अमोल मिटकरी : राज ठाकरे अपयशी नेता, त्यांना उत्तर देणं म्हणजे घाणीवर दगड मारणं #5मोठ्या बातम्या

राज ठाकरे अमोल मिटकरी

फोटो स्रोत, facebook

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे घाणीवर दगड मारून अंगावर घाण उडवून घेणं - अमोल मिटकरी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच राज्यात जातीपातीत द्वेष वाढल्याची टीका राज ठाकरेंनी नुकतीच केली होती. ही टीका पक्षाच्या जिव्हारी लागल्याचं दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान, विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

"महाराष्ट्रात दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचं महापातक करून राष्ट्रदोह केला, ती व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जातीयवादाचा आरोप करत आहे," अशा शब्दांत मिटकरी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

तसंच, "अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणं आहे," असंही वक्तव्य मिटकरी यांनी केलं आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.

2. गोपीनाथ मुंडे नसते तर आम्ही गावच्या पारावर हरिपाठ म्हणत असतो - रावसाहेब दानवे

"गोपीनाथ मुंडे राजकारणात नसते तर आम्ही आमच्या गावच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ म्हणत बसलो असतो," अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंडेप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे.

रावसाहेब दानवे

फोटो स्रोत, facebook

जालना येथे गुरुवारी (19 ऑगस्ट) भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान पंकजा मुंडे समर्थकांनी गोपीनाथ मुंडे यांचे फोटो दाखवून घोषणाबाजी केली होती. त्याचा संदर्भ घेत दानवे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शिवाय मंत्रिपदावरून मुंडे समर्थकांमध्य बिलकुल नाराजी नसल्याचा दावा दानवे यांनी यावेळी केला.

"गोपीनाथ मुंडे साहेबांनी भाजप वाड्या, वस्ती तांड्यावर नेला, त्यामुळेच भाजपला अठरा पगड जातींचा पक्ष म्हणून ओळखलं जातं," असं दानवे यांनी म्हटलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.

3. विरोधी पक्षांकडे एकत्र येऊन काम करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही - सोनिया गांधी

"विरोधी पक्षांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्रित आलं पाहिजे," असं आवाहन काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलं आहे.

सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

19 विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या.

"देशाच्या घटनात्मक तरतुदी आणि स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांवर विश्वास ठेवणारं सरकार स्थापन करण्यासाठी विरोधकांना आपल्या समस्या दूर करून एकत्र येत सरकार स्थापन करण्याची गरज आहे," असं गांधी यांनी म्हटलं.

"आपल्या सर्वांच्या काही ना काही समस्या आहेत. पण राष्ट्रीय हितासाठी यातून बाहेर येण्याची वेळ आली आहे. एकत्र काम करण्याशिवाय आपल्यासमोर कोणताही पर्याय नाही," असं सोनिया गांधीं म्हणाल्या. ही बातमी लोकमतने दिली आहे.

4. वर्षभरात मोदींची लोकप्रिया घसरून 24 टक्क्यांवर, इंडिया टुडेचं सर्वेक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता मागील एका वर्षात तब्बल 42 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने घेतलेल्या 'मूड ऑफ द नेशन' सर्वेक्षणामधून हा निष्कर्ष देण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Reuters

गेल्या वर्षी 66 टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दर्शवली होती. पण यंदाच्या वर्षी मात्र केवळ 24 टक्के नागरिकांनी मोदींना पसंती दर्शवली.

"कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळी जानेवारी 2020 मध्ये मोदींची लोकप्रियता 73 टक्के इतकी होती. पण दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वसामान्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं. त्यामुळे यंदाच्या वर्षी मोदींची लोकप्रियता एकूण 49 टक्क्यांनी कमी झाली, असं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

5. पुण्यातील स्टेडियमला नीरज चोप्राचं नाव

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदकाची कमाई करून देणाऱ्या नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. नीरजला मिळत असलेल्या बक्षीसांची यादी मोठी असून यामध्ये आता आणखी एका गोष्टीची भर पडली.

पुण्यातील एका स्टेडियमला भालाफेकपटू नीरज चोप्राचं नाव देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 23 ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डिफेन्स इन्स्टीट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि आर्मी स्पोर्ट्स इन्स्टीट्यूटला भेट देणार आहेत. त्यावेळी त्यांच्या हस्ते येथील एका स्टेडियमला नीरज चोप्राचं नाव देण्यात येईल. ही बातमी ई-सकाळने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)