पुणे मेट्रोच्या कामात गणपती विसर्जन मिरवणूक अडचणीची ठरणार?

लकडी पुल
फोटो कॅप्शन, पुण्यात लकडी पुलावर सुरू असलेलं मेट्रोचं काम
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, पुण्याहून बीबीसी मराठीसाठी

पुण्यातील लकडीपुलावरील मेट्रोच्या मार्गावरुन गणेश मंडळं आणि मेट्रोमध्ये वाद निर्माण झाला आहे.

लकडीपुलावरुन जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळांच्या विसर्जन रथांना अडथळा होईल, असं गणेश मंडळांचे म्हणणं आहे. दुसरीकडे नियमाप्रमाणेच हे बांधकाम करण्यात येत असल्याचं मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गांचे काम पुण्यात सुरू आहे. नुकताच वनाझ ते रामवाडी या मार्गावर मेट्रो कारशेड ते आयडीयल कॉलनी या टप्प्यात ट्रायल रन देखील घेण्यात आली.

येत्या डिसेंबरपर्यंत वनाझ ते डेक्कन हा मार्ग सुरु करण्याचे मेट्राचे नियोजन आहे. तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावरील पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशन ते फुगेवाडी हा टप्पा लवकर सुरु करण्याचा मेट्रोचा प्रयत्न आहे.

वनाझ ते रामवाडी या मार्गावरील मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. सध्या लकडीपुलावर गर्डर टाकण्याचे काम मेट्रोकडून सुरु करण्यात आले होते. त्यासाठी रात्रीच्यावेळी लकडीपूल बंद ठेवणार असल्याचे देखील सांगण्यात आले होते.

परंतु गणेश मंडळांनी आता लकडीपुलावरुन जाणाऱ्या मेट्रोच्या मार्गावर आक्षेप घेतला आहे. या मार्गाची उंची कमी असल्याने विसर्जन मिरवणुकीत विसर्जन रथाला मेट्रोचा मार्ग अडथळा ठरेल असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे काम थांबवण्याची गणेश मंडळांची मागणी आहे.

गणेश मंडळांचं नेमकं म्हणणं काय आहे?

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला मोठा इतिहास आहे त्यामुळे या परंपरेला कुठे गालबोट लागू नये असे मंडळांचे म्हणणे आहे. गुरुजी तालीम गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज परदेशी यांनी म्हटलं, ''पुण्याला वैभवशाली मिरवणुकीची परंपरा आहे. ही मिरवणुक लकडीपुलावरुन जाते. अनेक मंडळांचे मोठे रथ असतात.''

''मेट्रोच्या मार्गाची उंची कमी असल्याने त्याचा मिरवणुकीला अडथळा येणार आहे. कोरोनामुळे मिरवणूक बंद असल्याने गेल्यावर्षी हा प्रश्न लक्षात आला नाही. आता मेट्रोचे काम त्या ठिकाणी दिसत असल्याने हा त्रास आता लक्षात येतोय. यावर तोडगा काय काढणार माहित नाही. परंतु यावर काहीतरी पर्याय शोधावा लागणार आहे. सगळ्या मंडळांची बैठकीतून यातून काय तोडगा निघतो ते पाहू ''

गणेश

कॉग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी देखील याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. बागुल म्हणाले, ''पुण्याची 135 वर्षाची गणेश विसर्जन मिरवणुकीची परंपरा आहे. विसर्जन मिरवणुकीचा लकडीपूल हा शेवटचा टप्पा आहे. विसर्जन मिरवणुकीतील डेकोरेशनची हाईट जास्त असते. असं असताना मेट्राने गर्डरची हाईट 6 कमी कशी काय ठेवली? ''

''आपत्कालिन परिस्थिती उद्भवली तरी देखील या गर्डरमुळे अडचण येऊ शकते. अग्निशमन दलाची गाडी सुद्धा त्याच्या खालून जाऊ शकणार नाही. कर्वे ,फर्ग्युसन रस्त्याला जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही. त्यासाठी आम्ही सर्व गणेश मंडळांनी यात बदल करण्याची मागणी केली. आमचा विकासाला अडथळा नाही. विकास करताना संस्कृती, परंपरा जपली पाहिजे. ती जपलेली दिसत नाही. यातून मार्ग निघेपर्यंत या भागातील काम थांबवावे अशी आमची मागणी आहे.''

तांत्रिकदृष्ट्या हाईट वाढवणे अवघड - मेट्रो

मेट्रोच्या पिलरचे आणि इतर काम झाले आहे. आता तांत्रिकदृष्ट्या लकडीपुलवारील मार्गाची हाईट वाढविणे अवघड असल्याचे पुणे मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. हेमंत सोनावणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केले.

सोनावणे यांनी म्हटलं, ''लकडी पूल येथील काम थांबवावे अशी मागणी गणेश मंडळांनी केल्याचे आम्हाला माध्यमांमधून कळाले. आमचं तिथे सध्या काम सुरु आहे. लकडीपुलावरील मार्गाची उंची रोडपासून साडेसहा मीटर इतकी आहे.''

पुणे मेट्रो
फोटो कॅप्शन, पुणे मेट्रो

''नॅशनल हायवेचे गाईडनाईन्स साडेपाच मीटर इतकी उंची असावी असा आहे. आम्ही एक मीटर जास्त उंच मार्ग केला आहे. त्यामुळे कुठलंही वाहन त्याखालून व्यवस्थित जाऊ शकतं.

कुठल्याही वाहनाला अडचण येणार नाही. आमची आणि गणेश मंडळांची दोनवेळा बैठक झाली आहे. आम्हाला निवेदने मिळाली आहेत. महापौरांनी काही बैठक घेतली तर चर्चा करु. तांत्रिकदृष्ट्या हाईट वाढवणं किंवा बदल करणं अवघड आहे.''

तोडगा निघेपर्यंत काम थांबविण्यास सांगितले - महापौर

गणेश मंडळांची मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे. तोडगा निघेपर्यंत लकडीपुलावरील काम थांबवण्यास सांगितलं असल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

''मेट्रोचं काम लवकर होणं गरजेचं आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठा इतिहास आहे. मिरवणुकीच्या मार्गात मेट्रोच्या पुलाच्या उंचीमुळे अडथळा येईल असे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. कार्यकर्ते मला भेटले. मी मेट्राचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांच्याशी बोललो आहे.

गणेश मंडळाचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आपण बैठक घेऊयात आणि यावर काही मार्ग काढूयात असं मी त्यांना सांगितलं. तोपर्यंत पुलावरील काम थांबवण्यास सांगितलं आहे. चर्चेतून यातून आम्ही निश्चित मार्ग काढू',' असं देखील मोहोळ यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)