डॉ. गणेश राख : मुलगी जन्माला आल्यास फी न घेणारा डॉक्टर

डॉ. राख यांचा परिवार

फोटो स्रोत, अनुश्री फडणवीस

फोटो कॅप्शन, डॉक्टरांच्या कामाबद्दल त्यांच्या पत्नी तृप्ती राख यांना आज अभिमान वाटतो.
    • Author, गीता पांडेय आणि श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, नवी दिल्ली

अमिताभ बच्चन यांना आजवर अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही हिरो म्हणून पाहिलं आहे. पण त्यांच्यासाठी हिरो कोण आहे, माहित आहे? पुण्याचे डॉ. गणेश राख.

'मुलगी वाचवा अभियाना' अंतर्गत डॉ. राख यांनी आजपर्यंत 786 महिलांच्या नि:शुल्क प्रसूती केल्या आहेत, कारण त्यांनी मुलींना जन्म दिला होता.

त्यांच्या या कार्यासाठी बच्चन यांनीही त्यांचा 'रिअल हिरो' असा गौरव केला आहे.

कशी झाली अभियानाची सुरुवात

आजही काही कुटुंबांमध्ये मुलगा जन्माला यावा, अशीच अपेक्षा असते. मुलगा जन्मला की आनंद साजरा होतो, मिठाई वाटली जाते.

मुलगी झाल्यास अनेकांचा हिरमोड होतो. नातेवाईक दवाखाना सोडून जातात, मुलीची आई रडत बसते.

कुलदीपक शोधण्याच्या या नादात मुलामुलींचे गुणोत्तर बिघडत आहे, हे 2011च्या जनगणनेत प्रकर्षाने जाणवलं.

भारतात दर 1000 मुलांमागे 914 मुली जन्माला येतात. ही स्थिती सुधारण्याची नितांत गरज आहे.

डॉ. गणेश राख यांनी पुण्यात 2007 मध्ये मेडीकेअर हॉस्पिटल सुरू केले. मुलींच्या जन्मदराची ही स्थिती पाच वर्षं पाहिल्यानंतर 2012 मध्ये त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला.

"मुलगी जन्मल्यास कोणतीही फी घ्यायची नाही, असा मी 2012 साली निर्धार केला. तसंच प्रत्येक मुलीचा जन्म सेलिब्रेट करायचंही ठरवलं," असं डॉ. राख यांनी बीबीसीला सांगितलं.

पुढे या निर्धाराचं 'मुलगी वाचवा अभियानात' रूपांतर झालं.

हमालाच्या मुलाचा संघर्ष

डॉ. गणेश यांना बालपणापासून कुस्तीपटू व्हायचं होतं. पण घरी अठराविश्वे दारिद्र्य. वडील पुण्यात हमाल होते. आई लोकांच्या घरी धुणी-भांडी करायची. मग हे स्वप्न पूर्ण होणार तरी कसं?

पहिलवानी करायची म्हटलं की अंगात ताकद लागते, खूप खावं लागतं.

आदिनाथ विठ्ठल राख

फोटो स्रोत, अनुश्री फडणवीस

फोटो कॅप्शन, 'गरज पडल्यास मी पुन्हा हमाली सुरू करीन', असं म्हणत डॉ. राख यांच्या अभियानाला त्यांचे वडील आदिनाथ विठ्ठल राख यांनी पाठिंबा दिला.

"सर्वांचं जेवण तू एकटाच संपवशील आणि बाकी सगळे उपाशी राहतील," असं डॉक्टरांची आई त्यांना म्हणायची.

त्यामुळं गणेश यांनी मग डॉक्टरकी करायचं ठरवलं. आईचा आधार घेत अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं.

समाजात भेदभावाला सामोरे जात आणि परिस्थितीवर मात करत गणेश डॉक्टर झाले.

आधी विरोध

सुरुवातीला या अभियानाला डॉक्टरांच्या घरच्यांचा विरोध होता. परिस्थिती बेताची आणि मुलगी लहान म्हणून डॉक्टरांच्या बायकोने विरोध केला. त्यांच्या भावांचाही विरोध होताच.

डॉ. गणेश राख

फोटो स्रोत, अनुश्री फडणवीस

फोटो कॅप्शन, 2011 सालच्या जनगणनेतील मुलींच्या जन्मदरानं डॉ. राख यांना चिंतेत टाकलं होतं.

पण त्यांच्या वडिलांनी मात्र त्यांना पाठिंबा दिला. "गरज पडल्यास मी पुन्हा हमाली सुरू करेन," असं वडिलांनी त्यांना सांगितलं.

या अभियानाला आता साडेपाच वर्षं झाली आहेत आणि घरच्यांना त्यांच्या या कामाचं महत्त्वही पटलं आहे.

अभियानाचा प्रसार

'मुलगी वाचवा अभियाना' दरम्यान डॉ. राख यांनी देशभरातल्या डॉक्टरांशी संपर्क साधून मुलगी जन्मल्यास कमीत-कमी एक प्रसूती मोफत करण्याचं आवाहन केलं.

डॉक्टरांच्या अभियानाला समाजाच्या सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.

फोटो स्रोत, डॉ. गणेश राख/फेसबूक

फोटो कॅप्शन, डॉक्टरांच्या अभियानाला समाजाच्या सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे.

आजवर 20 हजार डॉक्टर आणि तीन लाख स्वयंसेवकांनी या अभियानात सहभाग नोंदवला आहे.

डॉ. राख शाळा-कॉलेजात जाऊन, लग्नसमारंभांना भेटी देऊन, मोर्च्यांच्या माध्यमातून लोकांना मुलींचं महत्त्व पटवून सांगत आहेत, मुलगी वाचवण्याचं आवाहन करत आहेत.

"मी एक छोटीशी सुरुवात केली होती. मला वाटलं नव्हतं लोकांचा एवढा भरभरून पाठिंबा मिळेल. अमिताभ बच्चन यांनी माझ्या कार्याचा गौरव केल्यावर लोकांना या अभियानाचं महत्त्व समजलं आणि त्याचं आता एका चळवळीत रूपांतरित झालं आहे."

डॉ. राख पुढे आनंदाने सांगतात, "शिवाय, आता लोकांची मानसिकताही बदलत आहे. आधी फक्त मुलांचेच जन्म साजरे व्हायचे. आता मुलींचाही जन्म झाल्यावर मला पेढे खायला मिळतात."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)