संजय राऊत: '...त्यांच्या हाती लोकशाही सुरक्षित नाही' #5मोठ्या बातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1. विरोधकांचे ऐकणे हा ज्यांना अपमान वाटतो त्यांच्या हाती लोकशाही सुरक्षित नाही- सामना

"देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना अनेक संस्थांचे स्वातंत्र्य मारले जात आहे. संसद, न्यायालयं, वृत्तपत्रांना मोकळेपणाने काम करण्याचं स्वातंत्र्य नाही."

"राजकीय विरोधकांना संसदेत बोलू दिलं जात नाही व त्यांना रोखण्यासाठी मार्शल्सची फौज उभी केली जाते. स्वातंत्र्य ते हेच का?" असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील 'रोखठोक' सदरातून केला आहे.

"पावसाळी अधिवेशनात पंधरा दिवसात चार तासही काम होऊ शकले नाही. लोकशाही मार्शल लॉच्या बुटाखाली चिरडताना ज्यांनी त्या दिवशी पाहिली त्या सगळ्यांनी लोकशाहीला श्रद्धांजली वाहून संसदेतून काढता पाय घेतला," असं राऊत म्हणाले.

करदात्यांच्या पैशावर लोकसभा टीव्ही चालते. पण विरोधकांवर त्यांचा बहिष्कार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकरणामुळे महात्मा गांधीजींचा पुतळा पत्र्याच्या आवरणाने झाकून ठेवला आहे. विरोधकांचे ऐकणे हा ज्यांना अपमान वाटतो त्यांच्या हाती देश आणि लोकशाही सुरक्षित नसते.

शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, गृहिणी, राजकीय कार्यकर्ते सगळेच नव्या सूर्यकिरणांच्या प्रतीक्षेत आहेत.

2. ऑनलाईन माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित

ऑनलाइन माध्यमांना आचारसंहितेची सक्ती करणाऱ्या नव्या माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील (आयटी) कलम 9(1) आणि 9(3)ला उच्च न्यायालयाने शनिवारी अंतरिम स्थगिती दिली.

ऑनलाइन माध्यमांना नैतिक संहितेचे पालन सक्तीचे करणे म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा असल्याचे सकृद्दर्शनी दिसते, असे न्यायालयाने नमूद केले. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेशात नोंदवले. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे यासाठी त्याला स्थगिती देण्याची मागणी केंद्र सरकारतर्फे करण्यात आली, मात्र न्यायालयाने ती फेटाळली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अशा प्रकारे निर्बंध आणले गेले तर लोकांना व्यक्त होता येणार नाही. त्यांना गुदमरल्यासारखे होईल.

'आजच्या काळात मजकुरावर निर्बंध घालणे आणि ऑनलाइन माध्यमांबाबत आचारसंहितेची सक्ती अयोग्य.

निरोगी लोकशाही टीका आणि विरोधी विचारांच्या आधारावर विकसित होते, राज्याच्या सुयोग्य कारभारासाठी टीका महत्त्वाची असते.

3. ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल- पंकजा मुंडे

"ओबीसींचं आरक्षण वाचवा अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका," असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे.

त्याचबरोबर मराठा आरक्षणालाही आमचा पाठिंबा असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय. लातूरमध्ये पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यात मोठ्या संख्येनं भाजपचे नेते उपस्थित होते. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

"ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. हे मेळावे फक्त मेळावे नाही राहिले पाहिजे. तर यातून काही सिद्ध झालं पाहिजे. लातूरमध्ये एक लाख काय…आम्ही मुंबईत 10 लाख लोकं बोलावू शकतो. आम्हाला त्याची बिलकुल चिंता नाही. तो ही एक दिवस येईल. ओबीसी शांत आहे, ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे," अशा शब्दांत पंकजा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान चिक्की घोटाळ्याचा आरोप म्हणजे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. चिक्की प्रकरणात कुठलीही तक्रार नाही. या प्रकरणात कुठलीही आपत्ती समोर आली नाही. म्हणजे कुणाला विषबाधा झाली आहे असं घडलेलं नाही. कोणत्याही व्यक्तीची तक्रार नाही किंवा पालकाची तक्रार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

4. पुण्यात रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारिता विभाग स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हलवण्याच्या निर्णय विद्यापीठाकडून अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

उदय सामंत म्हणाले, "रानडे इन्स्टिट्यूटची जागा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे भाडेतत्त्वावर आहे. ही जागा विद्यापीठाच्या नावावर, विद्यापीठाच्या मालकीची होण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच रानडे इन्स्टिट्यूटच्या टेक्निकल अपग्रेडेशनसाठी स्टुडिओ आणि इतर सुविधांसाठी देखील कुलगुरुंसोबत चर्चा झाली. त्यासाठी शेजारच्या इमारतीत सोय करता येईल". 'एबीपी माझा'ने याबाबत बातमी दिली आहे.

"रानडे इन्स्टिट्यूटमधे काळानुरूप जे बदल करायचे आहेत यासाठी उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती तीन महिन्यांमधे अहवाल देईल. त्यानंतर रानडे इन्स्टिट्यूटसाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या केल्या जातील," असे देखील उदय सामंत या वेळी म्हणाले.

5. जो रूटचं शतक, भारत 364 तर इंग्लंड 391

कर्णधार जो रूटच्या खणखणीत नाबाद 180 धावांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने 391 धावांची मजल मारली. भारताच्या 341 धावांसमोर खेळताना इंग्लंडने तिसऱ्या दिवशी 119/3 वरून पुढे खेळायला सुरूवात केली.

रूटने नॉटिगहॅम कसोटीतील फॉर्म कायम राखत कारकीर्दीतील 22व्या तर लॉर्डस मैदानावर चौथ्या शतकाची नोंद केली. 'इंडियन एक्स्प्रेस'ने ही बातमी दिली आहे.

जॉनी बेअरस्टोने 57 धावांची खेळी करत रूटला चांगली साथ दिली. मोईन अली आणि जोस बटलर मोठी खेळी करू शकले नाहीत. इंग्लंडला 27 धावांची अल्प आघाडी मिळाली. भारतातर्फे मोहम्मद सिराजने 4 तर इशांत शर्माने 3 विकेट्स घेत इंग्लंडला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं.

दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान भारतीय खेळाडू लोकेश राहुल बाऊंड्रीजवळ क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांनी दारूच्या बाटल्यांचं कॉर्क त्याच्या दिशेने फेकले. सुरक्षायंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. काही वेळानंतर भारतीय संघाचा टीशर्ट परिधान केलेला व्यक्ती मैदानात घुसला. मी खेळाडूच असल्याचं त्याचं म्हणणं होतं. सुरक्षारक्षकांनी त्याला जेरबंद केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)