You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी' पोस्टरमध्ये नेहरुंचा फोटो नाही, काँग्रेस नेत्यांचा आक्षेप #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी' पोस्टरमध्ये नेहरुंचा फोटो नाही, काँग्रेस नेत्यांचा आक्षेप
भारतीय इतिहास संशोधन परिषदेने (ICHR) 'स्वांतत्र्यदिनाचा अमृत महोत्सव' यासंदर्भातील एक पोस्टर जारी केले आहे. यात जवाहरलाल नेहरु यांचा फोटो नसल्याने नवीन वादला सुरुवात झालीय. काँग्रेस नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या पोस्टरचा फोटो ट्वीट केला आहे. यात महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, भगत सिंह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि वीर सावरकर यांचे फोटो आहेत. मात्र नेहरुंचा फोटो नसल्याने त्यावर टीका केली जात आहे.
शशी थरुर म्हणाले, "हे केवळ निंदनीय नाही तर इतिहासाच्या विरोधात आहे. स्वातंत्र्याचा महोत्सव भारतीय स्वातंत्र्याचा आवाज राहिलेले जवाहरलाल नेहरु यांना हटवून साजरा केला जात आहे. पुन्हा एकदा आयसीएचआरने आपलं नाव खराब केलं आहे. ही एक सवय बनत चालली आहे!"
काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. जयराम रमेश यांनी शशी थरुर यांचे ट्वीट रिट्वीट करत टीका केली आहे.
तर काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद म्हणाल्या, "देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे नाव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नसल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कमकुवत होत नाही. तर यावरुन हेच दिसते की भाजप आणि पंतप्रधान हे नेहरुंच्या कर्तृत्त्वाला किती घाबरतात. अशाप्रकरची असुरक्षेची भावना पंतप्रधानांना शोभा देत नाही."
2. '2024 मध्ये भाजप आणि रिपब्लिकन पक्षाचे सरकार येणार'- रामदास आठवले
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कितीही कारस्थान केले तरी त्यांना कोणीही अडवू शकणार नाही. 2024 मध्ये भाजप आणि रिपब्लिकन पक्षाचे सरकार येणार," असं वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. सकाळने हे वृत्त दिलं आहे.
राज्यात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा विचार होत असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्याचा विचार करावा, असाही सल्ला आठवलेंनी दिला आहे.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत यासंदर्भात चर्चा झाली असेल, असंही ते म्हणाले आहेत.
ओबीसी राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असं मत आठवलेंनी व्यक्त केलं. यासंदर्भात राज्य सरकारच्या 'सह्याद्री' अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत रिपब्लिकन पक्षाला निमंत्रण दिलं नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
3. गणेशोत्सवासाठी राज्यात स्थानिक निर्बंध लागू करा, केंद्राची राज्य सरकारला सूचना
आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी राज्यात स्थानिक निर्बंध लागू करा अशी सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना पत्राद्वारे ही सूचना केली आहे.
राज्यात पॉझिटिव्हिटी रेट आणि काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकारने याबाबत खबरदारी घेण्यास सांगितलं आहे, तर उत्सवादरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो अशी शक्यता आयसीएमआरने वर्तवली आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांना गर्दी करु नका असे आवाहन केलं आहे. नागरिकांचा जीव अधिक महत्त्वाचा असून समाजातील सर्व स्तरातील लोकांनी यासाठी सहकार्य करावे असंही ते म्हणाले आहेत.
राज्य सरकारने यंदाही दहीहंडीच्या सार्वजनिक उत्सवाला परवानगी दिलेली नाही. तर सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतही राज्य सरकार कडक निर्बंध जारी करणार आहे.
4. 'शिवसेनेकडून असं होईल हे कधी वाटलं नव्हतं' - नीलम राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात सुरू आहे. यादरम्यान त्यांच्या पत्नी नीलम राणे यांनी पहिल्यांदाच शिवसेनेवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यानंतर नारायण राणे यांची अटक आणि जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांच्या पत्नी नीलम राणे यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेकडून असं कधी होईल असं वाटलं नव्हतं असं त्या म्हणाल्या. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
नीलम राणे म्हणाल्या, "या थरापर्यंत जातील असं वाटलं नव्हतं. जुहू येथील घरावर हल्ला केला याचं मला अधिक दु:ख वाटलं. माझी नातवंड आणि सुना घरात होत्या त्यामुळे मला वाईट वाटलं. घरापर्यंत माणसं येतात तेव्हा त्यांना बेस राहिला नाही असं मला वाटतं. असं राजकारण आतापर्यंत झालं नव्हतं."
भाजपसारखा पक्ष आमच्या पाठिशी उभा आहे त्यामुळे असं काही आता पुन्हा होईल असं वाटत नाही असंही त्या म्हणाल्या.
5. मंदिरं दहा दिवसांत खुली करा, अन्यथा...- अण्णा हजारेंचा इशारा
राज्यातील मंदिरं दहा दिवसांत खुली केली नाही तर जेलभरो आंदोलन करा, असं आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केलं आहे.
राज्यात दारुची दुकानं, हॉटेल्स सर्व काही सुरू करण्यात आलं आहे. तिथेही गर्दी होत आहे. तेव्हा कोरोनाचा संसर्ग होत नाही का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकतमने हे वृत्त दिलं आहे.
मंदिर कृती बचाव समितीने यासाठी आंदोलन उभं करावं असंही आवाहन त्यांनी केलं. राज्य सरकारचं धोरण बरोबर नाही असं म्हणत या आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
भरकटत असलेल्या समाजाला मंदिर तारु शकतात यावर माझा विश्वास असून मी आज जे काही आहे ते मंदिर संस्कृतीमुळे असंही अण्णा हजारे म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)