकन त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही".
बिंदरू कोण होते?
68वर्षीय बिंदरू हे काश्मीरमधील प्रसिद्ध डॉक्टर आणि फार्मासिस्ट राकेश्वर नाथ यांचे चिरंजीव होते.
आरएन बिंदरू यांचा संपूर्ण काश्मीरात आणि विशेषत: श्रीनगरमध्ये फार्मसीचा मोठा कारभार होता. बिंदरू मेडिकेट नावाच्या त्यांच्या दुकानात अन्यत्र मिळत नाहीत अशी औषधंही मिळायची.
1983 मध्ये वडिलांच्या निधनानंतर एमएल बिंदरू यांनी श्रीनगरच्या दुकानाची जबाबदारी घेतली. याकामात त्यांची पत्नी त्यांना मदत करत असे.
डॉ. सिद्धार्थ वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणतात, "माझे बाबा व्यवहारी होते, आई दुकानात बिलं बनवण्याचं काम करत असे. औषधं खरेदी करण्याच्या बरोबरीने ग्राहकांना औषधं पुरवण्याचं कामही करत असे. आई दुकानात का काम करते असं मी बाबांना विचारलं होतं तर ते म्हणाले मला काही झालं तर मुलांना कोणताही त्रास व्हायला नको. मी नसलो तरी दुकान आणि जगणं असंच सुरू राहायला हवं असं ते म्हणत असत".
1990च्या दशकात कट्टरतावाद्यांच्या हिंसेनंतर काश्मीर खोऱ्यातून हजारो हिंदू सोडून गेले. आता काश्मीरमध्ये हिंदूंचं प्रमाण खूपच कमी आहे. अशाच 800 कुटुंबांपैकी बिंदरू यांचं एक घर आहे.
एका दिवसात तीन लोकांना मारण्यात आलं त्यापैकी एमएल बिंदरू एक होते. अज्ञात हल्लेखोरांनी बिहारमधील हिंदू विक्रेता आणि काश्मीरी मुसलमान कॅब ड्रायव्हर यांना मारलं. याआधी दोन काश्मीरी मुसलमानांनाही असंच मारण्यात आलं.
सुपिंदर कौर आणि दीपक चंद यांची हत्या
या घटनेनंतर दोनच दिवसात हल्लेखोरांनी श्रीनगरमधल्या बाहरी संगम भागातल्या सरकारी शाळेवर हल्ला केला. त्यांनी एकेकाला ओळख विचारली आणि शाळेचे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाची हत्या केली.
सुपिंदर कौर काश्मीरी शीख समाजाच्या होत्या. सुपिंदर यांना दोन मुलं आहेत. त्या अलुचा बाग परिसरात राहायच्या. दीपक चंद त्याच शाळेत शिक्षक होते. ते जम्मूला राहायचे.
सुपिंदर यांच्या अकाली निधनाने त्यांचे पती रामरेशपाल सिंह यांना प्रचंड धक्का बसला. बँकेत काम करणारे रामरेशपाल दोन दिवस काहीच बोलू शकले नाहीत. सुपिंदरला कसं मारलं मी विचारूच शकलो नाही. माझी बायको गेली, माझं आयुष्य व्यर्थ झालं असं रामरेशपाल म्हणाले. ते बोलत असताना त्यांचे सहकारी आजूबाजूला होते. सुपिंदर यांच्या शाळेतील सहकारीही होते.
त्या शाळेतील क्रीडाशिक्षक अब्दुल रहमान म्हणाले की, "35 वर्षांच्या कार्यकाळात सुपिंदर यांच्यासारखी दयाळू माणूस पाहिला नाही. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी त्यांनी स्वत:च्या खिशातून पैसा दिला. कारण सरकारी प्रक्रियेला बराच वेळ लागतो".
पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हत्यारबंद हल्लेखोर शाळेत शिरले आणि ते प्रत्येकाला नाव विचारू लागले. हल्लेखोरांनी सुपिंदर आणि दीपक यांना बाजूला केलं आणि त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
सुपिंदर यांच्या मुलांना आई गेल्याचं कळलं आहे पण ते काही बोलण्याच्या स्थितीत नाहीत.
अंत्यसंस्काराच्या वेळी आठ वर्षाच्या भावाला बिलगून बसलेल्या 12वर्षीय जसलीन कौरने आईला शेवटचा निरोप दिला. मी कधी मृतदेह पाहिला नव्हता. मला प्रचंड धक्का बसला आहे. नक्की काय होतंय तेच कळत नाहीये.
त्यांचे शेजारी मजीद यांनी सांगितलं की, "सुपिंदर माझ्या बहिणीप्रमाणे होत्या. त्यांनी एका मुस्लीम अनाथ मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था केली होती. आपल्या पगाराचा काही भाग त्या मुलीच्या शिक्षणासाठी देत असत. अनेक अनाथ मुलांनी आई गमावली आहे".
परिस्थिती सर्वसामान्य झाल्याचा सरकारी दावा फोल?
ऑक्टोबरच्या सुरुवातीला सात लोकांच्या हत्येनंतर सगळं काही सुरळीत झालं आहे आणि शांतता आहे या सरकारी दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
सरकारी अभियान सुरू असतानाच या हत्या झाल्या आहेत. काश्मीरला लागू असलेलं कलम 370 हटवण्यात आल्याचे फायदे काय आहेत हे केंद्र सरकारमधील 70हून अधिक मंत्री सांगण्यासाठी राज्याचा दौरा करत असताना हे हत्याकांड घडलं आहे.
5 ऑगस्ट 2019 नंतर शेकडो लोकांना अटक करण्यात आली होती. दळवळणाची अनेक साधनं बंद करण्यात आली होती. यामध्ये इंटरनेटचा समावेश होता. अनेक शहरं आठवडा आठवडा बंद होती. राज्याच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाचा निषेध केला नाही.
हत्याकांडाचा राज्यातील नेत्यांनी निषेध केला आहे. 1990च्या दशकात जशी परिस्थिती होती तशी निर्माण झाली आहे. परिस्थिती पूर्ववत आणि शांततापूर्ण आहे हा सरकारी दावा फोल ठरला आहे असं काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे.
दोन दशकात पहिल्यांदाच अल्पसंख्याक झाले लक्ष्य
एमएल बिंदरू आणि सुपिंदर कौर यांच्या हत्या म्हणजे 18 वर्षानंतर काश्मिरी पंडित किंवा शीख समाजाच्या नागरिकांवर झालेला हल्ला आहे.
मार्च 2000 मध्ये अनंतनाग जिल्ह्यात चिट्टीसिंह पुरा गावात हल्लेखोरांनी शीख समाजाच्या 35 लोकांना मारलं होतं. 2003 मध्ये पुलवामा इथे सुदूर गावात 20 हून अधिक काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली होती.
काश्मीरमध्ये धार्मिक तणाव वाढल्याच्या काश्मीर पोलीस प्रमुख विजय कुमार यांनी खंडन केलं आहे. कट्टरतावाद्यांनी ज्या लोकांची हत्या केली त्यामध्ये बहुतांश मुसलमान आहेत असं त्यांनी सांगितलं.
2021 मध्ये कट्टरतावाद्यांच्या हल्लात 28 नागरिक मारले गेले आहेत. यापैकी 5 स्थानिक हिंदू आणि 2 शीख आहेत. 2 बाहेरून आलेले कामगार होते.
गेल्या काही दिवसात झालेल्या हत्या म्हणजे धार्मिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न आहे असं जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितलं.
बिंदरू यांच्या हत्येने काश्मिरी पंडितांमध्ये भीतीचं वातावरण आहे. असे काश्मीरी पंडित ज्यांनी काश्मीर सोडलं नाही किंवा गेल्या दशकभरात जे पुन्हा काश्मिरात परतले आहेत.
हल्लेखोरांना पकडण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. शेकडो कट्टरतावादी आणि जामिनावर सुटलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अशा परिस्थितीत अल्पसंख्याक कसे राहणार?
संजय टिक्कू 5000 हून अधिक ... पंडितांचं प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. सध्याच्या परिस्थितीबाबात संजय म्हणाले, "1990च्या दशकात जशी परिस्थिती होती तसं वातावरण आहे. तेव्हा जितकी भीती वाटायची तेवढीच आता वाटते आहे. गेल्या काही दिवसात अनेक काश्मिरी पंडित कुटुंब काश्मीर सोडून जात आहेत. अनेक जाण्याच्या तयारीत आहेत. घाबरलेल्या आवाजातील अनेकांचे मला फोन येत आहेत. अधिकाऱ्यांनी मला श्रीनगरमधील माझ्या घरातून एका हॉटेलात आणलं आहे. अशा भीतीच्या वातावरणात आम्ही कसं राहायचं?
अधिकाऱ्यांनी बिंदरू यांच्या घरी सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. काही काश्मिरी पंडित नेत्यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे. मात्र काश्मीरी पंडित तसंच शीख समाजाच्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.
भिंतीनी वेढलेल्या घरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सरकारी पॅकेजअंतर्गत काश्मिरी पंडित कुटुंब राहतात. या परिसरात स्मशानशांतता आहे. असाच एक कॅम्प काश्मिरातल्या बडगाम इथे आहे. 300 फ्लॅट्समध्ये 1,000 काश्मीरी पंडित राहतात.
या कॅम्पमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "अनेक कुटुंबं काश्मीर सोडून गेली आहेत. इथे असुरक्षित वाटतं. काही झालं तर मदत करू असं आश्वासन सरकारी अधिकारी देत आहेत. मात्र शाळेतील शिक्षकांच्या हत्येनंतर भीतीचं वातावरण आहे. कार्यालयांमध्ये भय आहे. सरकार शाळा आणि कार्यालयांनाही सुरक्षा पुरवू शकत नाही का?
दैनंदिन जीवनावर परिणाम
काश्मीरमध्ये राहू असं शीख नेत्यांनी म्हटलं आहे. मात्र सरकार सुरक्षाव्यवस्था देत नाही तोपर्यंत कामावर जाऊ नका असं त्यांनी शीख समाजाच्या लोकांना म्हटलं आहे.
भय आणि अनिश्चितता यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. हत्याकांडानंतर रस्त्यावर सुरक्षाव्यवस्था वाढली आहे, गाड्यांच्या बरोबरीने रस्त्यावर चालणाऱ्या लोकांची झडती घेतली जात आहे. सतत सायरन वाजत आहे अशी स्थिती आहे. श्रीनगमध्ये एका बेकरीबाहेर उभे असलेले लोक 1990च्या दशकात जे चित्र होतं त्याची आठवण करून देतात.
यापैकीच एक मोहम्मद अस्लम सांगतात, "1990मध्ये काश्मिरी पंडितांना जावं लागणं आणि त्यानंतर जे झालं ते वेदनादायी होतं. काश्मीरातील सगळ्यांना मोठ्या कारवाईला सामोरं जावं लागलं. ते दिवस आठवले तरी भीती वाटते. पुन्हा इथे तसं व्हायला नको". मोहम्मद अस्लम यांनी गोळीबारात त्यांच्या एका भावाला गमावलं आहे.
आम्ही कुठेही जाणार नाही-बिंदरू कुटुंबीय
नोकरी पॅकेजअंतर्गत काश्मिरात परतलेले काश्मीरी पंडित आता इथून जाण्याच्या मनस्थितीत आहेत. मात्र वडिलांचा वारसा सोडून आम्ही कुठेही जाणार नाही असं बिदरु कुटुंबीयांनी सांगितलं.
बिंदरू यांची मुलगी श्रद्धा बिंदरू यांनी सांगितलं की, "माखनलाल यांनी सगळं काही झेललं कारण त्यांना इथे राहायचं होतं. आम्ही काश्मीरचे आहोत. आमच्या धमन्यांमध्ये एमएल बिंदरू यांचं रक्त आहे".
डॉ. सिद्धार्थ यांची दोन्ही मुलं अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होती. सिद्धार्थ सांगतात, "दोन्ही मुलांनी आजोबांच्या अंत्यसंस्कारावेळी असावं असं मला वाटत होतं. त्यावेळी हिंदूंपेक्षा मुसलमानांची संख्या जास्त होती. माझ्या वडिलांनी काय कमावलं आहे हे मुलांना कळावं. एका अल्पसंख्याकाची हत्या म्हणजे निव्वळ हत्या नाही, धार्मिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न आहे. काश्मीर सोडून जाण्याचं काही कारणच नाही. इथे माझी माणसं आहेत. मी त्यांना सोडून जाऊ शकत नाही".
ते सांगतात, "माझ्या घरी येणाऱ्यांमध्ये 90 टक्के मुसलमान असतात. माझ्या वडिलांनी जोडलेली ही माणसं आहेत. 1990च्या आठवणींना ते उजाळा देतात. तणावपूर्ण वातावरणातही मुस्लीम मित्र आमच्या घरी येऊन चहा पित असत.
आमच्या घरी येणारी माणसं हे दाखवून देतात की ते आमच्याबरोबर आहेत. गेल्या 25 वर्षांपासून माझी आई एका मुस्लीम व्यक्तीला राखी बांधते आहे. काश्मीर सोडून जाण्याचं काही कारणच नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)