You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणेंना कोकणात पुन्हा वर्चस्व निर्माण करता येईल का?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
सिंधुदुर्ग नारायण राणेंचा एकेकाळी बालेकिल्ला होता. तळ कोकणात राणेंचं वर्चस्व निर्विवाद होतं.
मात्र, गेल्या काही वर्षात हे चित्र बदललंय. राणेंचा हा बालेकिल्ला ढासळताना दिसतोय. राणेंच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात शिवसेनेला बऱ्याच अंशी यश आल्याचंही दिसून येतं.
कोकणात विेधानसभा आणि लोकसभेत राणे पिता-पुत्रांना शिवसेनेकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. स्वत: नारायण राणे यांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईकांनी पराभवाची चव चाखायला लावली, तर विनायक राऊतांनी लोकसभेत नीलेश राणेंना सलग दोनवेळा पराभूत केलं.
नारायण राणे आता केंद्रीय मंत्री आहेत. मंत्री झाल्यानंतर ते रत्नागिरी-रायगडमध्ये पुराच्या घटनेवेळी आले होते. मात्र, आता ते मंत्री झाल्यानिमित्त 'जनआशीर्वाद' घेण्यासाठी आले आहेत. सिंधुदुर्गात म्हणजे होमग्राऊंडवर तर ते पहिल्यांदाच आले.
भाजपने राणेंना शिवसेनेविरोधात उतरवल्याचं प्रथमदर्शिनी दिसत असलं, तर प्रश्न असा आहे की, राणेंना पुन्हा कोकणात वर्चस्व स्थापन करता येईल? केंद्रीय मंत्रीपदाचं वजन राणेंना पुन्हा कोकणची सत्ता देईल?
राणे कोकणात पुन्हा वर्चस्व स्थापन करतील?
एकेकाळी 'कोकणचा नेता' म्हणून नारायण राणेंना उर्वरित महाराष्ट्रात ओळखलं जाई. कोकणातले मुद्दे राज्यस्तरावर मांडून त्यांनी ती ओळख निर्माण केली होती. पण गेल्याकाही वर्षात त्यांचं कोकणातील राजकीय वजन हळूहळू कमी होत गेलं.
नारायण राणेंचं वर्चस्व फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतं मर्यादित असून, रत्नागिरी आणि रायगडमध्ये त्यांचा दबदबा नाहीय, असंही काही राजकीय विश्लेषक सांगतात.
अशा परिस्थितीत राणेंना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने ते राजकीय दबदबा निर्माण करू शकतील?
सिंधुदुर्गमधील ज्येष्ठ पत्रकार दिनेश केळुसकर यांनी नारायण राणेंचा राजकीय प्रवास फार जवळून पाहिलाय.
केळुसकर सांगतात, "राणेंना पुन्हा कोकणात वर्चस्व प्रस्थापित करता येणार नाही. एकेकाळी राणेंकडे कार्यकर्त्याचं नेटवर्क खूप मोठं होतं. याच्या जोरावर राणेंनी वर्चस्व प्रस्थापित केलं. पण आता ते कार्यकर्ते त्यांच्यासोबत नाहीत."
राजन तेली, सतीश सावंत यांसारखे राणेंचे सर्व विश्वासू कार्यकर्ते त्यांना सोडून गेलेत.
केळूसकर सांगतात, "राणेंसमोर सर्वात मोठं आव्हान आहे जिल्हा बॅंकेवर नियंत्रण मिळवणं. त्यांचे एकेकाळीचे कट्टर समर्थक सतीश सावंत आता अध्यक्ष आहेत."
कोकणात सद्यस्थितीत शिवसेनेचे 9 आमदार आहेत, तर भाजपचे फक्त दोन आमदार आहेत.
केळुसकर पुढे म्हणाले, "राणे 2024 निवडणुकीकडे पाहता फार काही बदल करू शकतील असं वाटत नाही."
राजकीय विश्लेषक सांगतात, नारायण राणेंना कुडाळमध्ये शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागला, तर पुत्र निलेश राणे लोकसभेत पराभूत झाले. कोकणातील पराभव राणेंच्या फार जिव्हारी लागला होता.
सिंधुदुर्गातील वरिष्ठ पत्रकार विजय गावकर म्हणतात, "राणेंकडे गेली कित्येक वर्ष सत्ता नव्हती. आता केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने कोकणात पॅाझिटिव्ह वातावरण आहे."
2005 साल नारायण राणेंनी शिवसेना सोडून कॅांग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना घेऊन पक्षवाढीची विचार केला होता.
दिनेश केळुसकर पुढे सांगतात, "राणेंच्या कोकणातील लोकप्रियतेचा फायदा होईल म्हणून काँग्रेसने त्यांना मंत्रिपद दिलं. पण याचा काँग्रेसच्या वाढीत फायदा झाला नाही."
दुसरीकडे राजकीय विश्लेषक सांगतात, नारायण राणेंना कुडाळमध्ये शिवसेनेकडून पराभव पत्करावा लागला, तर पुत्र निलेश राणे लोकसभेत पराभूत झाले. कोकणातील पराभव राणेंच्या फार जिव्हारी लागला होता.
विजय गावकर पुढे म्हणतात, "भाजपने आपली पुर्ण ताकद राणेंच्या मागे उभी केली आहे. याचा राणेंना नक्की फायदा होईल. ज्यांचा फायदा त्यांना कोकणात वर्चस्व निर्माण करण्यासाठी होईल."
राजकीय अभ्यासक म्हणतात, शिवसेनेकडे कोकणात सत्ता आहे पण आक्रमक चेहरा नाही. राणेंचा स्वभाव आक्रमक आहे.
कोकणात पूर्वीसारखं वर्चस्व स्थापन करण्यात एक मोठी अडचण आहे. राणेंचं वय आणि तब्येत.
राणे यात्रा रोटून नेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत असले तरी, ते थकल्याचं तीन दिवसांच्या दौर्यात प्रकर्षांने दिसून येत होतं
सकाळ वृत्तपत्राचे सिंधुदुर्गाचे आवृत्तीप्रमुख शिवप्रसाद देसाई सांगतात, "नारायण राणेंचे सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये मोठं वर्चस्व आहे. पण त्यांची ही मतं विधानसभा आणि लोकसभेत ट्रान्सफर होत नाहीत. मतांसाठी यंत्रणा कशी फेवर करायची हा निवडणुकीचा फंडा राणेंना माहीत आहे. पण याचा अर्थ राणेंना याचा येणाऱ्या निवडणुकीत 100 टक्के फायदा होईल असा काढता येणार नाही."
ते पुढे सांगतात, "गावगावात राणेंचे लोक निवडणूक येतात पण नेते निवडून येत नाहीत याची खंत त्यांच्या मुलांना आहे. कोकणात राणे समर्थक आणि विरोधक असे दोन गड आहेत. त्यामुळे विरोधी मत कमी करता आली तर त्यांना फायदा होईल. राणेंना गावागातील मतांनी आकर्षित करावं लागेल,"
तसंच, "राणेंना निवडणूक पॅटर्न बदलावा लागेल. जुन्या पॅटर्नने लढले तर त्यांना कठीण आहे," असंही देसाई म्हणतात.
सिंधुदुर्गात राणेंकडे किती नगरपालिका?
राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून राणेंकडे सत्ताकेंद्र नव्हतं.
विजय गावकर सांगतात, "सत्ता नसल्याने राणेंचं 'एकला चलो रे' सुरू होतं."
शिवसेना, काँग्रेस तोंडल्यानंतर राणेंनी स्वाभिमान पक्ष स्थापन केला.
"स्वाभिमानमध्ये राणे सपशेल फेल झाले. शेवटी आपला पक्ष त्यांना भाजपत विलीन करावा लागला," ही वस्तुस्थिती आहे ते पुढे म्हणतात.
सद्यस्थितीत राणेंची जिल्हा परिषदेवर निर्विवाद सत्ता आहे. कणकवली आणि देवडग-जामसंडे सुद्धा राणेंकडे आहे. तर, वेंगुर्ला आणि सावंतवाडी भाजपच्या ताब्यात आहे.
"जिल्ह्यातील 90 टक्के स्थानिक स्वराज्य संस्था यात राणेयुक्त भाजपचं वर्चस्व आहे," दिनेश केळुसकर म्हणाले.
दुसरीकडे, मध्यंतरीच्या काळात बदललेल्या समीकरणांमुळे शिवसेनेकडेही ग्रामपंचायती आहेत.
"राणेंकडे ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व आहे. याचा उपयोग विधानसभा आणि लोकसभेत होईल असं त्यांना वाटतं. पण, तसं होताना दिसत नाही. विधानसभा आणि लोकसभेत शिवसेनेचा वरचष्मा कायम आहे," दिनेश केळुसकर पुढे सांगतात.
कोकणी माणसाच्या मनात राणेंचं स्थान काय?
राजकीय विश्लेषक सांगतात, कोकणी माणसाने नेहमीच शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं.
शिनसेना सोडल्यानंतर 2005 च्या पोट निवडणुकीत राणेंनी शिवसेना उमेदवाराचं डिपॅासिट जप्त केलं होत. पण यानंतर शिवसेना पुन्हा उभी राहिली.
दिनेश केळुसकर म्हणतात, "राणेंची स्थानिक मच्छिमारांविरोधी भूमिका त्यांच्या विरोधात गेली. इतर काही मुद्यांवर राणेंची भूमिका लोकांना आवडली नाही. त्यांमुळे कोकणी लोकांच्या मनातून त्यांची प्रतिमा कमी होत गेली."
राणेंचा शिवसेनेचे वैभव नाईक यांनी पहिल्यांदा पराभव केला. त्यानंतर राणेंनी वांद्रेची निवडणूक गमावली.
"राणेंची मास लिडर म्हणून प्रतिमा आहे. पण, लोकांचा सपोर्ट लागतो. हा सपोर्ट पुन्हा उभा करणं खूप कठीण आहे. त्यासाठी त्यांना खूप काम करावं लागेल." ते सांगतात.
विजय गावकर पुढे म्हणतात, "कोकणी माणूस आता सावध भूमिका घेऊ लागलाय. जर राणेंनी आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून ठोस काही निर्माण केलं तर राणे उभारू घेतील."
एकेकाळी राणेंना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक येत होते. पण जन आशीर्वाद यात्रेत फिरताना लोकांची संख्या कमी असल्याचं जाणवत होतं.
दिनेश केळुसकर सांगतात, "कोकणात राणेंच्या मागे मोठा क्राउड दिसला नाही हे खरं आहे."
राणेंना झालेली अटक, त्यांच्या अटकेने गेलेला मेसेज यामुळे जन आशीर्वाद यात्रेला तेवढा प्रतिसाद नाहीये, असं जाणकार सांगतात.
विजय गावकर म्हणतात, "जनतेच्या मनातील पूर्वीचे राणे बनण्यासाठी त्यांच्या दोन्ही मुलांना कोकणवासियांच्या मनातील आवश्यक भूमिका घ्यावी लागेल."
कोकणात राणेंचा भाजपला फायदा होईल?
भाजपने राणेंना पक्षात का घेतलं याची तीन प्रमुख कारणं सिधुदुर्गातील राजकीय विश्लेषक सांगतात.
1) शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर भाजपला उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला थेट अंगावर घेणारा नेता हवा होता.
2) भाजपकडे कोकणात कोणीच मोठा नेता किंवा चेहरा नाही
3) राणे मराठा नेते आहेत
दिनेश केळुसकर पुढे सांगतात, "भाजपला वाटतंय की कोकणात शिवसेनेला अंगावर घेतलं तर, राणेंचं कार्ड मुंबईपासून कोकणात चालेल आणि त्यांना फायदा होईल."
"राणेंचा मुंबई महापालिकेत भाजपला फायदा होऊ शकतो. पण, राणेंना घेऊन पक्ष म्हणून भाजपला विधानसभेत कोकणातील प्रतिनिधीत्व दिसेल असं आता वाटत नाही," ते पुढे म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)