राज ठाकरे : 'पंचनामे होत राहतील, आधी शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची मदत द्या' #5मोठ्याबातम्या

आज वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या पाच बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया.

1. पंचनामे होत राहतील, आधी शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची मदत द्या- राज ठाकरे

गुलाब चक्रीवादळामुळे गेले काही दिवस संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसलाय.

सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि इतर पिकांचं 100 ठक्के नुकसान झालंय. फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

पंचनामे होत राहतील. आधी शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना मदत द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला 50 हजार रुपयांची तातडीची मदत द्या, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आता वाट पाहण्याच्या मानसिकतेत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करून शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं आहे.

2. ईडीची नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं?

"किरीट सोमय्या म्हणता, की महाराष्ट्रातील अर्ध मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्ध तुरुंगात जाईल. हे तुम्हाला कोणी सांगितलं? ईडीची नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं?" असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.

याचा अर्थ भाजपतर्फे तपास यंत्रणेचा गैरवापर केला जातोय, असा आरोपही जयंत पाटील यांनी केलाय.

महाराष्ट्रातील सरकारला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचलं जात आहे. मंत्र्यांचं नावं घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करू असे सांगून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, असा आरोपही जयंत पाटील यांनी केलाय.

"भाजप चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे. ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे. केंद्रीय संस्थांचा वापर करून गुंडगिरी सुरू आहे. सुडाचं राजकारण राज्यात नव्हे तर देशातही कधी झालेलं नाही. मात्र, भाजपकडून सुरू आहे," असंही जयंत पाटील म्हणाले.

टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

3. राहत्या घरात नजरकैदेत ठेवण्याची सचिन वाझेंची मागणी न्यायालयानं फेटाळली

सचिन वाझेंना दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. आपल्या राहत्या घरात नजरकैदेत ठेवण्याची वाझेनं केलेली मागणी विशेष एनआयए कोर्टानं फेटाळून लावली आहे.

बायपास सर्जरी झाल्यामुळे तीन महिने घरीच नजरकैदेत ठेवण्याची मागणी करणारा वाझेंचा अर्ज एनआयएच्या विरोधानंतर कोर्टानं फेटाळून लावला. तसंच वाझेंना वॉकहार्ट हॉस्पिटलमधून आता जेलच्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची परवानगीही कोर्टानं दिली आहे.

एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

गरज लागलीच तर वाझेंना जेजेतील जेल वॉर्डात दाखल करण्याची मुभा जेल प्रशासनाला देण्यात आली असून तूर्तास वाझेंना घरचं जेवण देण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन वाझेंनी सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात नव्यानं अर्ज दाखल केला होता.

ओपन हार्ट सर्जरी झाल्यानंतर पूर्णपणे बरं वाटेपर्यंत आपल्याला घरातच नजरकैदेत ठेण्यात यावं, अशी मागणी या अर्जातून कोर्टाकडे केली होती.

4. प्रशासनामध्ये 2022 पासून केवळ इलेक्ट्रिक गाड्याच- आदित्य ठाकरे

राज्यात एप्रिल 2022 पासून प्रशासनामध्ये केवळ इलेक्ट्रिक गाड्याच वापरण्यात येतील, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते.

विभागीय आयुक्त कार्यालयात कार्बन न्यूट्रल आणि 'माझी वसुंधरा' या अभियानाबाबत आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

राज्यात प्लास्टिक बंदी झाल्यानंतर पुण्याने चांगलं काम केलं आहे. आता कार्बन न्यूट्रल शहरासाठी देखील पुण्याने पुढाकार घ्यायला हवा, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

पुणे विभाग आणि जिल्ह्यात 'माझी वसुंधरा' अभियानात चांगलं काम झाल्याचंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

पुण्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी पिंपरी मधील टाटा मोटर्स कंपनीला भेट देऊन इलेक्ट्रिक कार निर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली.

लोकमतनं ही बातमी दिली आहे.

5. काँग्रेसमध्ये निर्णय कोण घेतंय हे आम्हालाच माहीत नाही- कपिल सिब्बल

काँग्रेस शासित राज्यांमध्ये पक्षाचे नेते सोडून जात आहेत. पंजाबप्रमाणेच काँग्रेस आपली सत्ता असलेल्या राज्यांमध्येही अशाच संकटांचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाची स्थिती आणि अध्यक्षांच्या गैरहजेरीवर चर्चेची मागणी केली आहे.

"काँग्रेसमध्ये आता कुणीही निवडणून आलेला अध्यक्ष नाही. यामुळे कोण निर्णय घेतंय, हे आम्हाला माहितीच नाही," असा टोला सिब्बल यांनी काँग्रेस हायकमांडला लगावला आहे.

"आम्ही G-23 आहोत, जी हुजूर- 23 नाही. आम्ही मुद्दे उपस्थित करतच राहणार,"असं सिब्बल म्हणाले.

सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांमध्ये कपिल सिब्बलही आहेत. त्यांनी पत्रातून पक्षांतर्गत निवडणुकांसह व्यापक बदल आणि पक्षाला कायम स्वरुपी अध्यक्ष हवा असल्याची मागणी केली होती.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

दरम्यान, जोपर्यंत राहुल गांधी आहेत तोपर्यंत आम्हाला काही करण्याची गरज नाही. ते स्वतःच पक्ष बुडवत आहेत, असा टोला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लगावला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)