चंद्रपूर : काँग्रेसने शिवसेनेचे 7 नगरसेवक फोडले, दबाव टाकल्याचा सेना नेत्यांचा बाळू धानोरकरांवर आरोप

शिवसेनेच्या नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
फोटो कॅप्शन, शिवसेनेच्या नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
    • Author, नीतेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

चंद्रपूरच्या भद्रावतीत काँग्रेसच्या सत्कार सोहळ्यात वरोऱ्याच्या 7 शिवसेना नगरसेवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

7 शिवसेनेच्या नगरसेवकांचा काँग्रेस प्रवेश हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

15 सप्टेंबरला खासदार बाळू धानोरकर यांनी काही नगरसेवक, लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच जाहीर केलं होतं. त्यानुसार भद्रावतीच्या सरपंच सत्कार आणि कार्यकर्ता मेळाव्यात या सर्वांनी काँग्रेस प्रवेश केलाय.

गेल्या 25 वर्षांपासून भद्रावती नगर परिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यात 28 सदस्यसंख्येपैकी 17 नगरसेवक शिवसेनेचे आहेत. हे सगळे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत बाळू धानोरकर यांनी याधीच दिले होते.

बाळू धानोरकर

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, बाळू धानोरकर

पण आपले नगरसेवक काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चाहूल शिवसेनेला लागली आणि वेळीच आपल्या नगरसेवकांना थांबवण्यात शिवसेनेला यश आलं. महत्वाचं म्हणजे खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे भाऊ 2 टर्म भद्रावती नगर पालिकेत अध्यक्ष आहेत.

आज (16 सप्टेंबर) पार पडलेल्या कार्यक्रमात भद्रावती नगर परिषदेतील 3 भाजप नगरसेवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर याच भागातील दुसरी नगर परिषद असलेल्या वरोरा मधील शिवसेनेच्या 9 पैकी 7 नगरसेवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. त्यासोबतच इतर कार्यकर्त्यांनीही पक्षात प्रवेश घेतला आहे.

याबद्दल बोलताना शिवसेनेचे चंद्रपूर संपर्क प्रमुख प्रशांत कदम म्हणाले "7 नगरसेवक काँग्रेसमध्ये गेल्याने आम्हाला तिळमात्रही फटका बसलेला नाही. खासदार बाळू धानोरकर यांनी शक्तिप्रदर्शन दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. खासदार धानोरकर यांनी दहशत आणि दबावाखाली या नगरसेवकांचा प्रवेश करून घेतला आहे. कारण या सगळ्यांशी आमचं बोलणं झालं होतं. ज्यावेळी बाळू धानोरकर शिवसेनेत होते त्यावेळी त्यांनीच त्यांना निवडून आणलं होतं. पण आता फक्त दहशतीखाली त्यांनी प्रवेश करून घेतला आहे."

"पण धानोरकर भद्रावतीच्या 16 नगरसेवकांचा काँग्रेस प्रवेश करणार होते. त्यात ते अपयशी झाले. इतकंच नाही तर नगराध्यक्ष असणाऱ्या सख्ख्या भावाचाही काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ शकले नाही. ही शिवसेनेची ताकत आहे," असं कदम यांनी म्हटलं.

"शिवसेना मित्र पक्ष असला तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. सर्वांनी त्यांच्या मर्जीने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, यात कुठलही दबावाचं राजकारण नाही," असं स्थानिक खासदार बाळू धानोरकर यांनी या प्रवेशांनंतर म्हटलंय.

या प्रवेशानंतर राज्यात सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसचे संबंध ताणले जाणार की पारनेरच्या राजकीय नाट्याची पुनरावृत्ती होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी जुलै महिन्यात पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

"आता आमचं ठरलं आहे आम्ही निलेश लंके यांच्या बरोबर राहणार आहे. शिवसेनेनं परत बोलावलं तरी जाणार नाही. आम्ही पदाचा राजीनामा देऊ, पण शिवसेनेत परत जाणार नाही," अशी पारनेरचे नगरसेवक नंदकिशोर देशमुख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली होती.

नगरसेवक शिवसेना प्रवेश

फोटो स्रोत, SHIVSENA

मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासात या सर्व नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता.

पारनेरमध्ये नेमकं काय घडलं होतं?

निलेश लंके आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते आधी शिवसेनेचे पारनेर तालुका प्रमुख होते. तत्कालीन स्थानिक शिवसेना आमदार विजय औटी यांच्याविरोधात जाऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2019ची विधानसभा निवडणूक लढवली.

स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये विजय औटी यांच्याविरोधात नाराजी होती. तसंच बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांनीसुद्ध ते निलेश लंके यांचे जुने कार्यकर्ते असल्याचं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं.

त्यातच पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुकीला अवघे 3 महिने असताना 5 शिवसेना नगरसेवकांनी लंकेंच्या साथीनं राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये तो झाला सुद्धा. आमचा विरोध स्थानिक माजी आमदारांना आहे उद्धव ठाकरेंना नाही असं त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं.

अजित पवारांसोबत शिवसेना नगरसेवक

फोटो स्रोत, Getty Images

या प्रवेशाआधी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी 26 जून रोजी पारनेरचा दौरा केला. पण त्यांची ही कौटुंबिक भेट असल्याचा दावा निलेश लंके यांनी केला होता. त्यानंतर 4 जुलैला बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनाच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.

स्थानिक पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याचं या नगरसेवकांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं. पुढे 2 दिवसांना म्हणजेच 6 जुलै 2020 रोजी खुद्द शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली.

7 जुलैला सकाळपासून शिवसेनेच्या अधिकृत सुत्रांच्या हवाल्यानं उद्धव ठाकरे यांनी त्यांचे 5 नगसेवक पुन्हा पक्षात पाठवण्यासाठी अजित पवारांकडे निरोप पाठवल्याचं वृत्त आलं.

त्यानंतर आम्ही परत जाणार नाही असा पवित्रा घेणारे नगरसेवक मुंबईत पोहोचले, त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि नंतर मातोश्रीवर जाऊन पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

पारनेरप्रकरणी उद्धव ठाकरे नाराज नाहीत, माझ्या मनाला ते पटलं नाही. म्हणून मी त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना या वादावर पडदा टाकायला सांगितलं, असं अजित पवार यांनी या घटनेनंतर म्हटलं होतं.

पारनेर प्रकरणी बोलताना अजित पवार यांनी म्हटलं, "ते नगरसेवक भाजपमध्ये चालले होते, असं मला सांगण्यात आलं. पण, नंतर कळालं की ते शिवसेनेचे नगरसेवक आहेत. आमचं महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे फोडाफोडीचं राजकारण करायचं नाही, हे ठरलं आहे. त्यामुळे मी त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांचे प्रश्न सोडवू असं म्हटलं."

"मुख्यमंत्री नाराज नव्हते, पण माझ्या मनाला ते पटलं नाही. म्हणून मी त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना या वादावर पडदा टाकायला सांगितलं," असंही पवार यांनी सांगितलं होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)