छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदेंमध्ये नेमका कशावरून पेटला वाद?

फोटो स्रोत, Facebook/Chhagan Bhujbal
राज्यात सत्तेत असलेल्या सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी आहे. मात्र सत्तेत एकत्र असलेल्या या पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं एका ताज्या घटनेवरून समोर आलं आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार यांच्यात अतिवृष्टीसंदर्भातील आढावा बैठकीत सर्वांसमोरच खडाजंगी उडाली. या घटनेचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
नाशिकचं पालकमंत्री पद असलेल्या छगन भुजबळ यांनी नांदगाव भागात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हा प्रकार घडला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली होती. पण हा वाद वाढत गेला आणि दोघांनी यावेळी एकमेकांना सुनावल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय घडलं?
नाशिकचे पालकमंत्री असलेले छगन भुजबळ हे नांदगाव शहरात झालेल्या ढगफुटीनंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी नांदगाव तालुक्यात दौऱ्यावर गेले होते.

फोटो स्रोत, Facebook/Suhas Kande
छगन भुजबळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसंच या परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्याकडून नुकसानीबाबत माहिती घेत, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
यानंतर तहसीलदार कार्यालयात छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नुकसानीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आपत्कालीन निधीमधून मदत करण्याची मागणी करण्यात आली.
छगन भुजबळ यांनी मदतीचं आश्वासन दिलं पण आमदार सुहास कांदे यांनी तातडीनं आपत्कालीन निधी जाहीर करण्याची मागणी केली. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्याचं रूपांतर बाचाबाचीत झालं आणि दोघांनीही एकमेकांना चांगलंच सुनावलं.
या प्रकारानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आमनेसामने आले होते. कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजीही केली.
तातडीनं मदत जाहीर करा
नांदगाव परिसरात झालेल्या ढगफुटीमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांना आधार म्हणून तातडीनं आपत्कालीन निधी जाहीर करावा अशी मागणी सुहास कांदेंसह नागरिकांनी केली होती.
जिल्हा नियोजन समितीकडे आपत्कालीन निधी असतो. या समितीचं अध्यक्षपद हे पालकमंत्र्यांकडं असतं. त्यामुळं यावर निर्णय घेऊन तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी होती.

फोटो स्रोत, Facebook/Chhagan Bhujbal
मात्र, याबाबत जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चेनंतर निर्णय घ्यावा लागेल. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न असल्याचं आश्वासन भुजबळ यांनी दिलं होतं.
मात्र, सुहास कांदे आणि कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यावरून हा वाद विकोपाला गेला.
भुजबळ बैठक आटोपून निघाल्यानंतर दोन्हीही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचंही चित्र याठिकाणी पाहायला मिळालं.
नंतर दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा
पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यामध्ये तहसील कार्यालयात आढावा बैठकीतच हा वाद झाला. त्यांच्या या वादाचा व्हीडिओदेखील काही वेळातच समोर आला.
सोशल मीडियावर या दोघांच्या वादाचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
या प्रकारानंतर सुहास कांदे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजीदेखील केली. छगन भुजबळ नांदगाव तालुक्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कांदे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
या संपूर्ण वादानंतर छगन भुजबळ निघाले असताना सुहास कांदे यांनी पुन्हा त्यांच्या कारजवळ जाऊन छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केल्याचे व्हीडिओदेखील समोर आले आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








