You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे हे उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीनंतर मवाळ झाले का?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी, सिंधुदुर्गहून
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर थेट टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंची भाषा अचानक बदलली आहे.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक आरोप करणाऱ्या नारायण राणेंची सिंधुदुर्गात पोहोचेपर्यंत भाषा मवाळ झालेली पाहायला मिळतेय.
नारायण राणे अचानक मवाळ होण्याचं प्रमुख कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत झालेली भेट असल्याची चर्चा आहे.
जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्या दिवसापीसून राणे उद्धव ठाकरेंवर सतत हल्लाबोल करत होते.
रत्नागिरीत राणे आक्रमक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपामुळे राणेंना अटक झाली. त्यानंतर शुक्रवारी (27 ऑगस्ट) नारायण राणेंनी पुन्हा जनआशिर्वाद यात्रा सुरू केली.
राणे रत्नागिरीत पोहोचले आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली.
"वहिनीवर अॅसिड टाकण्याचा आदेश कुणी दिला? माझ्याकडे खूप मसाला आहे. हळूहळू सर्व बाहेर काढेन," असं राणे म्हणाले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतही नारायण राणे आक्रमक दिसून आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले, "माझ्यामागे लागू नका. मी बोललो तर परवडणार नाही."
अटक झाल्यानंतर यात्रेचा पहिला दिवस होता. त्यामुळे राणे आक्रमक होतील आणि पुढे मुख्यमंत्र्यांना टार्गेट करतील अशी चर्चा सुरू होती.
27 ऑगस्टलाच दुपारचे चार वाजण्याच्या सुमारास राणे लांज्यात पोहोचले. त्यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यूबाबत उद्धव ठाकरे काही का बोलत का नाहीत? असा सवाल उपस्थित करत आरोप सुरूच ठेवले.
राणे आता सिंधुगुर्गात प्रवेश करणार होते. सिधुदुर्ग जिल्हा राणेंचा गड मानला जातो. त्यामुळे राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल सुरूच ठेवतील असं वाटत होतं.
मुख्यमंत्री-फडणवीस भेट
राणे रत्नागिरीत आक्रमक होत असतानाच मुंबईत एक महत्त्वाची राजकीय भेट सुरू होती. उद्धव ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली.
या चर्चेत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याचा तपशील कळला नाही. पण, राणेंवर चर्चा झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं.
उद्धव-फडणवीस भेटीवेळी राणे रत्नागिरीतून निघून लांजा-राजापूरच्या दिशेने निघाले होते.
राणेंची भाषा मवाळ झाली?
27 ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राणे राजापूरला पोहोचले. राजापूर हा शिवसेनेचा गड आहे. गेली कित्येक वर्ष राजापूरात शिवसेनेची सत्ता आहे.
राजापुरात राणे शिवसेनेवर काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण, राणे अचानक मवाळ झालेले पहायला मिळालं. या सभेचं वृत्तांकन करताना एक गोष्ट लक्षात आली. की म्हणजे, राणेंची भाषा अचानक बदलली होती.
"माझ्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खातं आहे. या खात्याच्या माध्यमातून तरूण-तरूणींना मदत होईल. त्यांनी व्यवसाय करावा," असं राणे लोकांना उद्देशून म्हणाले.
उद्धव ठाकरे, शिवसेना यावर चकार शब्द न काढती राणेंनी आपल्या खात्याची माहिती दिली.
राणेंना राजापूरकरांचा महत्त्वाचा म्हणते नाणारचा मुद्दा उपस्थित केला.
"नाणारला काही लोक विरोध करत आहेत. पण या प्रकल्पामुळे शाळा, कॉलेज, रुग्णालय येईल. कामगारांना सुखसोयी मिळतील. माझी विनंती आहे. याला विरोध न करता सर्वांनी नाणारच्या बाजूने मनाची तयारी करावी," असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, मी जाहीर करतो नाणार होणार.
त्यानंतर राणेंचा पुढचा टप्पा होता सिंधुदुर्गातील खारेपाटण. राणेंनी पुन्हा शिवसेना, उद्धव ठाकरेंवर आरोप न करता "मी माझ्या खात्याच्या माध्यमातून कोकणवासीयांचा लोकांचा विकास करणार हे सांगण्यासाठी आलो आहे," असं वारंवार लोकांना सांगताना पहायला मिळाले.
तीच परिस्थिती पुढच्या काही सभांमध्ये पाहायला मिळाली. शनिवारीदेखील राणेंनी उद्धव ठाकरेंबद्दल फार बोलणं टाळलं.
राणेंची भाषा का बदलली?
उद्धव ठाकरेंविरोधात सातत्याने आक्रमक असलेल्या राणेंची भाषा अचानक का बदलली? हे आम्ही राजकीय जाणकारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
सिंधुदुर्गातील वरिष्ठ पत्रकार दिनेश केळूसकर यांनी राणेंचं राजकारण जवळून पाहिलंय. ते म्हणतात, "ठाकरे-फडणवीस भेटीनंतर राणे मवाळ झाले आहेत. त्यांची भाषा बदललेली दिसून येतेय."
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करणारे राणे मवाळ झाले होते.
दुसरीकडे, कणकवली राणेंचा गड. राणे आल्याचं कळताच हळूहळू शिवसैनिकही शाखेत जमा होऊ लागले. वातावरण तणावपूर्ण झालं होतं.
"ही तणावाची परिस्थिती बहुधा त्यांच्यापर्यंत पोहोचली असेल. त्यात मुंबईत झालेली भेट. याचा परिणाम राणेच्या भाषेवर बहुधा झाला असावा."
राणेंचा दौरा कव्हर करताना आमच्याही ही गोष्ट लक्षात येत होती. राणे ठाकरेंवर थेट हल्ला करणं टाळत होते.
"रत्नागिरीत उद्धव ठाकरेंवर राणेंनी प्रहार केला. पण, सिधुदुर्गात खात्याच्या योजना सांगताना टीकेचा प्रहार कमी झाला," ते पुढे सांगतात.
राणेचा दौरा कव्हर करणारे रायगडचे पत्रकार भारत गोरेगावकर म्हणाले, "रायगड, रत्नागिरीत राणे खूप आक्रमक होते. सर्व कार्यक्रमात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत होते. पण, उद्धव-फडणवीस भेटीच्या बातम्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे."
"कणकवलीत राणे पुन्हा आक्रमक होतील अशी शक्यता होती. पण त्यांनी शिवसेनेवर अवाक्षरही काढलं नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)