डॉ. शारदा : 8 महिन्यांची गरोदर असूनही कोरोना ड्युटी करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू

फोटो स्रोत, ARUN SANKAR
लखनऊच्या 31 वर्षीय डॉ. शारदा सुमन यांचं 4 सप्टेंबरला हैदराबादमध्ये कोरोनामुळे निधन झालं आहे. लखनऊमधील लोहिया हॉस्पिटलमधून त्यांना फुफ्फुसांच्या प्रत्यारोपणासाठी हैदराबादमधील के. आय. एम. ए. हॉस्पिटलमध्ये एअरलिफ्ट करून आणण्यात आलं होतं.
लखनऊमधील लोहिया हॉस्पिटलमध्ये गायनॅक विभागात काम करणाऱ्या निवासी डॉक्टर शारदा यांना एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग झाला होता... त्यावेळी शारदा आठ महिन्यांच्या गरोदर होत्या.
त्यांच्यासोबत काम करणाऱ्या नर्स सुनीता द्विवेदी या रुग्णांची देखभाल करण्यात, त्यांच्यावर उपचार करण्यात मदत करायच्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गायनॅक विभाग इमर्जन्सीप्रमाणेच काम करत होता. बाळंतपणासाठी येणाऱ्या महिला या कोरोना पॉझिटिव्ह असल्या तरी प्रसूती होत होत्या. त्यामुळे डॉक्टर किंवा नर्सेसना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळत होतं.
सुनीत द्विवेदी डॉ. शारदा यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हटलं, "आम्ही सगळे त्यांना सांगायचो की, तुम्ही आठ महिन्यांच्या गरोदर आहात. अशा अवस्थेत काम करु नका. पेशंट तपासू नका. त्या म्हणायच्या की, मी आता सुट्टीवर जाणार आहे. पण नंतर त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्या आणि त्यातून कधीच बाहेर पडू शकल्या नाहीत."
सुनीता पुढे सांगतात की, त्या खूप चांगल्या होत्या. त्यांचं काम उत्तम होतं आणि पेशंट्सची काळजीही खूप मनापासून घ्यायच्या.
त्याच लेबर रुममध्ये काम करणाऱ्या डॉक्टर समीना बेगम यांनाही आम्ही भेटलो.
डॉ. शारदा या समीना यांना एक वर्ष सीनिअर होत्या. समीना सांगतात, "त्या खूप मेहनती आणि सभ्य होत्या. इथे येण्यापूर्वी महिनाभर आधीच त्यांचा साखरपुडा झाला होता. आमच्यासमोरच त्यांचं लग्न झालं होतं."
त्या पुढे सांगतात, "डॉ. शारदा आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. पण संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत स्टाफची कमतरता असल्यामुळे त्यांनी कामावर येण्याचा निर्णय घेतला, सुट्टी घेतली नाही. कोरोनासारख्या महामारीमध्ये त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होती."
डॉ. शारदा यांची तब्येत कशी बिघडली?
14 एप्रिलला डॉ, शारदा यांना कोरोनाचा संसर्ग झाला. श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यामुळे 18 एप्रिलला त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सुरू असलेल्या ऑक्सिजन थेरपीची पातळी वारंवार वाढवण्यात येत होती. 1 मे रोजी बाळाला वाचवण्याच्या आणि डॉ. शारदा यांना श्वास घ्यायला कमी त्रास व्हावा या उद्देशाने सिझेरियन करून बाळंतपण करण्यात आलं.

फोटो स्रोत, डॉ समीना बेगम
9 मे रोजी डॉ. शारदा सुमन यांचा कोव्हिड रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना नॉन कोव्हिड आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट करून व्हेंटिलेटवर ठेवलं गेलं. 20 मे रोजी त्यांच्या छातीत एक ट्यूब टाकण्यात आली, मात्र तरीही ऑक्सिजनची पातळी खालावतच गेली.
त्यानंतर डॉ. शारदा यांना इक्मो मशीनवर ठेवण्यात आलं. हे मशिन कृत्रिम फुफ्फुसांप्रमाणे काम करतं, त्यामुळे फुफ्फुसं आणि हृदयावर कमी दबाव येऊन त्यांचं काम पूर्ववत व्हायला मदत होते. शिवाय मेंदू, किडनी, यकृत यांसारख्या इतर अवयवांना होणारं नुकसानही टाळता येऊ शकतं.
डॉ. शारदा यांच्यावर सलग 52 दिवस कोव्हिड तज्ज्ञ आणि इंटेन्सिव केअर तज्ज्ञ डॉ. पी. के. दास यांच्या देखभालीखाली उपचार होत होते. इक्मो मशीन खराब झाली असती किंवा कोणतीही बारीकशी जरी चूक झाली असती, तरी डॉ. शारदा यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. डॉ. दास यांनी वैयक्तिकरित्या लक्ष घालून डॉ. शारदा यांच्यावर उपचार केले होते.
मात्र त्यांच्या फुफ्फुसात कोणतीही सुधारणा न झाल्यामुळे फुफ्फुस प्रत्यारोपण आणि त्यासाठी होणाऱ्या खर्चाची माहिती घ्यायला सुरुवात करण्यात आली.
हैदराबादमधील के. आय. एम. एस या खासगी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुस प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध होती. मात्र त्यासाठी जवळपास दीड कोटींपर्यंत खर्च येणार होता. लोहिया हॉस्पिटलने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मदत मागितली आणि डॉ. शारदा यांच्या उपचारासाठी दीड कोटींची रक्कम जमा झाली.
बेशुद्धावस्थेत होत्या डॉक्टर शारदा, चिमुकली मुलगी बनली जगण्याचा आधार
कृत्रिम फुफ्फुसांच्या आधारे तग धरुन असलेल्या डॉ. शारदा या पूर्णपणे शुद्धीत नव्हत्या. आपली फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे, हे त्यांना माहीत होतं. अशावेळी त्यांना मानसिकदृष्ट्या स्थिर ठेवणं गरजेचं होतं.

फोटो स्रोत, Dr. Das
त्यांच्या नवजात मुलीला थोडा वेळ त्यांच्याजवळ ठेवलं जायचं. त्या चिमुकल्या जीवाकडे पाहून डॉ. शारदा यांना जगण्याचं बळ मिळेल अशी आशा होती.
डॉ. समीना बेगम यासुद्धा इतर डॉक्टरांच्या बरोबरीने लहान बाळाची काळजी घेत होत्या. त्या सांगतात, "मुलीच्या तब्येतीचीही त्यांना काळजी वाटत होती. त्यांची मुलगी प्री-मॅच्युअर बेबी होती. बालरोगतज्ज्ञांच्या साथीने आम्ही पण तिची काळजी घेत होतो. आता बाळ बरं आहे. तिचं वजनही वाढतंय."
जवळपास दोन महिने लखनऊमध्ये डॉ. शारदा यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. पी.के. दास यांनी सांगितलं, "मी जेव्हा त्यांच्या जवळ जायचो, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत एक विश्वास दिसायचा की, डॉ. दास आले आहेत आणि ते मला वाचवतील. आम्ही खूप प्रयत्नही केले. डॉ. शारदासुद्धा धाडसी होत्या. त्यांनी खूप सहन केलं. मी कधीच त्यांना खचलेलं पाहिलं नाही. खूप समजूतदार होत्या त्या."
डॉ. शारदा यांचे पती डॉ. अजय हे दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करतात.
बीबीसीने जेव्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी म्हटलं, "मी बोलून काय करू? माझा जीव तर निघूनच गेलाय."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








