नारायण राणेंच्या 'त्या' विधानानंतर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंच्या जुन्या भाषणांचा उल्लेख का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (23 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आणि मंगळवारी म्हणजेच 24 तासांत नारायण राणेंना अटक झाली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली.
राणेंना त्यांच्या वक्तव्याबद्दल अटक झाल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी केवळ वक्तव्यांवरून कारवाई करायची तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणांचं काय? असा प्रश्न उपस्थित केला.
नारायण राणेंनी आज (25 ऑगस्टला) घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी असं काय बोललो होतं ज्याचा राग आला?शिवसेनेनं अशी वक्तव्यं केली नाहीयेत का? असा प्रश्न उपस्थित केला.
या निमित्तानं पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांची आक्रमक भाषा, त्यांची शैली, विशेषतः बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंनी वेगवेगळ्या वेळी केलेली जहाल स्वरुपाची भाषणं यांचा उल्लेख वारंवार केला जातोय.
बाळासाहेब आणि उद्धव यांच्या जुन्या भाषणांची काही उदाहरणं घेऊन शिवसेनेच्या याच मुशीतून तयार झालेल्या नारायण राणेंचं विधान शिवसेनेला का झोंबलं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.
शिवसेनेचा दसरा मेळावा,
स्थळ- शिवाजी पार्क
बाळासाहेब ठाकरे खुर्चीवर बसले आहेत. आजूबाजूला उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, आदित्य ठाकरे, आणि समोर विराट जनसमुदाय, बाळासाहेब काँग्रेसवर ते अखंड टीका करत होते. काँग्रेस नेत्यांना त्यांनी हिजड्यांची उपमा दिली.
'ही हिजड्यांची अवलाद सोनिया गांधींसमोर जोपर्यंत देशावर राज्य करतेय काँग्रेस पक्ष म्हणून तोपर्यंत या देशाला चांगले दिवस येणार नाही,' असं ते म्हणाले.
1994 च्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे बोलत होते. तेव्हा छगन भुजबळ यांचं काँग्रेसमध्ये जाणं ताजं नसलं तरी शिळं झालं नव्हतं. आणखी एका आमदाराचा संदर्भ देत बाळासाहेब शिवसैनिकांना आवाहन करतात, "आणखी एक आमदार रस्त्यावर गेला तर त्याला रस्त्यावर तुडवा."
1998 च्या शिवसेना मेळाव्यात बाळासाहेबांच्या निशाण्यावर होते मुलायमसिंग यादव. तेव्हा मुलायमसिंग यादव आणि लालू प्रसाद यांनी पाकिस्तानला 2000 कोटी मदत देण्याची मागणी केली होती. त्यावर "ही मागणी केल्यावर मुलायमसिंगाला थोबडवायला पाहिजे होता" असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. विशेष म्हणजे त्यावेळी मुलायम सिंग हे खासदार होते. म्हणजेच एक घटनात्मक पद भूषवत होते.

फोटो स्रोत, Getty Images
आता शिवसेना नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे येऊया
2011 साली एका नागपुरात एका सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक संजय निरुपम म्हणाले की, "जर उत्तर भारतीयांनी ठरवलं तर ते एका मिनिटात मुंबई थांबवू शकतील" त्यावर "मुंबईच्या दिनचर्येत अडथळा आणला तर मी त्याचे दात पाडेन" असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.
2010 साली ऑस्ट्रेलियन आणि पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलसाठी भारतात येऊ द्यावं की नाही हा वाद सुरू होता. तत्कालीन गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी खेळाडूंना पूर्ण सुरक्षेचं आश्वासन दिलं होतं तेव्हा, "तुम्ही भारताचे गृहमंत्री आहात की पाकिस्तानचे? जर तुम्हाला पाकिस्तानी खेळाडूंची चिंता असेल तर त्यांनी पाकिस्तानात जावं" असं उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्र्यांना उद्देशून म्हणाले होते.
नुकतीच नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे शिवसेनेबद्दल बोललेत त्यांची थोबाडं फोडा असं वक्तव्य केल्याचा दावा नारायण राणेंनी केला.
नारायण राणे शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेले नेते आहेत. 1999 साली त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. आक्रस्तळेपणाकडे जाणारा आक्रमकपणा हे राणेंचं वैशिष्ट्य. मग त्यांचं वाक्य शिवसेनेला इतकं का झोंबलं? बाळासाहेब किंवा उद्धव यांनीही आमदार, खासदार, मंत्री अशा घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तिंबद्दल तिखट वक्तव्यं केली होती. मग मुख्यमंत्र्याबद्दल अशी भाषा का, असा आक्षेप शिवसेना का घेत आहे?
'खरं कारण वेगळं होतं'
ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन म्हणतात, "मुळात बाळासाहेब ठाकरे बोलायचे ते 'ठाकरी भाषा' होती. ती त्यांच्याशिवाय कोणीही बोलायचं नाही. अगदी उद्धव ठाकरेही तसं बोलायचे नाहीत. जेव्हापासून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची सूत्रं हातात घेतली आहेत तेव्हापासून पक्षाचा डीएनए बदललेला आहे. तो आता तोडफोड करणारा पक्ष राहिलेला नाही."

फोटो स्रोत, Getty Images
"मात्र काल जे झालं ते राणे आणि उद्धव ठाकरे यांच्या वैमनस्याचं फलित होतं. नारायण राणे आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे आता आपल्याला कोणी काही करू शकत नाही असं त्यांना वाटलं.
मात्र, माझ्या राज्यात तुम्ही आहात त्यामुळे इथे वाट्टेल ते बोललात तर कारवाई होईल हे उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं. त्यामुळे हा सगळा सत्तेचा खेळ आहे. कोणत्या भागात कोण सत्ताधीश आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता. नारायण राणेंनी आपली दबंगगिरी दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तर दिलं."
"खरंतर नारायण राणेंचं वक्तव्य फारसं गंभीर नव्हतं. यापेक्षा वाईट शब्दांमध्ये बाळासाहेब ठाकरे बोलायचे पण त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. अगदीच जेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आला तेव्हा त्यांना अटक करण्याची धमकी दिली गेली. नारायण राणेंचं वक्तव्य हे फारसं गंभीर नाही हे खरंतर उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांना माहिती होतं. मात्र खरा सत्ताधीश कोण आहे हे दाखवण्याच्या चढाओढीतून हे झालं. कालच्या प्रकरणात राणेंची चांगली नाचक्की झाली. त्यामुळे खरा वाद वक्तव्याचा नव्हताच."
'किती ऐकायचं याला काही मर्यादा असतात'
यासंबंधी शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
त्या म्हणाल्या, "बाळासाहेब ठाकरेंनी अशी अनेक वक्तव्यं केली तरी ते कधीही कोणत्या घटनात्मक पदावर नव्हते. राणे घटनात्मक पदावर आहेत. ते केंद्र सरकारचे प्रतिनिधी आहेत. त्यांची प्रतिक्रिया हे सरकारचं मत होतं.
राणे जन आशीर्वाद यात्रेत आले होते तर त्यांनी जनतेचे आशीर्वाद मागायला हवे होते, आपल्या मंत्रालयाबद्दल बोलायला हवं होतं. राणे कायमच अशाच भाषेत टीका करतात. आम्ही आतापर्यंत सहन केलं पण त्यालाही काही मर्यादा असतात. इतकंच काय ते त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांना प्रवीण दरेकरांना म्हणतात की, तू गप्प बस रे... अधिकाऱ्यांना काहीही बोलतात."

फोटो स्रोत, Getty Images
"सुशांतसिंग राजपूत प्रकरणापासून त्यांनी अनेक आरोप केले पण एकही आरोप सिद्ध केला नाही. सारखे म्हणायचे व्हीडिओ दाखवायचे पण कुठे दाखवले व्हीडिओ? ते फक्त बोलतात. राणेंचं बोलणं आम्ही खूप सहन केलं पण ऐकायचं म्हणून किती ऐकायचं यालाही काही मर्यादा आहेत की नाही?"
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








