नितीन गडकरींचं उद्धव ठाकरेंना पत्र - 'रस्त्याच्या कामात शिवसैनिकांचा अडथळा'

    • Author, प्रवीण मुधोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रामुळे वाद पेटला आहे.

"राज्यातील NHAI च्या महामार्गावरील रस्ते बांधणीच्या कामात शिवसैनिकांकडून अडथळे निर्माण केले जात आहे. हे असंच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील कामं थांबवावी लागतील," असा गंभीर इशारा गडकरी यांनी पत्रातून दिला आहे.

नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या या पत्रामुळे रस्ते बांधणी कामातील स्थानिक राजकारण्यांचा हस्तक्षेपासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या पत्रावर कारवाई मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कुणी दोषी असल्याच त्याची चौकशी करावी असे आदेश काढले आहेत.

महामार्गचे काम थांबवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहे.

"विदर्भातील अकोला, वाशीम आणि मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यांत आणि या जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामं सध्या प्रगतीपथावर आहेत. NHAI कडून या जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरण आणि त्यावर पूल बांधले जात आहेत. पण या कामात शिवसैनिकांकडून अडथळे आणले जात आहेत. कंत्राटदारांना धमक्या दिल्या जात आहेत," याकडे नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचं पत्र लिहून लक्ष वेधलं आहे.

"हे प्रकल्प जर झाले नाही तर महाराष्ट्राचं नुकसान होईल. म्हणून आपण यात त्वरित हस्तक्षेप करून मार्ग काढावा," अशी विनंतीही गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

नितीन गडकरी यांनी पत्रात काय लिहलं आहे?

"केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून काही प्रगतीपथावर आहेत. मात्र अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.

"विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना वैतागून सोडणे त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोक प्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषत: वाशिम जिल्हयात हे प्रामुख्याने घडत आहे," असे नितीन गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे.

अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाची कामं रखडली असून याचं कारण शिवसेना कार्यकर्त्यांनी कामं थांबवली असल्याची माहिती मिळाल्याचं गडकरी पत्रात म्हणाले आहे.

यासंदर्भात गडकरींनी पत्रामध्ये काही महत्त्वाची उदाहरणं देऊन या परिस्थितीसंदर्भात गांभीर्याने विचार करावा लागेल असं म्हटलं आहे.

"अकोला आणि नांदेड या 202 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज - 2 मध्ये वाशिम शहरासाठी बायपास या 12 किलोमीटर रस्ते बांधणी करण्याच्या कामाचादेखील समावेश आहे. परंतु हा बायपास आणि मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.

"या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे," असे गडकरी पत्रात पुढे लिहतात.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची या प्रकरणात प्रतिक्रिया काय?

शिवसेनेचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका प्रमुख महादेवराव ठाकरे यांची या प्रकरणावर बीबीसी मराठीने प्रतिक्रिया जाणून घेतली आहे.

महादेवराव ठाकरे सांगतात, "नितीन गडकरींनी जिल्ह्यातील ज्या रस्त्यांची कामे केलीत त्याला शिवसेनेचा विरोध नाही. शिवसेनेचा विरोध असता तर जिल्ह्यातील 90 टक्के रस्त्यांची कामं झाली नसती."

"ज्या ठिकाणी शिवसेनेनं आंदोलनं केली, त्या ठिकाणी कंत्राटदारांच्या चुकीमुळे धूळ उडाली. परिसरातील शेतांमधील उभ्या पिकांचे नुकसान झाले. अनेक अपघात या परिस्थितीमुळे झालेत. त्या परिसरातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही काम केलं. मात्र शिवसेनेनं वाशिम जिल्ह्यातील कोणत्याच रस्त्याचे काम अडवलेले नाही. नितीन गडकरी यांनी पत्राद्वारे जे आरोप केले आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत. असेही महादेवराव ठाकरे पुढे म्हणले."

दरम्यान या प्रकरणात काँग्रेसनेही उडी घेतली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

नाना पटोले म्हणाले "जेव्हा 25 वर्ष शिवसेनेसोबत भाजपवाले होते, तेव्हा कधी अशा पद्धतीचे पत्र दिलं नाही. तेव्हा त्यांना शिवसेना कशी वागते ते कळलं नाही. आता मात्र केवळ दिल्लीच्या दबावामुळे हे पत्र दिले नाही ना?"

"रस्त्याच्या कामांमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे, रस्त्याचा दर्जा, त्याचे दर व्यवस्थित करावे त्याच्या पद्धतीने एक श्वेतपत्रिका गडकरी यांनी जाहीर करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते झाले पाहिजे जो कोणी अशी अडवणूक करेल त्याला आम्ही सुद्धा विरोध करू," असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)