You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आनंद गिरी कोण आहेत? महंत नरेंद्र गिरी यांच्यासोबत त्यांचे संबंध कसे होते?
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या कथित आत्महत्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या FIR नुसार, वाघंबरीचे मठ व्यवस्थापक अमर गिरी यांनी आनंद गिरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महंत नरेंद्र गिरी गेल्या काही दिवसांपासून आनंद गिरी यांच्यामुळे तणावात होते. याच कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप अमर गिरी यांनी केला.
पोलिसांनी या प्रकरणी आनंद गिरी यांच्यासह इतर काही जणांना अटक करून तपास सुरू केला आहे.
महंत नरेंद्र गिरी यांच्याजवळ एक कथित सुसाईड नोटही आढळून आलं आहे. यामध्ये आनंद गिरी यांच्या नावाचा उल्लेख आहे.
निरंजन आखाड्याचे संत आणि वाघंबरी मठाचे महंत नरेंद्र गिरी आणि त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यात गेल्या कित्येक दिवसांपासून वाद सुरू होते.
हिंदू धर्मात सध्या एकूण 13 आखाडे आहेत. यामध्ये आवाहन आखाडा, अटल आखाडा, महानिर्वाणी आखाडा, आनंद आखाडा, निर्मोही आखाडा, दशनामी, निरंजनी आणि जुना आखाडा हे प्रमुख आखाडे म्हणून ओळखले जातात.
हे आखाडे आपल्या परंपरेनुसार शिष्यांना शिकवण देतात. त्यांना उपाधी देतात. नरेंद्र गिरी आणि आनंद गिरी हे दोघेही निरंजनी आखाड्याशी संबंधित होते. गेल्या कित्येक वर्षांपासून ते वाघंबरी मठाची जबाबदारी सांभाळत होते.
आनंद गिरी कोण आहेत?
धष्टपुष्ट बांधा, लांब केस आणि फ्रेंच कट दाढी ठेवणारे योगगुरू आनंद गिरी यांचा जन्म 21 ऑगस्ट 1980 रोजी राजस्थानात झाला.
वयाच्या दहाव्या वर्षीच आनंद गिरी हे नरेंद्र गिरी यांच्या संपर्कात आले. नरेंद्र गिरी त्यांना हरिद्वारला घेऊन गेले.
आनंद गिरी आपल्या एका मुलाखतीत सांगतात, "मी वयाच्या दहाव्या वर्षीच घर सोडून दिलं होतं. यानंतर मी कित्येक वर्ष उत्तराखंडमध्ये राहिलो. नंतर मी प्रयागराजला दाखल झालो."
आनंद गिरी यांच्या मते, आपल्या पासपोर्टवर त्यांनी आईच्या नावाच्या ठिकाणी हिंदू देवी पार्वती आणि वडिलांच्या नावाच्या ठिकाणी गुरुचं नाव लिहिलं आहे.
त्यांनी ब्रिटन, कॅनडासह जगभरातील अनेक संसद सभागृहांमध्ये भाषण केलं आहे.
योग गुरू म्हणून आपली ओळख सांगणारे आनंद गिरी यांनी अनेक देशांचा प्रवास केलेला आहे.
आनंद गिरी यांना सार्वजनिक जीवनात ओळख आणि प्रसिद्धी मिळण्यासाठी प्रयागराज या ठिकाणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.
आनंद गिरी यांचा प्रयागराजशी संबंध
आनंद गिरी यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात की प्रयागराज येथे त्यांना एका रॉकस्टार साधूचा दर्जा मिळालेला आहे. लोक त्यांना छोटे महाराज म्हणूनही संबोधतात.
हँडल सोडून बुलेट चालवणं वगैरे स्टंट केल्याबाबत आनंद गिरी युवावर्गात विशेष लोकप्रिय आहेत.
यासोबतच एक युथ आयकॉन, स्टाईल आयकॉन आणि डायनॅमिक गुरू म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.
पण आनंद गिरी यांची मुख्य ओळख नरेंद्र गिरी यांचे शिष्य म्हणूनच जास्त आहे, असं प्रयागराज आणि वाघंबरी मठसंदर्भात माहिती असणारे ज्येष्ठ पत्रकार रतिभान त्रिपाठी सांगतात.
ते पुढे म्हणतात, " सुदर्शन व्यक्तिमत्त्व लाभलेले आनंद गिरी किशोरवयापासूनच नरेंद्र गिरी यांच्यासोबत होते. नरेंद्र गिरी हे मितभाषी व्यक्ती होते. त्यामुळे ते अनेक ठिकाणी आपले शिष्य आनंद गिरी यांनाच बोलण्याची संधी देत.
आनंद गिरी यांना नरेंद्र गिरी यांच्या सर्वात जवळच्या शिष्यांपैकी एक मानलं जात असे.
अनेक प्रसंगी आनंद गिरी आपले गुरू नरेंद्र गिरी यांचा बचाव करतानाही दिसून आले.
वाक्चातुर्यात निपुण असलेल्या आनंद गिरी यांनी हळूहळू एक योग गुरू म्हणून स्वतःला प्रस्थापित केलं.
प्रयागराज शहरात आनंद गिरी यांची ओळख आणि लोकप्रियता समजून घेण्यासाठी त्यांचं फेसबुक प्रोफाईल पाहिल्यास स्पष्ट होऊ शकतं.
अनेक ठिकाणी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत लोक त्यांच्यासमोर हात जोडलेले दिसून येतात.
आपल्या मुलाखतीत आनंद गिरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांना केशव असं नावानेच संबोधताना दिसतात.
रतिभान त्रिपाठी या दबदब्याचं कारण सांगताना समजवतात, "आनंद गिरी हे प्रयागराजमधील 'बडे हनुमान' मंदिराच्या प्रमुख पदी होते. हे मंदीर प्रयागराजमध्ये ग्रामदेवता म्हणून ओळखलं जातं. तिथं देश-विदेशातून अनेक भाविक दर्शन घेण्यासाठी येतात."
मंदिरात येणाऱ्या मोठ-मोठ्या असामींना दर्शन घडवणं, आरती करून घेणं यांसारख्या वेळी नरेंद्र गिरी यांच्यासोबत आनंद गिरीही उपस्थित राहत असत. यामुळेच त्यांचा मोठ-मोठ्या लोकांशी थेट संबध येऊ लागला. त्यांच्याशी बातचीत-चर्चा होऊ लागली, असं त्रिपाठी म्हणाले.
ऑस्ट्रेलियात लैंगिक शोषणाचा आरोप
आनंद गिरी जगभरात योग शिकवण्यासाठी जात असतात. अशाच एका परदेश दौऱ्यादरम्यान लैंगिक शोषण केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
रतिभान त्रिपाठी सांगतात, "ते लोकांना योग शिकवण्यासाठी परदेशात जात असत. तीन वर्षांपूर्वी ते ऑस्ट्रेलियाला गेले होते. त्याठिकाणी आनंद गिरी यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्याला स्पर्श केला, असा आरोप एका महिलेने त्यांच्यावर केला होता. या प्रकरणात आनंद गिरी यांना अटक झाली. ते तुरुंगातही होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची सुटका झाली. पुढे कुंभ मेळ्यात ते आपल्या गुरुंसमवेत सक्रिय होते."
गुरू नरेंद्र गिरी यांच्यासोबतचा वाद
आनंद गिरी आणि नरेंद्र गिरी यांच्यातील संबंध अतिशय जवळचे होते, हे त्या दोघांना ओळखणाऱ्या सर्वांना माहीत आहे.
पण वाघंबरी मठाच्या जमिनीवरून झालेल्या वादानंतर गुरू आणि शिष्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या.
नरेंद्र गिरी हे मठाच्या जमिनींची विक्री वैयक्तिक पातळीवर आहेत, असा आरोप आनंद गिरी यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणात पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष आणि गृहमंत्री यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती.
पण या प्रकरणात निरंजन आखाड्यासह इतर अनेक साधू-संतांनी नरेंद्र गिरी यांना पाठिंबा दिला.
नरेंद्र गिरींकडे क्षमायाचना
दरम्यान, याच्या काही काळाने आनंद गिरी यांनी आपले गुरू नरेंद्र गिरी यांनी माफी मागितली होती. याचे व्हीडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पण त्यानंतरही नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी यांना वाघंबरी मठ आणि बडे हनुमान मंदिरात परत येण्याची संधी दिली नाही.
आखाडा परिषदेच्या घडामोडींचे जाणकार ज्येष्ठ पत्रकार रवी उपाध्याय यांच्या मते, या संपूर्ण प्रकरणासाठी आनंद गिरी यांची महत्त्वाकांक्षा कारणीभूत आहे."
ते सांगतात, "आनंद गिरी अत्यंत डायनॅमिक आणि महत्त्वाकांक्षी व्यक्ती होते, यात तथ्य आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेवर पकड असलेले आनंद गिरी अधिकाऱ्यांसोबतच नेत्यांच्या संपर्कात होते. कुणालाही मंदिरात आरती, दर्शन करायवयाचे असल्यास ते थेट आनंद गिरींना संपर्क साधायचे. यामुळे मोठ्या लोकांमध्ये त्यांची उठ-बस सुरू झाली."
"यासोबतच योग गुरू म्हणून स्वतःला स्थापित करण्यासाठी गंगा सेना बनवण्यासाठी, तसंच माघ महिन्यात भरवण्यात येणाऱ्या जत्रेत आपला प्रभाव वाढवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. ही गोष्ट नरेंद्र गिरी यांच्या इतर शिष्यांना आवडली नाही. त्यांनी याबाबत नरेंद्र गिरी यांच्याकडे तक्रार करणं सुरू केलं. यावरूनच गुरू आणि शिष्य यांच्यात अंतर पडण्यास सुरू झालं होतं."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)