You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रामदास आठवले : 'शिवसेनेला वाचवायचं असेल, तर उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) 'शिवसेनेला वाचवायचं असेल, तर उद्धव ठाकरेंनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे'
शिवसेनेला वाचवायचं असल्यास उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे, असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलंय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
रामदास आठवले म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईच्या बाहेर पडत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी फक्त मुंबईच्या बाहेर न पडता सरकारच्या बाहेर पडावं. सरकारच्या बाहेर पडून त्यांनी भाजप आणि आरपीआयसोबत यावं. शिवसेना वाचवायची असेल तर त्यांनी आपल्या निर्णयात बदल करणं आवश्यक आहे."
तसंच, अडीच-अडीच फॉर्म्युलावर शिवसेना-भाजप एकत्र येऊ शकतात, असंही रामदास आठवले म्हणाले.
"हे सरकार एकमेकांवर कुरघोडी करणारं सरकार आहे. एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहेत," असं म्हणतात आठवले पुढे म्हणाले, हे सरकार जावं आणि आमचं महायुतीचं सरकार यावं.
रामदास आठवले यांच्या वक्तव्यावर शिवसेनेकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया आलेली नाही.
2) अब्दुल सत्तार म्हणतात, 'इम्तियाज जलील माझेच पाप…'
"एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे माझेच पाप आहे आणि जर ते आमच्यावरच उलटणार असतील तर त्याचा शेवटचा मंत्र आमच्याकडे आहे, तो वापरू आणि त्यांना घरी पाठवू," असं वक्तव्य राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केले. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिलीय.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यंमत्री उद्धव ठाकरे 17 सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरात येणार आहेत. त्यावेळी एमआयएम आणि मनसेकडून आंदोलन केली जाणार आहेत.
यावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, अशी आंदोलनं करून हे लोक मराठवाड्याच्या विकासाची गती कमी करू पाहत आहेत.
तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाला घाबरणार नाहीत, ते येतील आणि कामाचा शुभारंभ करतील, असंही सत्तार म्हणाले.
"इम्तियाज जलील यांनी कोणता विकास केला? ते पाच वर्षे आमदार तर आता खासदार आहेत. महापालिकेत 26 नगरसेवक आहेत. मग त्यांच्या वॉर्डात काय काम झाले? याचा अहवाल त्याना द्यावा लागणार आहे," अशी टीका त्यांनी केली.
3) कोपरगावचे आमदार आशुतोष काळे साई संस्थानच्या अध्यक्षपदी
कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
साई संस्थानचा कारभार सध्या न्यायाधीशांकडे होता. त्याठिकाणी स्थानिकांना संधी द्यावी अशी मागणी पुढे आली होती. त्यानंतर स्थानिक अध्यक्ष देण्याबाबत हालचाली सुरू होऊन अखेर काळे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
या पदास राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. गुरुवारी (16 सप्टेंबर) रात्री उशिरा विधी व न्याय विभागाने संस्थानच्या पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. यामध्ये काळे यांच्यासह उपाध्यक्षपदी शिवेसेनेचे अॅड. जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
4. 'मला माजी मंत्री म्हणून नका' म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना संजय राऊतांचा फोन
"मला माजी मंत्री म्हणू नका. पुढील दोन-तीन दिवसांत कळेल," असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात नुकतंच केलं होतं. या वक्तव्याचे विविध अर्थ काढले जात असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाटील यांना फोन केल्याचं म्हटलं आहे.
याविषयी बोलताना राऊत म्हणाले, "मी स्वतः चंद्रकांत पाटील यांना फोन केला होता. तुम्ही पुढची 25 वर्षे माजी मंत्रीच राहणार आहात, असं मी त्यांना सांगितलं आहे." ही बातमी लोकमतने दिली.
5. भारताचा तालिबान किंवा पाकिस्तान होऊ देणार नाही - ममता बॅनर्जी
भारताचं रुपांतर तालिबान किंवा पाकिस्तानमध्ये मी कदापि होऊ देणार नाही, असं वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
भवानीपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील प्रचारसभेत ममता बॅनर्जी बोलत होत्या. भवानीपूरमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यास ते इथं पाकिस्तान तयार करतील, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. या आरोपांना बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिलं.
"भाजप ज्या पद्धतीने काम करतं, ते मला आवडत नाही. ते लोकांमध्ये फूट पाडत आहेत, नंदीग्राममध्येही ते असंच बोलत होते," असं ममता बॅनर्जींनी म्हटलं. ही बातमी NDTV ने दिली.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)