You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणेंची अटक उद्धव ठाकरेंची राजकीय खेळी ठरणार का बुमरॅंग होणार?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं राणेंशी असलेलं वैमनस्य राजकारणात नवीन नाही. ठाकरे विरुद्ध राणे हा सामना महाराष्ट्रात 2005 पासून रंगतोय.
मंगळवारी (24 ऑगस्ट) ठाकरे सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक केली. नारायण राणेंच्या निमित्ताने सत्ताधारी शिवसेनेने भाजपला थेट आव्हान देत शिंगावर घेतलंय.
राणेंसारख्या आक्रमक राजकीय प्रतिस्पर्ध्याला अटक करून उद्धव ठाकरेंनी आपला राजकीय डाव खेळलाय.
पण, उद्धव ठाकरेंची ही खेळी शिवसेनेला फायदा देईल? का राजकीय फायद्यासाठी खेळलेला हा डाव शिवसेनेवर बुमरॅंग होईल?
राणेंना अटक ठाकरेंची विचारपूर्वक खेळी आहे?
नारायण राणेंना अटक करून उद्धव ठाकरेंनी भाजपला अंगावर घेतलं.
राजकीय विश्लेषक म्हणतात, राणेंना अटक करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आलाय. हा निर्णय राजकीय असला तरी राणेंवर झालेली कारवाई ठरवून करण्यात आली.
वरिष्ठ राजकीय विश्लेषक अतुल कुलकर्णी सांगतात, "राणेंची अटक शिवसेनेने घेतलेली कॅलक्युलेटेड रिस्क नाही. शिवसेनेने हे ठरवून केलंय."
गेल्याकाही दिवसांपासून भाजप नेते सातत्याने शिवसेनेवर टीका करताना दिसून येत होते. शिवसेना भवन फोडण्यापासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 'अरे-तुरे' अशी एकेरी भाषा वापरण्यात आली.
त्यावेळीदेखील शिवसेनेकडून याचं आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.
वरिष्ठ राजकीय पत्रकार दीपक भातुसे सांगतात, "राणेंची अटक शिवसेनेने विचारपूर्वक घेतलेली रिस्क आहे."
याचं कारण म्हणजे सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर आरोप झाले. इतर अनेक आरोप शिवसेनेला सहन करावे लागले. पण, सत्तेत असल्याने शिवसेनेला फारसं काहीच करता आलं नाही.
"राणेंच्या वक्तव्यामुळे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शिवसेना पुन्हा एकदा चार्ज झालीये. शिवसेना कार्यकर्ते आता भाजपविरोधात अधिक जोमाने कामाला लागतील," असं भातुसे पुढे सांगतात.
शिवसेना सत्तेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे दीड वर्षात शिवसेनेला फारसं आक्रमक होता आलं नव्हतं. शिवसेना सत्तेसाठी लाचर झाली का? असा प्रश्न विचारला जात होता.
अतुल कुलकर्णी पुढे म्हणाले, "शिवसेनेला याचा फायदा होणार. ज्या-ज्यावेळी अशा घटना घडतात. त्यावेळी शिवसेना एकदिलाने आणि एकजुटीने एकत्र येते."
कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी काही वर्षांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आता उरली नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर निवडणुकीच्या मैदानात शिवसैनिक एकत्र उतरलेला पहायला मिळाला.
"या घटनेने विखुरलेल्या शिवसैनिकांना एकत्र आणण्याचं काम भाजपने केलंय. सत्ता असतानाही नाराज शिवसेना एकत्र आली. राणेंच्या निमित्ताने युवा सेना पुन्हा जिवंत झाली," अतुल कुलकर्णी पुढे सांगतात.
राजकीय जाणकार म्हणतात, राणेंच्या विधानाचा अभ्यास करून त्यांना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणतात, "शिवसेनेवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. आपल्या नेत्याने काही बोलावं, कारवाई करावी ही कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे ही राजकीय खेळी शिवसेनेला फायदेशीर ठरू शकते."
वरिष्ठ राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते मात्र राणेंची अटक उद्धव ठाकरेंची चुकीची खेळी म्हणावी लागेल. राज्याच्या राजकीय संस्कृतीला साजेसा असा हा निर्णय नाही.
अटकेमुळे नारायण राणे आता मोठे होतील, असं त्या सांगतात.
उद्धव ठाकरेंचा निर्णय बुमरॅंग होऊ शकेल?
नारायण राणे मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत. त्यामुळे भाजपला अंगावर घेणं शिवसेनेवर बुमरॅंग होईल? शिवसेनेची राजकीय खेळी त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे?
याबाबत आम्ही राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेतलं. वरिष्ठ राजकीय पत्रकार दीपक भातुसे पुढे म्हणतात, "केंद्राने ठरवलं तर उद्धव ठाकरेंचा राजकीय डाव त्यांना त्रासदायक ठरू शकतो."
उद्धव ठाकरेंच्या विश्वासातील अनेक नेते आणि मंत्र्यांच्या मागे सीबीआय आणि ईडीची पीडा अजूनही कायम आहे.
हेमंत देसाई म्हणतात, "भाजप आता गप्प बसणार नाही. भाजप शिवसेना नेत्यांना टार्गेट करण्यास सुरूवात करेल."
अवैध रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर आरोप झालेत. भाजप नेते किरीट सोमय्यांनी या रिसॉर्टबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार केलीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांना त्यांचा बंगला अवैध असल्याच्या आरोपानंतर तोडावा लागलाय.
मनसुख हिरेन प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझेंनी एनआयए कोर्टाला लिहिलेल्या पत्रात अनिल परब यांच्यावर खंडणी वसूल करण्याचे आरोप केले होते.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे. रवींद्र वायकर आणि संजय राऊत यांच्याभोवतीही केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे.
वरिष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, "उद्धव ठाकरेंचा हा डाव बुमरॅंग ठरेल का हे आत्ताच सांगता येणार नाही."
राजकीय विश्लेषक म्हणतात, भाजपने शिवसेना नेत्यांवर कारवाई केली, तर सूडाची कारवाई कोण करतं हे कळेल. सूडाचं राजकारण भाजप करतेय का शिवसेना हे स्पष्ट होईल.
राणेंना केंद्रातून सपोर्ट नाही?
नारायण राणेंवर झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर भाजपचे केंद्रीय नेते राणेंच्या मदतीला धावले नाहीत.
भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी एक ट्वीट केलं, तर प्रवक्ते संबित पात्रा यांनी अटक चुकीची असल्याचं वक्तव्य केलं.
याउलट, रिपब्लिक न्यूजचे संपादक अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर भाजपच्या सर्वच केंद्रीय नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. तशी राणेंच्या अटकेनंतर दिसून आली नाही.
"भाजप नेते राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना आक्रमक होता आलं नाही. शिवसेनेविरुद्ध रस्त्यावर भाजपचे कार्यकर्ते नाहीत. तर राणेंचं समर्थक उतरले होते," भातुसे पुढे सांगतात.
राजकीय जाणकार म्हणतात, राज्यातील एक गट देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आहे. भाजपच्या या गटाला या गोष्टी मान्य नाहीत.
राणेंची लोकप्रियता वाढत राहिली तर देवेंद्र फडणवीस यांना राजकीय अडचणीची ठरू शकते, असं राजकीय पत्रकार म्हणतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)