विजयपथ ते गोलमाल : तब्बूनं सांगितलेले 20 वर्षांचे अनुभव

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
- Author, सुप्रिया सोगले
- Role, बीबीसी प्रतिनिधी
विजयपथ या चित्रपटापासून तब्बूची हिंदी चित्रपट क्षेत्रातली कारकीर्द सुरू झाली. या क्षेत्रात येऊन तिला आता 20 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे.
बीबीसीशी बोलताना तब्बूने सांगितलं की, "मी सदैव कामातच व्यग्र राहते असं नाही. मला फक्त आपल्या माणसांसोबत काम करण्याची इच्छा असते, ज्यांच्यासोबत काम करताना मला आनंद मिळतो. मी माझ्या आयुष्यात सुखी आहे."
मकबूल, फितूर, अस्तित्व, चांदनी बार आणि हैदरसारख्या चित्रपटांत तब्बूने गंभीर भूमिका साकारल्या आहेत. खूप दिवसांपासून ती कॉमेडी कथानक असलेल्या चित्रपटाच्या शोधात होती. त्यामुळेच रोहित शेट्टीच्या आगामी गोलमाल-4 या चित्रपटात काम करण्याचं ठरवलं, असं तब्बू म्हणते.

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
"कॉमेडी चित्रपटात काम करत असले तरी चित्रपटातली माझी भूमिका गंभीरच असणार आहे," असं तब्बूने याप्रसंगी स्पष्ट केलं आहे.
तब्बू सांगते की, "जेव्हा मी एखादी गंभीर भूमिका साकारते तेव्हा प्रेक्षक मला कॉमेडी चित्रपटात काम का करत नाही म्हणून विचारतात. दुसरीकडं मी कॉमेडी चित्रपटांत काम केलं, तर माझ्याकडून गंभीर भूमिका साकारण्याची अपेक्षा ठेवतात."
प्रेक्षकांना खूश ठेवणं अवघड
प्रेक्षक फक्त स्वत:च्या मनाचं ऐकून चित्रपटांची निवड करतात, त्यामुळं त्यांना नेहमीसाठी खुश ठेवणं अवघड काम असतं, असं तब्बूला वाटतं.

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
कमी चित्रपटांत काम करण्याविषयी तब्बू म्हणते, "माझ्या पिढीतल्या किती अभिनेत्री आज चित्रपटात काम करतात? मी वर्षातून निदान एक चित्रपट तरी करते आहे."
गोलमाल-4 मध्ये तब्बू अजय देवगण बरोबर काम करताना दिसेल. तब्बूने त्या दोघांच्या नात्याला 'खास' असं संबोधलं आहे.
...म्हणून अजयबरोबर काम करायला आवडतं
तब्बू सांगते, "मी आणि अजय देवगणने चित्रपट क्षेत्रातल्या प्रत्येक टप्प्यावर सोबत काम केलं आहे. म्हणून मला अजय देवगणबरोबर काम करणं आवडतं."

फोटो स्रोत, UNIVERSAL PR
'चीनी कम' या अमिताभ बच्चनसोबत केलेल्या रोमँटिक चित्रपटाला तब्बू तिच्या चित्रपट कारकीर्दीतील मैलाचा दगड मानते. कारण, त्याच चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये वयाचं अंतर खूप जास्त होतं आणि हे चित्रपट वेगळेसुद्धा होते.
आपल्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत तब्बूने अनेक चढ-उतार पाहिले. असं असलं तरी कधीही आत्मचरित्र लिहायचं नाही, असं तिनं ठरवलं आहे.
रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलेल्या गोलमाल- 4 या चित्रपटात तब्बूसोबत अजय देवगण, अर्शद वारशी, परिणीति चोप्रा, तुषार कपूर आणि कुणाल खेमू झळकणार आहेत. हा चित्रपट येत्या 20 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








