अजय देवगण म्हणतो, 'खरा इतिहास दडपला होता, समोर आणणं गरजेचं'

अजय देवगण

फोटो स्रोत, Universal PR

    • Author, सुप्रिया सोगळे
    • Role, बीबीसीसाठी

'सिंघम' स्टार अजय देवगणने गेल्या वर्षी 'तानाजी' हा सिनेमा आणला आणि यंदा त्याचा 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धावरील 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

भारताचा खरा इतिहास समोर येणं खूप गरजेचं आहे असं अजय देवगणला वाटतं. कारण त्याच्यामते हा इतिहास दडपण्यात आला होता आणि आताच्या पिढीला हे माहिती असणं गरजेचं आहे की देश कोणाच्या बलिदानावर उभा आहे.

बीबीसीशी बोलताना अजय देवगणने सांगितलं, "या सर्व कथा भारतातील तरुणांना सांगणं महत्वाचं आहे. कारण आपला इतिहास तसाही दडपण्यात आला होता."

"इतकी वर्षं इंग्रज होते त्यांनी इतिहास दाबला. लोकांना कळले असतं की इतक्या लोकांनी बलिदान दिलं आहे तर लोकांनी बंड पुकारलं असतं. त्याच्याआधी मुघलांचा प्रभाव होता. मुघलांच्या आधी आपल्या राजांनी जे केलं ते सुद्धा दडपलं," असं मत अजयने व्यक्त केलं.

"साहजिक आहे की जो शासक येतो त्यानुसार इतिहास बदलला जातो. आजच्या इतिहासाच्या पुस्तकात आपल्यापेक्षा परदेशी इतिहास जास्त आहे," असंही अजय सांगतो.

अजय देवगण

फोटो स्रोत, Universal PR

पुढे तो म्हणाला, "आमच्या काळात तानाजीवर फक्त अर्ध पान लिहिलं गेलं होते आणि आजच्या पिढीला तानाजीबद्दल माहिती नाही कारण ती पुस्तकांमध्ये उपलब्ध नाही."

"मला वाटतं आपण त्याबद्दल बोलायला हवं. कारण जेव्हा देशाचा विचार केला जातो, मला वाटतं लोक जेव्हा बदलतील तेव्हाच देश बदलेल.या पिढीला हे माहिती नाही की किती लोकांच्या कठोर परिश्रमाने आणि निःस्वार्थ बलिदानामुळे हा देश उभा राहू शकला. किती कष्टाने स्वातंत्र्य मिळालं आहे हे जेव्हा कळेल, तेव्हाच त्याला महत्त्व दिलं जाईल."

स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका

'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात अजय देवगण भारतीय हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अजय देवगण म्हणतो, अशी भूमिका साकारत असताना एक दबाव असतो. कोणतीही नकारात्मक गोष्ट त्या पात्राशी जोडली जाऊ नये कारण त्यांनी प्रत्यक्ष जीवनात मोठं काम केलेलं असतं.

अजय देवगण

फोटो स्रोत, Disney Hotstar

अजय देवगणच्या मते, तुम्ही ज्या व्यक्तीची भूमिका साकारत आहात त्याची प्रतिष्ठा कथेत आणि आपल्या अभिनयात अबाधित राहील हे पाहणं खूप महत्वाचं आहे.

आपला चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे याबद्दल थोडी खंत असून ओटीटी सुद्धा एक उत्तम व्यासपीठ आहे असं देखील तो मानतो.

प्रत्येक कलाकाराला शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि ओटीटी माध्यम आल्यामुळे चित्रपटसृष्टीत एक समतोल साधला जाईल अशी अपेक्षा केली जात आहे, असंही त्याने सांगितलं.

आजकाल अनेक मोठे कलाकार ओटीटीवर येण्यासाठी स्वत: प्रयत्न करीत आहेत आणि अजय देवगणलाही या व्यासपीठाचा फायदा घ्यायचा आहे.

अजय देवगण

फोटो स्रोत, Twitter@NFAIOfficial

अजय देवगण लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'रुद्र' या सीरिजमध्ये दिसणार आहे.

'ट्रोलिंगची आता सवय झाली आहे'

ओटीटी एकीकडे कलाकारांना नवीन व्यासपीठ देत असताना त्याच डिजिटल जगात ट्रोलिंगही होत आहे. अनेक कलाकारांनी तर ट्रोलिंगमुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होत असल्याची तक्रार केली आहे.

अजय देवगणनेही याबद्दल सांगितलं. तो म्हणतो की त्याला आता ट्रोलिंगची सवय झाली आहे. त्याने स्पष्ट केलं की त्याच्या फोनमध्ये ट्विटर किंवा इन्स्टाग्राम नाही. त्याचा असा विश्वास आहे की तो जे बोलतो त्यावर इतर लोक काय म्हणतात याने त्याला काहीही फरक पडत नाही.

आमिर खाननेही अलीकडेच सोशल मीडियाला निरोप दिला आहे. अजय देवगणने सोशल मीडियाला पूर्णपणे निरोप दिला नाही, पण तो स्वत:ला त्यापासून दूर ठेवतो. त्याच्या मते, पत्नी काजोल आणि त्याची दोन मुलं सुद्धा सोशल मीडियापासून दूर राहणं पसंत करतात.

'जोपर्यंत जीवंत आहे तोपर्यंत काम करत राहिलं पाहिजे'

सोशल मीडियावर जे काही दिसते त्यात विश्वासार्हतेचा अभाव आहे, असं अजयचं मत आहे. सोशल मीडियापासून दूर राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणं हा त्याचा मंत्र आहे असं तो सांगतो.

अजय देवगण

फोटो स्रोत, Twitter@NFAIOfficial

अजय देवगण 52 वर्षांचा झाला आहे आणि त्याचा असा विश्वास आहे की जसं वय वाढतं तसा त्याला काम करण्याचा आनंद जास्त मिळतो. या वयात त्याचं त्याच्या कलेवर प्रेम आहे असंही तो सांगतो.

त्याच्यानुसार, जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही काम करत राहिलं पाहिजे, नाहीतर तुम्ही एका ठिकाणी थांबला की डोकं काम करत नाही, आजारपण मागे लागतं. "मशीन चालू आहे तोपर्यंत ठीक आहे, जिथे थांबलात तिथे गंज चढतो."

आपलं वय वाढलं आहे याची जाणीव होत असल्याचंही त्याने मान्य केलं. पूर्वी आपल्याला अनेक छोट्या गोष्टींचा राग येत होता पण आता कोणी काहीही म्हटलं तरी फरक पडत नाही, असंही अजय सांगतो.

अजय देवगण

फोटो स्रोत, Universal PR

गेल्या तीस वर्षांपासून चित्रपटसृष्टीत स्वत:च्या पद्धतीने काम करत आहे आणि पुढेही असंच काम करत राहणार असल्याचं त्याने सांगितलं.

'चित्रपटसृष्टीचं स्वरुप बदलत आहे'

चित्रपटसृष्टीत हिरोचा लूक बदलत आहे. अजय म्हणतो, "या पाच ते सात वर्षांत तुम्हाला दिसेल की हॉलिवूड आणि इथेही बहुतेक भूमिका प्रौढ कलाकारांसाठी लिहिल्या जातात. गहन कथा लिहिल्या जातात."

गहन कथा परिपक्वतेनंतरच येते. हे खूप चांगलं आहे कारण प्रेक्षकांना अशा कहाण्या बघायला आवडतात असं त्याला वाटतं.

'चित्रपट हे संदेश आहेत'

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशवासियांना काय संदेश देऊ इच्छितो? यावर अजय देवगण म्हटला, अभिनेत्यांच्या सांगण्याने काही होत नाही. म्हणजे देशवासियांना जे काही सांगायचे आहे ते आपल्या चित्रपटातून सांगतो असं त्याने स्पष्ट केलं.

देशाच्या प्रत्येक नागरिकाने देशाचा केवळ पाच टक्के जरी विचार केला तरी हा देश महान होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया अजयने दिली.

अभिषेक दुधैया दिग्दर्शित 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटात अजय देवगणसह संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, शरद केळकर, एमी विर्क आणि नोरा फतेह यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)