You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये 'त्या' व्हीडिओवरून नेमकं काय झालं होतं?
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कृष्णकुंजवर पोहोचले आहेत.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीतून भाजप आणि मनसे आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता जरी असली तरी परप्रांतियांच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांचे एकमत होताना दिसत नाहीय. त्यामुळे राज ठाकरेंची परप्रांतियांबाबची भूमिका समजावून घेणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यासाठी राज ठाकरेंच्या भाषणाच्या क्लिप देखील पाहणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
मात्र, या क्लिपवरुनच चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते.
राज ठाकरेंच्या भाषणाच्या क्लिपचा नेमका वाद काय?
18 जुलैला राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील आपआपल्या पक्षाच्या कामासाठी नाशिक दौऱ्यावर होते. या दोघांची नाशिकमध्ये भेट झाली. त्यावेळी विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली.
या भेटीनंतर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, ''राज ठाकरे हा आश्वासक चेहरा आहे. मात्र ते जोपर्यंत परप्रांतियांचा मुद्दा सोडत नाही, तोपर्यंत पुढं जाता येत नाही. मी त्यांची परप्रांतियांच्या बाबतची भूमिका समजावून घेणार असून राज ठाकरे आपल्याला त्यांच्या भाषणाची लिंक पाठवणार आहेत.''
त्यानंतर राज ठाकरेंच्या भाषणाच्या क्लिप्स मिळाल्या आहेत आणि त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं.
28 जुलैला राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी माध्यमांनी या क्लिपबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, "मी चंद्रकांत पाटील यांना कुठलीही क्लिप पाठवली नाही. तसंच कुणी क्लिप पाठवली हे त्यांना विचारणार आहे."
पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले, ''मी चंद्रकांत पाटलांना क्लिप पाठवली नाही. मी त्यांना बोललो होतो क्लिप पाठवीन पण त्यांच्यापर्यंत कोणी पोहचवली मला कल्पना नाही. मी जे असतं तेच बोलतो. मी त्यांना विचारणार आहे की क्लिप कोणी पाठवली. त्यादिवशी ते नाशिकला मला ज्यावेळी भेटले, त्यावेळी इतर विषयांसोबत हा देखील एक विषय निघाला. त्यावेळी मी त्यांना म्हंटलं की, मुळात माझं ते भाषण हिंदीतून होतं. ते त्यांना कळालं, तुम्हाला अजून नाही कळालं. तुम्हाला अजून कळालं नसेल तर मी काय बोललो हे पाठवून देईल. त्यावेळी ते म्हणाले की, नक्की पाठवा मला ऐकायला आवडेल.''
'मुझे तो आम से मतलब...' - चंद्रकांत पाटील
4 ऑगस्टला एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी क्लिप पाठवली नाही असं जाहीर केल्याबाबत पाटील यांना विचारण्यात आले, त्यावर उत्तर देताना "मुझे तो आम से मतलब!" असं पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ''मुझे तो आम से मतलब ! मला क्लिप मिळाली मी ती ऐकली ती ऐकल्यावरही माझ्या मनात अजूनही काही मुद्दे आहेत ते घेऊन मी त्यांना भेटणार आहे. तरी निर्णय करणारा मी नाही. मला माझ्या सहकाऱ्यांना देखील विचारावं लागेल. माझ्या सहकाऱ्यांनी मला विचारले की, त्यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेबद्दल काय ? त्याबाबत माझी आणि राज ठाकरे यांची चर्चा सुरु आहे.''
परप्रांतियांच्याबाबत आपल्या भूमिका स्पष्ट असल्याचंही राज ठाकरे म्हणाले होते, त्याबाबत बोलताना पाटील म्हणाले, ''चर्चेने अनेक प्रश्न मार्गी लागतात. त्या त्या राज्यांनी विकास करावा ही भूमिका राज ठाकरेंनी मांडावी परंतु पोट भरण्यासाठी येणाऱ्यांना त्रास देऊन काय होणार हे मुद्दे मी त्यांच्यासमोर मांडणार आहे.''
तसेच, आमच्यात युतीची नाही तर क्लिपबाबतची चर्चा सुरु असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले होते. ''आमचे गैरसमज दूर झाले तरी भाजपाच्या निर्णय करणाऱ्या टीमने ते ओके केले तर युती होऊ शकते'' असेही पाटील यावेळी म्हणाले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)