पंकजा मुंडेंवर अमेरिकेत जाण्यावरून स्पष्टीकरण देण्याची वेळ का आली?

फोटो स्रोत, Getty Images
भाजपच्या नेत्या आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. सोशल मीडियावर सध्या पंकजा मुंडेंची अमेरिका वारी, त्यावरील ट्रोलिंग आणि त्यावर पंकजा मुंडेंनी दिलेलं स्पष्टीकरण याची प्रचंड चर्चा आहे.
पंकजा मुंडेंच्या मुलाचं उच्च शिक्षण अमेरिकेत होणार आहे. त्यासाठी त्याला हॉस्टेलवर सोडण्यासाठी पंकजा मुंडे अमेरिकेला गेल्या होत्या. त्याबाबत त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट केली होती. पण या पोस्टमुळं त्यांना त्रास झाल्याचं समोर आलं.
पंकजा मुंडे यांनी केलेल्या पोस्टवर प्रचंड प्रतिक्रिया आल्या. काही चांगल्या प्रतिक्रिया आल्या, मात्र अनेकांनी त्यांना ट्रोलही केलं. पण यापैकी एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.
विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी या पोस्टला उत्तर देत त्यांनी आतापर्यंत काय काय केलं याचीही माहिती दिली. त्यामुळं सोशल मीडियाच्या ट्रोलिंगमुळे पंकजा मुंडेंना स्पष्टीकरण द्यावं लागलं, अशा चर्चा आता सुरू आहेत.
हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
'मी समर्पित भूमिका बजावतेय'
पंकजा मुंडे यांनी 31 ऑगस्टला फेसबुकवर एक पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचा मुलगा आर्यमन अमेरिकेत उच्चशिक्षण घेणार असून, त्याला हॉस्टेलवर सोडण्यासाठी बोस्टनला आल्याचं सांगितलं होतं.
यापूर्वी मुलाला म्हणजे आर्यमनला वेळ देता आला नाही, याची खंतही पंकजा यांनी या पोस्टमध्ये व्यक्त केली.
"आर्यमनची 10 वी झाली, 12 वी झाली. मी हवा तेवढा वेळ देऊ शकले नाही. 10 वीच्या परीक्षा चालू होत्या. एकही पेपरसाठी मी उपस्थित नव्हते. तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या. आता लेकरू 4 वर्ष नाही म्हणून संपूर्ण वेळ त्याला देत आहे," असं पंकजांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"मी अगदी समर्पित भूमिका बजावत आहे आणि भूमिका ती मी नेहमी आवडीने बजावत असते. माझ्या आर्यमनच्या आईच्या रोलमध्ये मी 100 टक्के आहे,'' असं लिहित पंकजा यांनी पुढचे काही दिवस अमेरिकेत घालवणार असल्याचं स्पष्ट केलं.
पंकजा यांचा हा दौरा पूर्णपणे कौटुंबिक असा होता. पण तसं असलं तरी पक्षाच्या पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणीही काही कार्यक्रमात त्यांना उपस्थितीत लावावी लागली, त्याचीही माहिती पंकजांनी दिली.
लक्ष्मण खेडकर यांची पोस्ट व्हायरल
पंकजा मुंडे यांच्या पोस्टनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 सप्टेंबर रोजी लक्ष्मण खेडकर यांनी पंकजा मुंडे यांना एक विनंतीवजा आवाहन करणारी एक पोस्ट फेसबुकवर लिहिली.
"एक जबाबदार आई म्हणून पंकजाताई तुमचं खूप खूप अभिनंदन आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा मुलगा आर्यमनला ही मनापासून शुभेच्छा," असं म्हणत लक्ष्मण खेडकर यांनी पोस्टची सुरुवात केली.
त्यानंतर मात्र त्यांनी थेट विषयाला हात घातला. "ऊसतोड मजुरांच्या नेत्या या नात्याने, ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजुरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का तेही जरा पाहा," असं खेडकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं.
"बहुमतात सत्तेत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहात, करा काहीतरी, नाही तर असं नको व्हायला की तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची कायम ऊसाच्या फडात," असं म्हणत त्यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं.
आपण काहीतरी करा कारण, इतर नेत्यांकडून काहीही अपेक्षा नसल्याचं लक्ष्मण यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ऊसतोड कामगारांचे ऊसाच्या फडातील फोटोसह त्यांनी ही पोस्ट केली.
फेसबुक प्रोफाईलवरील माहितीनुसार लक्ष्मण खेडकर हे मूळचे पाथर्डीचे असून ते शिक्षक आणि लेखक आहेत. लक्ष्मण खेडकर यांनी अत्यंत थेट आणि परखडपणे त्यांचं म्हणणं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडलं.
ट्रोलिंग करणाऱ्या कमेंट्सचा पाऊस
पंकजा मुंडे यांनी केलेल्या पोस्टनंतर लक्ष्मण यांची ही पोस्ट तर व्हायरल झालीच. पण त्याचबरोबर या विषयी ट्रोलिंग करणाऱ्या कमेंट्सचा पाऊसच जणू पंकजा यांच्या या पोस्टवर आल्या.
अनेकांनी पंकजा यांच्यावर टीका करत स्थानिकांसाठी काही करा असं आवाहन केलं. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या. पण ट्रोल करणाऱ्या कमेंट्सची संख्या ही त्या तुलनेत जास्त दिसून आली.
बाळासाहेब कराड नाव असलेल्या अकाऊंटवरून पंकजा मुंडे यांना एक आवाहन करण्यात आलं. "ताईसाहेब आपल्या मतदारसंघात एखादी बोस्टनसारखी शाळा काढा म्हणजे एखाद्या गरिबाचं लेकरू तरी शिकेल," असं या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Facebook
विक्रम भुजबळ नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून करण्यात आलेल्या कमेंटमध्ये परदेशात मुलाला शिकायला पाठवण्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आला.
"मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची शिक्षणपद्धती ढासळली आहे वाटतं. व्हाटस्अॅप युनिव्हर्सिटीच्या खोट्या शिक्षणपध्दती मुळे स्वतः च्या मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवताना ताई,'' असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तर सागर खलाटे नावाच्या अकाऊंटवरून कार्यकर्त्यांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. "तुमच्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुलांना असंच शिक्षण घेता येईल याची सोय केली तर बरं होईल. ऊस तोडणीसाठी जाणाऱ्या मुलांच्या भविष्याकडे जर असंच लक्ष दिलं तर बरं वाटेल. नाहीतर तुमच्या एका मागून एक पिढ्या अशाच गादीवर बसायच्या आणि आमची पोर कट्टर आजन्म कार्यकर्ते बनून राहायचे,'' असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अन् पंकजांचे स्पष्टीकरण
या सर्व प्रकारानंतर पंकजा मुंडे यांनी एक सप्टेंबरलाच फेसबुक पोस्टच्या माध्यमातूनच स्पष्टीकरण दिलं. विशेषतः लक्ष्मण खेडकर यांचं नाव घेत त्यांनी त्यांच्या मुद्द्यांवर उत्तर दिलं.
"जरूर लक्ष्मण मी ते करेन..." असं म्हणत स्पष्टीकरण देताना पंकजा मुंडे यांनी अमेरिकेच्या पहिल्या दौऱ्याची आठवण सांगितली. तो दौरा उसतोडणी करणाऱ्या महिलांबरोबरच केल्याचं पंकजा यांनी सांगितलं.
"आम्ही पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेही ऊस तोडणाऱ्या विमल (तेव्हा ते ऊसतोड कामगार होते) आणि तश्याच लढण्यास तयार राहून यश मिळवणार्या सख्यांना घेऊन," असं पंकजांनी सांगितलं.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त, 3
ऊसतोड मजुरांना त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करत होते आणि करतच राहणार असल्याचंही पंकजा यांनी त्यांच्या पोस्टद्वारे सांगितलं. त्याचवेळी त्यांनी आणखी काय काय करत आहे हेही सर्वांसमोर मांडलं.
"गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमधून गरजूंच्या शिक्षणाला मदत, आपत्तीग्रस्त संसाराला मदत, रुग्णांच्या उपचारासाठी मदत, कोव्हिड 19 मध्ये कोव्हिड सेंटर, पूरग्रस्त लोकांसाठी मदत फेरी, हे सर्व वंचित आणि शोषित यांच्यासाठी करणे म्हणजे जगणे आहे," असं पंकजा यांनी म्हटलं आहे.
एकूणच पंकजा मुंडेंनी केलेल्या पोस्टनंतर सुरू झालेलं ट्रोलिंग पाहता, त्यात बहुतांश प्रतिक्रियांमध्ये ऊसतोड मजूर आणि कार्यकर्त्यांसाठी काहीतरी करण्याचा उल्लेख होता.
पंकजा मुंडेंचा मतदारसंघ किंवा गड असलेल्या बीड जिल्ह्याच्या एकूण राजकारणाचं केंद्रच ऊसतोड मजूर आहे. त्यामुळं अशाप्रकारे सोशल मीडियावर आपली चुकीची प्रतिमा तयार होऊ नये म्हणून पंकजा मुंडेंनी त्वरित उत्तर दिलं.
त्याचा परिणामही दिसला. पंकजा यांनी ज्या लक्ष्मण यांच्या पोस्टचं उत्तर दिलं होतं, त्यांनी स्वतः दुसऱ्या एका पोस्टमध्ये पंकजा मुंडेंचे, त्यांची दखल घेतल्याबद्दल आभार मानले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








